आभाळमाया – कालगणना…

गेल्या 17 सप्टेंबरला अमावस्या होती. खगोलीय पद्धतीने विचार केला तर अमा म्हणजे एकत्र आणि ‘वसती’ म्हणजे राहणे. मग आजच्या दिवशी कोण एकत्र राहतं, तर चंद्र आणि सूर्य. आता त्यांचं एकमेकांपासूनचं प्रचंड अंतर पाहता ते ‘एकत्र’ येणे अशक्यच. शिवाय सूर्य आपल्या ग्रहमालेचा जनक तारा तर चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे त्यांची तशी तुलनाच होऊ शकत नाही, पण वैश्विक योगायोगाने जे ‘चमत्कार’ घडतात, त्यात पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर आणि चंद्राचा-सूर्याचा आकार यांचं इतकं अजब गणित जमतं की, एखाद्या अमावास्येला ‘चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्ण झाकू शकतं याचा अर्थ पृथ्वीवर राहणाऱया आपल्यासारख्यांना तसं दिसतं. तेच खग्रास सूर्यग्रहण. आजच्या अमावास्येला असं कुठलं ग्रहण नाही. मग या आवसेचं महत्त्व काय? (अमावास्येच्या दिवशी चंद्र सूर्याबरोबर उगवतो व मावळतो. तो सूर्यतेजात लोपलेला असतो)

खरं तर 18 तारखेला आश्विन प्रतिपदा आणि परंपरेने नवरात्रोत्सव सुरू व्हायला हवा होता. परंतु या वर्षी पुढचा संपूर्ण चांद्र महिना आश्विन हा ‘अधिक’ मास आहे. चांद्रवर्षात दर बत्तीस महिने गेले की, येणारा एक जास्त महिना. हा अधिक आश्विन आजपासून ऑक्टोबरच्या 16 तारखेपर्यंत असेल. हा सगळा सौर आणि चांद्र कालगणनेतील तफावतीचा परिणाम आहे. कसा ते सोप्या शब्दांत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसांत फिरते आणि एक सौर वर्ष पूर्ण होते. आपला सौर दिवस चोवीस तासांचा असतो आणि एप्रिल, जून, सप्टेंबर व नोव्हेंबर हे महिने तीस दिवसांचे, फेब्रुवारी 28 किंवा ‘लीप’ वर्षात 29 दिवसांचा आणि उरलेले 7 महिने 31 दिवसांचे असतात. पाश्चात्त्य, ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये चार वर्षांतून एक ‘अधिक दिवस’ पाळून वार्षिक कालगणनेचा हिशेब अबाधित ठेवला जातो. चंद्र मात्र पृथ्वीभोवती 27 दिवसांत फिरतो आणि चंद्राचं पृथ्वीभोवतीचं लंबवर्तुळाकार कक्षेतील परिभ्रमण लक्षात घेता चांद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक पडतो. साहजिकच दर तीन वर्षांनी चांद्र वर्षाला सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी एका महिन्याची बेरीज करावी लागते. कारण चांद्र वर्ष 354 सौर दिवसांचे होते.

हिंदुस्थानात सर्वत्र चांद्र दिनदर्शिका वापरली जाते. त्यामध्ये नववर्ष दिवसात काही भेद असले तरी सणवार चांद्र तिथीनुसार असतात. यामध्ये फक्त एकच सौर सण असतो तो सूर्याच्या मकर राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱया संक्रमणाचा. त्यामुळे संक्रांतीची 14 जानेवारी ही तारीख बदलत नाही.

मात्र दिवाळीचा सण आश्विन महिन्यातील शेवटचे दोन व कार्तिक महिन्यातील पहिले दोन दिवस असा असतो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती किंवा फाल्गुनी पौर्णिमेला होळी हे सारं चांद्र तिथीवर ठरतं. त्याची सांगड आपल्याकडच्या ऋतुचक्राशी घातलेली आहे आणि त्यावरच परंपरा आधारित आहेत, परंतु ‘अधिक’ मासाची योजना नसेल तर साधारण मार्च महिन्याच्या अखेरीस येणारी होळी दरवर्षी 11 दिवसांनी मागे येत एखाद वेळी ऑगस्ट महिन्यात आली तर पाऊस असेल. त्यामुळे अधिक महिन्याची योजना अचूक ठरते.

यावर्षी आश्विन महिना ‘अधिक’ आहे. याचा अर्थ भाद्रपद महिना संपल्यावर सुरू झालेला आश्विन अधिक असणार. एक चांद्रमास ज्या अमावस्येला संपतो त्यावेळी सूर्याचा राशीबदल झालेला नसेल तर पुढचा महिना ‘अधिक’ मानला जातो आणि त्यानंतरचा ‘निज’ म्हणजे सणासुदींसाठी योग्य महिना समजला जातो. त्या महिन्याचं नावही तेच राहतं. म्हणूनच उद्यापासून ‘अधिक आश्विन’ आणि 16 ऑक्टोबरपासून ‘निज’ आश्विन सुरू होईल. परिणामी दसरा यंदा 25 ऑक्टोबरला आणि दिवाळीही नोव्हेंबरात जाईल. पुढच्या वर्षी गणपतीसुद्धा इंग्रजी तारखेने 11 दिवस उशिरा येणार.

सलग चांद्र मासांचं वर्ष मानणाऱया कालगणनाही असतात, पण त्यांचे सण विशिष्ट चांद्र तिथीवर अवलंबून असले तरी सौर वर्षात ते मागे मागे जातात. त्यांचा ऋतुचक्राशी मेळ नसतो. शंभर सौर वर्षांच्या हिशेबात सलग चांद्रमासांची 100 वर्षे 96 वर्षांइतकी होतात. हे सर्व आकडे अगदी अचूक नसून जवळपासचे आहेत. आपल्याकडे वसिष्ठ सिद्धांतात अधिक मासाचा उल्लेख आहे. एका अधिक मासानंतरचा पुढचा अधिक मास 32 चांद्रमास 16 दिवस आणि 8 घटिकांनी येईल (एक घटिका म्हणजे सुमारे 24 मिनिटे!). तर अधिक मासाची ही थोडक्यात आणि ढोबळमानाने घेतलेली माहिती.

आपली प्रतिक्रिया द्या