मुद्दा – नेत्रदान; काळाची गरज

479

>> वैभव मोहन पाटील

माणूस आपल्याला मिळालेल्या अवयवांची विशेष काळजी घेत असतो. कान, नाक, डोळे, हात, पाय ही निटनेटकी व व्यवस्थित असतील तर मनुष्य आयुष्यात कितीही मोठय़ा संकटांना सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे हे अवयव जपण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो. मात्र समाजात आज एक किंवा अधिक अवयव नसणारे लोकदेखील मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यातूनच अवयवदानाची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात दृढ झाली. आज अवयवदानाने अनेक लोकांना नवसंजीवनी मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या सर्व अवयवांमध्ये अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील अवयव म्हणजे आपले डोळे. डोळे ही सजीवांना, त्यातही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी मानली जाते. मात्र सर्वांनाच ही देणगी मिळालेली नाही. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसऱया एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानाच्या माध्यमातून मनुष्याला अंधकारातून उजेडाकडे घेऊन जाणारी प्रक्रिया वैद्यक क्षेत्रात उपलब्ध आहे. त्यामुळेच नेत्रदानाची अनेक स्तुत्य उदाहरणे आपल्यासमोर सातत्याने येत आहेत. नेत्रदानासाठी सरकारी उपाययोजनांबरोबरच जगभरातील विविध सामाजिक, रुग्णालयीन संस्थादेखील पुढे येत आहेत. लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच नेत्रदानाबद्दल माहिती देण्यासाठी या संस्थांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येते. दरवर्षी 10 जून रोजी ‘जागतिक नेत्रदान दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रात प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नेत्रदान दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी विविध माध्यमांद्वारे नेत्रदानासाठी लोकांना प्रवृत करण्यात येते. त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान होत असल्याने आपल्या मृत्यूनंतर अंध व्यक्तीला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणू शकतो, त्याला दृष्टी प्रदान करू शकतो. दृष्टिविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पूर्णपणे केंद्रपुरस्कृत कार्यक्रमात अनेक नेत्रपेढय़ा आणि फिरती नेत्र पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. जनसामान्यात दृष्टिदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्र सरकारसुद्धा प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्या अंधत्व निवारण कार्यक्रमाच्या माध्यमातून नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. राज्यात नऊ लाखांपेक्षा जास्त लोक नेत्रहीन आहेत. राज्यातील अंध व्यक्तींची ही आकडेवारी पाहिली तर आपल्याला नेत्रदानाचे वाढते महत्त्व ध्यानात येईल. राज्यात अंधत्व निवारण आणि दृष्टिहिनांच्या मदतीसाठी विविध नेत्रशिबिर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज- गैरसमज असल्याचे आपण पाहतो. हे गैरसमज दूर करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. नेत्रदान, नेत्रपेढी, तिचे कार्य याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. एक वर्षावरील व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणी नेत्रदानाची लेखी स्वरूपात इच्छा व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यानंतर व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याचे नातेवाईक, मित्रमंडळींनी त्याच्या इच्छेचा मान राखत त्या व्यक्तीचे नेत्रदान करणे महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर 6 तासांच्या कालावधीत नेत्रदान होणे गरजेचे आहे. तेव्हा व्यक्तीच्या नातेवाईकांनी तत्काळ नेत्रपेढीत संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवले पाहिजे. त्यानंतर दृष्टिहिनांना मागणीनुसार या नेत्रपेढीतून नेत्रदान करण्यात येते. विशेष म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वापरत असलेल्या व्यक्तीही नेत्रदानास पात्र ठरतात. नेत्रदानाची प्रक्रिया फारशी गुंतागुंतीची नसून मृत्यूनंतर अवघ्या अर्ध्या तासात नेत्रदानाची प्रक्रिया पार पडते. नेत्रदानात संपूर्ण डोळ्याचे रोपण न करता केवळ डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण केले जाते. त्यामुळे डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्यात दोष असणाऱया व्यक्तींना या शस्त्र्ाक्रियेचा खूप लाभ होतो. नेत्रदानाद्वारे दृष्टी मिळालेले अनेक जण समाजात सन्मानाने व डोळसपणे वावरत आहेत. नेत्रदानाने दृष्टिहिनांच्या जीवनाला नवी दृष्टी प्राप्त होते. आपण नेहमीच निरनिराळ्या प्रकारचे दान, जसे अन्नदान, रक्तदान आणि विविध प्रकारच्या अवयवदानाबद्दल ऐकून असतो. मात्र नेत्रदानाने इतरांच्या आयुष्यात नवी दृष्टिदायक पालवी फोडण्याचे काम आपण करू शकतो. अवयवदानाबाबत लोकांमध्ये आज फार जागरूकता नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मरणानंतर नेत्रदानासारख्या पवित्र व सामाजिक कार्याचा भाग होण्याची निर्णयक्षमता अधिकाधिक लोकांमध्ये येणे काळाची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या