देवघर

3113

>> संगीता कर्णिक

आपल्या घरातील देवघर. मुंबईतील घरात देवाला राहत्या जागेसाठी तडजोड करावीच लागते. पण जरा नीट विचार केला तर आपले देवघर व्यवस्थित जागेत प्रस्थापित होऊ शकते.

घरातील  शांतता, निवांतपणा देणारी जागा म्हणजे ‘देवघर’. देवघर म्हणजे आपल्या घराचा आरसा असे म्हटले जाते. कारण घरात असणाऱ्या देव्हाऱ्यातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्त्विक लहरी, सकारात्मकता याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला आणि वास्तूलाही होत असतो. नियमित केलेल्या देवपूजेचा फायदा मनालाही होतो. बाहेरून थकून भागून आल्यावर किंवा रोजच्या मानसिक ताणतणावाच्या व्यस्ततेत देव्हाऱ्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटते. पूर्वीच्या काळी एका स्वतंत्र खोलीत देवघर असायचे. आता मात्र लहानशा घरातच छोटासा किंवा उपलब्ध जागेप्रमाणे देव्हारा ठेवला जातो. पाहूया, शास्त्रानुसार देवघर कसे असावे-

प्रत्येक माणसाच्या घरात देव्हारा असणे आवश्यक आहे. आई-वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याच्याही घरी स्वतंत्र देव्हारा असावा. देवघर सुशोभित, सुंदर असल्यास मनाला प्रसन्नता लाभते. त्याच्यावर शुभचिन्ह काढलेले असावे. शक्यतो ते लाकडाचेच असावे. यामध्ये खैर, देवार्जुन, साग, शिसम या लाकडापासून तयार केलेले देवघर असेल तर अतिउत्तम.

दत्तक घराणे आणि यंत्र मांडणी

डाव्या सोंडेचा गणपती, 2 ते 3 यंत्रे असली तरी चालतील. यंत्रे ही देवाची आसने असल्याने ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. मात्र, एकाच देवतेची मूर्ती व तसबीर (फोटो) असेल तर हरकत नाही. दत्तक गेलेल्या घराण्याचे  किंवा बुडीत घराण्याचे (वंशज नसलेले घराणे) देव देवघरात अजिबात पुजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे. नाहीतर पूजकाचीसुद्धा वंशबुडी होते असे म्हटले जाते. नैवेद्याचेही खूप महत्त्व आहे. देव्हाऱ्यात सकाळ-संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा. सकाळी लवकर डबा किंवा लहान मुलांना जेवण खाऊ घालायचे असेल तर देवाला दाखवायचा नैवेद्य बाजूला काढून ठेवावा. जे कुटुंब देवांना न चुकता नैवेद्य देतात, त्यांना जीवनात दोन्ही वेळच्या अन्नाची कमतरता पडत नाही असे म्हणतात.

दिशा कोणती असावी?

देव्हारा ईशान्य दिशेला असणे चांगले समजले जाते. कारण ईश्वराचे अधिष्ठान ईशान्य दिशेला असते. देव्हाऱ्याची योग्य जागा ईशान्य कोपऱ्यात असावी. वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते. ईशान्य कोपरा शक्य नसल्यास उत्तर भिंतीच्या बाजूला मध्यावर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून देव्हारा ठेवला तरी हरकत नाही. देव्हारा वास्तूच्या किंवा त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ किंवा नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये. असल्यास अतिपीडा उद्भवण्याचा धोका असतो.

कळस असावा का?

घरातल्या देव्हाऱ्याला कळस असू नये. कारण कळस हे मुळात भव्यतेचं प्रतीक मानलं जातं. आपलं घर हे मंदिरापेक्षा भव्य नाही, तसेच कळसाकडून लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळते. कळसाची शक्ती लाखो लोकांना ऊर्जा देते. एवढी ऊर्जा आपल्या घरात आली तर आपल्याला ती झेपणार नाही. त्यामुळे कळस मंदिरालाच असावा. देवघराला असू नये.

रचना कशी असावी?

  • शास्त्रानुसार देवघर ईशान्येस असणे अत्यंत चांगले समजले जाते. घर दोन किंवा तीन मजली असेल तर तळमजल्यावर देवालय असावे.
  • देवघरासाठी फिकट पिवळ्या रंगाचा उपयोग करणे शुभ मानले जाते.
  • मूर्ती एकमेकांच्या समोर ठेवू नयेत. पूजाघराच्या वर किंवा खाली शौचालय नसावे.
  • दिवा नेहमी देवाच्या समोरच प्रज्वलित करावा. शयनगृहात देव्हारा ठेवू नये.
  • देवघर नेहमी स्वच्छ राहील, त्याची नियमित पूजा होईल हे पाहावे.
  • भग्न मूर्ती किंवा देवतांचे चित्र लवकर विसर्जित करावे.
  • देव्हाऱ्यात दोन गणपती, दोन अन्नपूर्णा, दोन बाळकृष्ण अशा दोन दोन मूर्ती ठेवू नयेत. त्यामुळे त्रासदायक स्पंदने निर्माण होऊन त्याचा त्रास घरात जाणवू लागतो.
  • देवाचे फोटो दक्षिणेला लावू नयेत. तसेच देव्हाऱ्याच्या वर निर्माल्य माळा असू नयेत.
  • तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी. पूजाघर भिंतीत कोरून करू नये अगर देव्हारा संपूर्ण भिंतीत चिकटवून ठेवू नये. प्राचीन मूर्तींचे भग्नावशेष पूजाघरात ठेवू नये.
  • देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात. कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबीर, इष्ट देवतेचा फोटो अगर मूर्ती, बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी.

 लेखिका वास्तुतज्ज्ञ आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या