लेख : वेब न्यूज :लिनक्सची नजर आता कॉन्फिडेन्शल कॉम्प्युटिंगवर

427

>> स्पायडरमॅन

कॉन्फिडेन्शल कॉम्प्युटिंग अर्थात गोपनीय संगणन हे सध्या तंत्रज्ञान विश्वात मोठ्या प्रमाणात विस्ताराला येत असलेले आणि अनेक संधी उपलब्ध असलेले क्षेत्र बनू पाहते आहे. बदलत्या काळाची पावले ओळखत, आता लिनक्ससारख्या ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टिम बनवणाऱ्या टेक जायंट कंपनीनेदेखील या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे

लिनक्स फाऊंडेशनने नुकतीच तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या प्रतिनिधींशी एक गुप्त चर्चा आयोजित केली होती. या चर्चेमध्ये Alibaba, Baidu, Google Cloud, ARM, Microsoft, IBM, Intel, Red Hat, Tencent आणि Swisscom सारख्या अनेक दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांनी हजेरी लावली होती. आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असलेल्या या सर्व कंपन्यांनी यावेळी कॉन्फिडेन्शल कॉम्प्युटिंगची एक सुटसुटीत व्याख्या तयार करणारा आणि या क्षेत्रातील संधींचा वेग वाढवण्यास मदत करणारा एक संघ (Confidential Computing Consortium) तयार करण्याची घोषणा यावेळी केली. जगाला वेगळी दिशा देणारा कोणताही उद्योग आणि त्याची क्षमता ही कायमच मुक्त स्रोत प्रणाल्यांवरच आधारित राहिलेली आहे. त्यामुळेच या समुदायातील लिनक्सचे स्थानही अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, असे लिनक्सच्या प्रवक्त्याने यावेळी नमूद केले

Confidential Computing Consortium हा येत्या काळात संगणक आणि संगणन क्षेत्राच्या सुरक्षेत घडणाऱ्या महत्त्वाच्या बदलांना अचूक टिपणारा दिशादर्शक असेल आणि त्याच बरोबर या संघाच्या मदतीने डाटाचा वापर आणि त्याची सुरक्षा यासाठी ओपन सोर्स अर्थात मुक्त स्रोत तंत्रज्ञानावर आधारित विविध सॉफ्टवेअर्स बनवण्यास मदतच मिळणार आहे. कॉन्फिडेन्शल कॉम्प्युटिंगची बाजारपेठ अधिक विस्तारण्यासाठी आणि त्यात महत्त्वाचे बदल घडवण्यासाठी सर्वात आधी या समुदायातर्फे हार्डवेअरचे विक्रेते, डेव्हलपर्स, संगणकतज्ञ, संगणक शिक्षक, मुक्त स्रोततज्ञ, क्लाऊड सेवा पुरवणारे अशा सर्वांना एकत्र आणले जाणार आहे. त्यानंतर मग वर्कलोड डाटा आणि बौद्धिक संपत्ती (intellectual property) या महत्त्वाच्या विषयांचे नियमन करण्यात येणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या