लेख – तासन्तास बसून राहण्याचा धोका

>> डॉ. विवेक महाजन

आपण बसतो तेव्हा उभे राहणे किंवा चालण्याच्या तुलनेत कमी ऊर्जेचा वापर करतो. संशोधनातून निदर्शनास आले आहे की, बरेच तास बसून राहिल्याने विविध आरोग्यविषयक आजार होतात. यामध्ये लठ्ठपणासह इतर आजार, जसे हाय ब्लड शुगर, कमरेच्या भोवती जादा चरबी आणि असामान्य कॉलेस्टेरॉल पातळ्या यांचा त्रास होतो. बरेच तास बसून राहिल्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर आजार व कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोकादेखील वाढतो.

तुम्हाला माहीत आहे का, सलग बरेच तास बसून राहिल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजार व कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढू शकतो? खरे तर डेस्कसमोर, दुचाकीवर किंवा स्क्रीनसमोर अशा कोणत्याही स्थितीमध्ये तासन्तास बसून राहणे घातक ठरू शकते.

विविध अभ्यासांमधून निदर्शनास आले की, कोणत्याही शारीरिक हालचालींशिवाय दिवसातून आठ तासांपेक्षा अधिक काळ बसून राहणाऱया व्यक्तींना लठ्ठपणा किंवा धूम्रपानामुळे होणाऱया मृत्यूचा धोका समान होता. म्हणूनच बैठे काम करण्याची जीवनशैली तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दिवसादरम्यान कमी वेळ बसणे किंवा काम करताना काही वेळ उताणी पडणे अशा गोष्टींमुळे जीवन आरोग्यदायी राहू शकते. हे खरे आहे की, महामारीमुळे बहुतांश लोक त्यांच्या घरांमध्येच आणि घरातूनच काम करत असल्यामुळे अधिक वेळ काम करावे लागत असून बरेच तास स्क्रीनसमोरच बसून राहावे लागत आहे, पण त्यामुळे आरोग्यावर अनेक प्रतिकूल परिणाम होतात.

मनुष्यजातीची रचना ताठ उभे राहण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. आपले हृदय व कार्डिओव्हॅस्क्युलर यंत्रणा त्यानुसार अधिक कार्यक्षमपणे कार्य करतात. आपण ताठ राहिल्यास आपल्या आतडय़ांचे कार्यदेखील अधिक कार्यक्षमपणे होते. हॉस्पिटलमध्ये अंथरुणाशी खिळून राहिलेल्या लोकांमध्ये त्यांच्या आतडय़ांच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होणे हे सामान्य आहे, नाही का? याप्रमाणेच दीर्घकाळापर्यंत बसून राहणे किंवा हालचाल न करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

पाय आणि ग्लुटेल्स – बराच वेळ बसून राहिल्याने पाय व ग्लुटेलमधील मोठे स्नायू कमकुवत होऊन त्यांचे नुकसान होऊ शकते. हे मोठे स्नायू चालण्यासाठी आणि स्थिर उभे राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे स्नायू कमकुवत असतील तर आपल्याला पडल्यामुळे आणि व्यायामामुळे दुखापत होण्याची अधिक शक्यता आहे.

चयापचय समस्या – स्नायूंच्या हालचालीमुळे आपण सेवन करत असलेले मेद व शर्करांचे पचन होण्यामध्ये मदत होते. बराच वेळ बसून राहिल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो, ज्यामुळे शरीरामध्ये मेद व शर्करा तसेच राहतील.

सांध्यांच्या समस्या – बराच वेळ बसून राहिल्यामुळे हिप फ्लेक्झर स्नायू कमकुवत होतो, ज्यामुळे नितंबाच्या सांध्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. बराच वेळ बसून राहिल्याने, विशेषतः अयोग्य बसण्याची स्थिती किंवा योग्यरीत्या डिझाइन न केलेली खुर्ची किंवा वर्क स्टेशनमध्ये बसून राहिल्याने पाठीसंबंधित समस्यादेखील होऊ शकतात. तुम्ही व्यायाम करत असाल, पण बराच वेळ बसून राहत असाल तरीदेखील तुम्हाला मेटॅबोलिक सिंड्रोमसारखे आरोग्यविषयक आजार होण्याचा धोका आहे.

कर्करोग – नवीन अभ्यासांचा सल्ला आहे की, बराच वेळ बसून राहिल्याने कर्करोगाचे काही प्रकार जसे फुप्फुसाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व कोलन कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

उपाय काय?

  • शारीरिकदृष्टय़ा सक्रिय आहात तर तुमच्यामधील ऊर्जा पातळ्या व सहनशक्ती सुधारते आणि हाडे बळकट राहतात. शक्य असेल तर काही वेळ उभे रहा किंवा काम करताना चालण्याचा प्रयत्न करा.
  • दर 30 मिनिटांनी बसण्याच्या स्थितीमधून काहीसा ब्रेक घ्या.
  • फोनवर बोलताना किंवा टेलिव्हिजन पाहताना उभे रहा.
  • डेस्कवर काम करत असाल तर स्टॅण्डिंग डेस्क निवडा किंवा उंच टेबल किंवा काऊंटरसह सुधारणा करा.
  • तुमच्या कामाचे साहित्य ट्रेडमिलवर ठेवा, जसे कॉम्प्युटर स्क्रीन व कीबोर्ड स्टॅण्डवर किंवा विशेषीकृत ट्रेडमिल-रेडी व्हर्टिकल डेस्कवर ठेवा, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हालचाल करता येऊ शकते.
  • हालचाल किंवा रमतगमत केलेल्या हालचालीचा परिणामदेखील उत्तम ठरू शकतो. ही सुरुवात केल्यास तुमच्या शरीरातील अधिक कॅलरीज निघून जातील. ज्यामुळे वजन कमी होऊन ऊर्जा पातळ्या वाढू शकतात. तसेच शारीरिक व्यायामामुळे स्नायूंची शक्ती कायम राखण्यामध्ये मदत होते, परिणामतः मानसिक आरोग्य उत्तम राहते.
आपली प्रतिक्रिया द्या