विशाल मनाचा नेता ‘ज. वि.’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिवाकर शेजवळ  

 ‘दलित पँथर’चे एक संस्थापक नेते आणि भारिप-बहुजन महासंघाचे प्रवक्ते, ज.वि. पवार यांच्यावरील ‘अमृत महोत्सवी’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन आज दादरच्या ‘डॉ. आंबेडकर भवन’ येथे होत आहे. त्यातील एक लेख.

 ‘कलमबाजीचा शहेनशहा’ असलेले ज. वि. पवार यांनी यंदाच अमृत महोत्सव साजरा केला आहे. ज. वि. आणि पद्मश्री नामदेव ढसाळ हे दोघे 1972 सालात स्थापन झालेल्या दलित पँथर या आक्रमक आणि लढाऊ संघटनेचे मूळ संस्थापक होते. पँथरच्या बरखास्तीनंतर या दोघांचा सामाजिक, राजकीय प्रवास भिन्न म्हणण्यापेक्षा परस्परविरोधी वाटांनी झाला हे सर्वश्रुत आहे. मतभेद आणि एकमेकांच्या विरोधात घेतलेल्या भूमिका, केलेले लिखाण यामुळे मानवी स्वभावाप्रमाणे त्यांचा एकमेकावर रोष पैदा होणे नैसर्गिकच होते, पण या दोघांमध्ये एकमेकांना टाळण्याइतकी कटुता कधीच निर्माण झाली नव्हती. साहित्य आणि चळवळ या विषयावर ज. वि. आणि नामदेव हे दोघे अनेकदा एकत्र आले, एका व्यासपीठावर आले. त्या दोघांतील मैत्री आणि खेळीमेळीचेच दर्शन नेहमी घडायचे. मात्र एकदा आजारपणाच्या काळात नामदेव ढसाळ यांचा ज. वि. पवार यांच्याशी कडाक्याचा वाद झाला आणि तोही वृत्तपत्रातून घडला होता. त्याचा मी साक्षीदार ठरलो होतो. त्या वादातून ‘दिलदार’ ढसाळ यांच्या रागाचे दर्शन जसे पाहिल्यांदा घडले होते तसेच जविच्या ‘विशाल’ मनाचे दर्शन घडले होते. त्यावेळी मी ठाण्यातील ‘लोकनायक’ या दैनिकाचा कार्यकारी संपादक होतो. ढसाळ यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यात आर्थिक अडचणी होत्या. त्यावेळी त्यांनी एकदा तर मला आणि ‘लोकनायक’चे मालक दिवंगत कुंदन गोटे यांना पत्र हाती देत मदत मिळवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्याकडेही पाठवले होते. ढसाळ यांच्यावरील उपचारांची अशी भ्रांत पडलेली असताना ज. वि. पवार, मी आणि कुंदन गोटे बॉम्बे हॉस्पिटलला सतत जात होतो. त्या परिस्थितीत ज. वि. यांनी ढसाळ यांच्यावरील उपचारांसाठी मदतीचे आवाहन करणारा एक लेख तातडीने लिहून माझ्या हाती दिला होता. मी तो लेख दुसर्‍याच दिवशीच्या अंकात 29 ऑगस्ट 2007 रोजी प्रसिद्ध केला होता. ढसाळ यांना आजारपणातून वाचवण्यासाठी महागडे उपचार आणि त्यासाठी पैशांची निकड आहे हे त्यातून दलित जनतेपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला खरा, पण तो तुटपुंजा होता, त्याने काम भागणारे नव्हते.

अशा आणीबाणीच्या वेळेस बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नामदेव ढसाळ यांच्या मदतीला धावून आले होते. त्यांनी पाच लाख रुपये लगेच बॉम्बे हॉस्पिटलकडे जमा केले होते. त्यापाठोपाठ सलमान खान यानेही एक लाख रुपयांची मदत ढसाळ यांच्या उपचारासांठी दिली होती. त्या मदतीचे सारे श्रेय ज. वि. पवार यांनाच जाते. ज. वि. पवार यांनी ढसाळ यांच्या मदतीसाठी ‘लोकनायक’मधून लिहिलेल्या लेखावरून ‘मुंबई मिरर’ या बड्या इंग्रजी वृत्तपत्राने ढसाळ यांच्या आजारपणाची ठळक बातमी केली होती. ही बातमी अमिताभ आणि सलमान यांच्यापर्यंत पोहोचली. ही गोष्ट इथेच संपत नाही. अमिताभ यांनी ढसाळ यांच्यासाठी मदतीचे पाऊल उचलण्यामागे ‘मुंबई मिरर’मधील बातमीच नव्हती, तर दस्तरखुद्द ज. वि. पवार होते.

ज. वि. हे बँक ऑफ इंडियातून मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. एकेकाळी ते त्या बँकेच्या जुहू येथील शाखेत डेप्युटी मॅनेजर या पदावर होते. बच्चन कुटुंबाचे खाते त्याच शाखेत होते. अमिताभ बच्चन हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले असतानाच्या काळात त्यांना जविंनी आपल्या अधिकारात मदत केली होती. या पार्श्वभूमीवर ज. वि. पवार यांनी ढसाळ यांच्या मदतीसाठी ‘मुंबई मिरर’मधून केलेल्या आवाहनाच्या बातमीने अमिताभ बच्चन यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातच ढसाळ आणि अमिताभ हे समदुःखी होते हे इथे लक्षात घेतले पाहिजे. ढसाळ यांना 1980 सालात जडलेल्या ‘मायस्थेनिया ग्रेव्हिस’ या आजाराने अमिताभ यांनाही ग्रासले होते.

नामदेव ढसाळ हे बरीच वर्षे दैनिक ‘सामना’मध्ये ‘सारे काही समष्टीसाठी’ हा स्तंभ लिहायचे. मी ‘लोकनायक’मध्ये असताना त्यांचा ‘चौथी मिती’ हा स्तंभ सुरू केला होता. त्यावेळी मुंबई हॉस्पिटलमधून बरे होऊन बाहेर पडल्यानंतर ढसाळ यांनी ‘सामना’तील एका लेखात त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मिळालेल्या अर्थसहाय्यासंदर्भात ज. वि. पवार यांच्याविषयी विपरीत लिहिले होते. अमिताभ यांचे सोडा, मैत्रीला जागून ज.विं.नीसुद्धा स्वतः मदत करायला हवी होती, अशी ढसाळ यांची भावना होती. मात्र ज.विं.बद्दलचे त्यांचे ते लिखाण त्यांच्या पत्नी मल्लिकाताईंनादेखील आवडले नव्हते. जविंनी आवाहन केले म्हणून तर अमिताभने मदत केली असे मल्लिकांनी ढसाळ यांना सुनावले होते.

त्या लेखाबद्दल माझ्यासहित आंबेडकरी चळवळीतील अनेक जणांनी आपली नाराजी ढसाळ यांच्यासमोर बोलून दाखवली होती. त्यामुळे ज. वि. पवार हे किती दुखावले असतील याची कल्पना कोणालाही येऊ शकते. तरीही कटुता वैरभाव न जोपासता जविंनी मोठय़ा मनाचे दर्शन घडवल्याचे सर्वांनाच दिसले होते. नामदेव ढसाळ यांच्या अंत्ययात्रेतील जविंचा रडून रडून सुजलेला चेहरा कोण विसरू शकेल?

नामदेव ढसाळ यांचे 15 जानेवारी 2014 रोजी निधन झाले. त्यांना असाध्य आजाराने तब्बल चार दशके वेढले होते. आजारपणाच्या काळात वेदना सोसताना ‘दलित पँथर’च्या फुटीनंतर झालेल्या त्रासाच्या आठवणी त्यांना यातना देत असाव्यात. आपल्या राजकीय वाताहतीला जे कोणी कारणीभूत आहेत असे त्यांना वाटायचे त्या व्यक्तीविषयी ढसाळ यांचा राग तीव्र होताना दिसायचा. त्याचाच फटका एकदा ज. वि. पवार यांना बसला होता. ढसाळ यांना दलित पँथरमधून राजा ढाले यांनी बाहेर काढले होते. त्यानंतर ज. वि. हे ढाले यांच्यासोबत राहिले होते तसेच ज. वि. यांनी दलित पँथरबद्दल केलेल्या लिखाणात आपल्याला न्याय दिला नाही असा ढसाळ यांचा समज झाला होता. त्यातून ते जविंवर बरसले होते.

ढसाळ यांचा तो राग रास्त की अनाठायी होता हा विषय वेगळा, पण ज. वि. पवार हे आंबेडकरी चळवळीतील विशाल मनाचे आणि पक्षीय लेबलापलीकडचे नेते आहेत हे निर्विवाद सत्य आहे. आजघडीला ते भारिप – बहुजन महासंघाचे केंद्रीय नेते आहेत, पण त्या पदापेक्षा त्यांची ओळख, प्रतिमा आणि कामगिरी मोठी आहे. त्यामुळे चळवळीतील त्यांच्या मुक्त संचारात पक्षीय लेबल अडसर बनू शकले नाही. आंबेडकरी चळवळीतील ज. वि. हे चालता बोलता ज्ञानकोश आहेत. ते एखाद्या सभेत रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्यावर ‘आमने सामने’ टीका करतात, पण सभेनंतर ‘‘ज.वि., चला माझ्या गाडीत बसा, बोरिवलीला घरी सोडतो’’ असा आग्रह आठवले धरतात. पँथरच्या या अजातशत्रू संस्थापक नेत्याची महती आणखी काय सांगावी!  

नामदेव ढसाळ यांचे 15 जानेवारी 2014 रोजी निधन झाले. त्यांना असाध्य आजाराने तब्बल चार दशके वेढले होते. आजारपणाच्या काळात वेदना सोसताना ‘दलित पँथर’च्या फुटीनंतर झालेल्या त्रासाच्या आठवणी त्यांना यातना देत असाव्यात. आपल्या राजकीय वाताहतीला जे कोणी कारणीभूत आहेत असे त्यांना वाटायचे त्या व्यक्तीविषयी ढसाळ यांचा राग तीव्र होताना दिसायचा. त्याचाच फटका एकदा ज. वि. पवार यांना बसला होता. 

[email protected]