
>> वर्षा दीपक पाटील
शिक्षण पद्धतीचे मूल्यमापन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने करावे. माझ्या मते कोणत्याही शिक्षण पद्धतीचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांमधील असलेले अंगभूत गुण व उपजत कला जोखून त्या जोपासणे व त्यांना योग्य तो वाव देऊन विद्यार्थ्याला एक सुजाण व समृद्ध नागरिक बनवणे हा आहेच. त्यामुळे विद्यार्थी हे परीक्षार्थी न बनता विद्यार्थीच राहतील व त्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळाल्यामुळे त्यांना स्वतःची ओळख तर होईलच आणि ते उर्वरित आयुष्यसुद्धा यशस्वीपणे, आनंदाने व समाधानाने घालवतील. कोरोनाच्या साथीमुळे मिळालेल्या या सुसंधीचा सरकारने फायदा घ्यावा व प्रस्थापित शिक्षण पद्धतीचे नवीन दृष्टिकोनातून मूल्यमापन करावे,
खूप दिवसांपासून मनात येत होते की आपली शिक्षण पद्धती बदलावयाची वेळ आली आहे. मी गेली 25 वर्षे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवीत आहे. गेल्या 25 वर्षांतला माझा अनुभव आणि निरीक्षण असे सांगते की, शाळेतून कॉलेजमध्ये आलेले हे विद्यार्थी अनेकदा भांबावलेले, स्वप्नाळू, परंतु दिशाहीन आढळतात. आयुष्यात नेमके काय करायचे हे त्यांना समजलेले नसते आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शनसुद्धा मिळालेले नसते. माझ्या मते यासाठी पुढील गोष्टी कारणीभूत आहेत.
आयुष्याचे सिंहावलोकन करताना असे वाटते की आपण पदवीधर होईपर्यंत विद्यार्थी कमी व परीक्षार्थी जास्त होतो. आपणा सर्वांचे एकच उद्दिष्ट असते की परीक्षा उत्तम गुणांनी पास होऊन पदवी घ्यायची आणि नंतर परीक्षार्थी हे लेबल टाकून देऊन पोटार्थी हे लेबल चिकटवून घ्यायचे आणि आयुष्याची मार्गक्रमणा करायची. म्हणजेच विद्यार्थी-परीक्षार्थी-पोटार्थी हे तीन टप्पे ज्ञान मिळवण्यापेक्षाही मोठे ठरतात. या क्रमाने जाताना, आपण आपल्यातला ‘मी’ विसरतो, स्वतःची ओळख विसरतो, आपल्यातले कला, गुण बऱयाचदा बाजूस ठेवतो. कालांतराने विसरूनही जातो.
सध्याच्या रट्टा व एकांगी शिक्षण पद्धतीमुळे, विद्यार्थ्यांना आपण परीक्षार्थी कधी झालो हेच कळत नाही. एकदा पदवी पदरात पडली की इतर सर्वसामान्य जनांप्रमाणे बहुतांशी मुले ही परीक्षार्थींचे पोटार्थी होतात. मला मान्य आहे की, शिक्षण हे उदरनिर्वाहाचे साधन असावे, पण शिक्षण आणि ज्ञान, यांचाही अन्योन्य असा संबंध आहे. विद्यार्थी म्हणजे ज्ञान व शिक्षण म्हणजे परीक्षा, असा जरी आपण संबंध लावला तरी पोटार्थी बनल्यावर आपणास याचा सुवर्णमध्य गाठता आला पाहिजे. श्रीमंती जर आपण पद, पैसा, घर, इस्टेट यावरच तोलू लागलो तर आताच्या कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला यातील फसवेपणा समजून आला आहे. या गोष्टी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. याबद्दल शंकाच नाही, पण त्यामुळे आपल्याला खरे समाधान मिळू शकते का? आता मार्च 2020 पासून मुंबई-महाराष्ट्रातच नाही तर जवळपास अर्धे जग ठप्प झालेले आहे व ज्यांचे पोट भरले आहे त्यांना रितेपण जाणवत आहे. सर्वजण आर्थिक आधार सोडून मानसिक व वैचारिक आधार शोधत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बसल्यावर जर अशा भावना मनात येत असतील तर ही चूक आपल्या समजुतीची, संस्काराची की आपल्याला घडवणाऱया शिक्षण पद्धतीची आहे. याचा विचार एक शिक्षिका म्हणून मला करावासा वाटतो. आताच्या वेगवान युगात, शहरी तसेच ग्रामीण भागात पालकांना मुलांकडे लक्ष द्यावयास योग्य तेवढा वेळ मिळत नाही. कारण प्रत्येकाचे जीवन जगण्याचे उद्दिष्ट वेगवेगळे असते. अशा परिस्थितीमुळे मुलांना शाळेत घातल्यानंतर बारावीपर्यंत मुलांच्या मनावर शिक्षण पद्धतीचाच पगडा बसतो.
दहावी-बारावी आणि पदवी हे प्रत्येकाच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे आहेत, असे न्यायालयदेखील म्हणते. त्यामुळे आपणा सर्वांचे मूल्यमापन या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवरच ठरवले जाते. सध्याची शिक्षण पद्धती विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण कोणत्या प्रकारे मिळतील या प्रकारेच प्रश्नपत्रिका बनवते. म्हणून सध्याचा भर ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांवर आहे व त्या मार्कांवरच सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते, परंतु अशा प्रश्नपत्रिकांमुळे प्रत्येकातील अंगभूत गुणांचा आणि कलांचा पूर्ण विकास होण्यावर मर्यादा येतात आणि विद्यार्थी नकळत परीक्षार्थी बनतो. विद्यार्थ्यांशी संवाद करताना असे जाणवते की कित्येकांना मनातून एक काही ठरावीक करायचे असते, परंतु विविध प्रकारांच्या दडपणामुळे किंवा असलेले गुण न जोपासल्यामुळे तसेच काही वेळेस ओढवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना दुसरेच काही करावे लागते. शेवटी ‘पदरी पडले पवित्र झाले’ या न्यायाने बहुतांश मुलं जे मिळाले आहे त्यातच आनंद मानतात व आपली कुवत न समजल्यामुळे ते आपण सुखी, आनंदी आहोत असे दर्शवितात, परंतु माझ्या निरीक्षणानुसार बहुतांश मुलांमध्ये आंतरिक समाधानाची कमतरता असते, पण याची जाणीव आयुष्य जगताना आलेल्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना होत नाही.
सध्या कोरोनाच्या साथीमुळे सरकारला प्रस्थापित शिक्षण पद्धतीचे सर्व नियम डावलून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा धाडसी निर्णय परिस्थितीनुरूप घ्यावा लागला. निर्णयामुळे माझ्यामते सर्वांचे डोळे खाडकन उघडलेले असावेत. निदान गेली 25 वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे आतापर्यंत अवलंबिलेल्या परीक्षा पद्धतीचा व मूल्यमापनाचा सर्वंकष विचार करण्याची गरज भासली.
माझ्या असे वाचनात आले आहे की, काही वर्षांपूर्वी सरकारने पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णयाबरोबरच विद्यार्थ्यांचे निरंतर मूल्यमापन करण्याची सूचना होती, परंतु योग्य आदेश व यंत्रणा अस्तित्वात न आणल्यामुळे अशा मूल्यमापनाकडे दुर्लक्ष झाले.
माझे असे प्रांजळ मत आहे की, यापुढेही सरकारने हा निर्णय कायम ठेवावा व शिक्षण पद्धतीचे मूल्यमापन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने करावे. माझ्या मते कोणत्याही शिक्षण पद्धतीचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांमधील असलेले अंगभूत गुण व उपजत कला जोखून त्या जोपासणे व त्यांना योग्य तो वाव देऊन विद्यार्थ्याला एक सुजाण व समृद्ध नागरिक बनवणे हा आहेच. त्यामुळे विद्यार्थी हे परीक्षार्थी न बनता विद्यार्थीच राहतील व त्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळाल्यामुळे त्यांना स्वतःची ओळख तर होईलच आणि ते उर्वरित आयुष्यसुद्धा यशस्वीपणे, आनंदाने व समाधानाने घालवतील.
कोरोनाच्या साथीमुळे मिळालेल्या या सुसंधीचा सरकारने फायदा घ्यावा व प्रस्थापित शिक्षण पद्धतीचे नवीन दृष्टिकोनातून मूल्यमापन करावे, ज्यामुळे नवीन किंवा येणारी पिढी, विद्यार्थी, परीक्षार्थी व पोटार्थी या मार्गावरून न जाता आपल्या प्रापंचिक समस्या व जबाबदाऱया, योग्यरीत्या सांभाळून आयुष्यात यशस्वी व आनंदी होतील.
वेदकाळातील गुरुकुल पद्धती अशक्य आहे, पण आताच्या परिस्थितीतही जर शाळांमधून विद्यार्थ्यांचे अंगभूत कलागुण ओळखून जर पहिलीपासून योग्य मूल्यमापन केले आणि त्यांना योग्य त्या संधी वेळेवर उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच विद्यार्थ्यांसहित आपणा सर्वांना त्याचा फायदा होईल आणि या ‘रॅट रेस’मध्ये नवीन पिढी समाधानाने व निकोप मनाने जगू शकेल.
आपल्या प्रत्येक शिक्षण पद्धतीचे सर्व जगाने कौतुकच केले आहे, परंतु ब्रिटिश राजवट आल्यानंतर मेकॉलेने जी शिक्षण पद्धती ब्रिटिश राज्यकारभार राबविण्यासाठी वापरली त्यातून विद्यार्थी नष्ट होऊन त्यातील मानवी भावनासुद्धा नष्ट झाल्या व यंत्रमानवच तयार झाले. परीक्षा द्या, पास व्हा, नोकरी करा व गुजराण करा अशी एक पोटभरू संस्कृती उदयास आली. तीच सध्या वापरात आहे. त्यामुळे शिक्षण हा केवळ उपचार झाला आहे व शिक्षित लोकांपेक्षा पदवी घेऊन पढतमूर्ख जास्त तयार झाले आहेत.
माझे असे मत आहे की, शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर, स्वभावावर, गुणांवर, अवगुणांवर, कला-कौशल्यावर शिक्षकांनी योग्य लक्ष ठेवावे व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे. पहिलीतून दुसरीत जाताना व पुढील प्रत्येक वर्गात प्रवेश करताना, वरील गुण व वैशिष्टय़ांचा विचार व्हावा. त्याचे योग्य ते गुण द्यावे त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख तर मिळेलच, पण त्यांच्या आवडीप्रमाणे आयुष्य अनुसरण्याची संधीदेखील मिळेल. आयुष्यामध्ये परीक्षा ही आवश्यकच आहे. त्यामुळे आपणास स्वतःचे परीक्षण व मूल्पमापन करता येते आणि आपला दर्जा, कुवत आपण ओळखू शकतो, परंतु या गोष्टी ठरवताना केवळ अभ्यासक्रमातील आवश्यक विषयांचा विचार न करता किंवा त्यामध्ये मिळालेल्या गुणांवर विसंबून न राहता विद्यार्थ्यांच्या इतर गुणांचे, वागणुकीच्sा, शिस्तीचे व कौशल्याचेसुद्धा मूल्यमापन व्हावे. त्यामुळे त्याला मिळालेल्या गुणांमधून त्याचे खरे व्यक्तिमत्त्व प्रतीत होऊ शकेल.































































