अनुबंध – फुलांचे सुगंधी निःश्वास!

>> अरुणा सरनाईक

सर्वच ऋतूंचे थोडेथोडे स्वभावधर्म घेऊनच की काय, भाद्रपद सजत असतो. वसंताचे फुलांचे वैभव, ज्येष्ठाचे फलवैभव श्रावणाचं हिरवे सौंदर्य, अश्विनाची सोनेरी उन्हं, हेमंताचे गार वारे, शिशिरातील कोवळी थंडी, असं सगळं काही एकत्र या ऋतूंत मिळतं. नाना ठिकाणी फिरून अनेक गोष्टी आत्मसात करून एखाद्यानं आपलं व्यक्तिमत्त्व बहुआयामी घडवावं आणि कायम लोकांचे आकर्षण बनावं तसा हा भाद्रपद बहुआयामी वाटतो. अष्टपैलु वाटतो. अगदी माळरानावर कोणीही बघत नसताना, आपली दखल घेतली जाणार नाही याची पुरेपूर जाणीव असताना ‘दिल अपना गाता है!’ सारखा हा भाद्रपद फुलत असतो.

श्रावणाच्या स्पर्शाच्या आठवणीतून अजूनही आपण बाहेर पडत नाही. मनामध्ये पावसाच्या आठवणी अद्याप ओल्या आहेत. तसा निसर्गही मेहेरबान आहेच. सरत्या श्रावणातल्या पाठोपाठ येणारा भाद्रपददेखील कधीमधी चिंब भिजवून टाकतोच. फक्त फरक इतकाच की श्रावणात लपलेली सोनेरी-पिवळी हळदीच्या रंगाची उन्हं बाहेर काढतो. पावसाच्या सततच्या येण्यानं हवेतला पावसाळी गंध हलका दूर होत जातो आणि निरनिराळय़ा फुलाचे सुगंधी निःश्वास आपल्याला सुखावू लागतात. एखाद्या कुशल तज्ञ माळय़ाप्रमाणे असणार हा भाद्रपद हवे तेवढे उन्ह, हवे तेवढेच पावसाचे पाणी शिंपतो आणि हलक्या नाजूक स्पर्शाने फुलांचे रूप-गंध सर्वार्थाने विकसित करतो. श्रावणातल्या पावसाच्या माऱ्याने जाई-जुई चमेलीचे सुवास जलमय होतात. आता मात्र प्रत्येकीचा गंध वेगवेगळा जाणवू लागतो. पाण्याबरोबर वाहून जाणारे फुलांचे सुगंध आता बराच काळ रेंगाळत राहतात. आपल्याला सुख देत राहतात. प्राजक्त, मधुमालती सकाळी तर सायंकाळी जाई-चमेली थकल्या मनाला दिलासा देतात. प्रत्येक फुलाची फुलण्याची वेळ ही ठरलेली असतेच. आपल्याही नकळत ही नोंद आपण घेतलेली असते. फुलांमध्ये आकर्षक लांब आकाराची चमेलीची कळी फुलल्यावर आणि नंतरसुद्धा आपल्याला गंधित करते. नवल असं की प्रत्येक सुगंधी फुलांचा गंध वेगेवगळा आहे याची जाणीव आपल्याला होत असते. प्रत्येक गंधामागे प्रत्येकाची एक सुगंधी आठवण मनाशी जपलेली असते. ती आठवण आपल्याही नकळत होऊन जात मनाला स्पर्शत असते. सगळय़ा तंतूंमधील ही ताकद सशक्त असते.

धरतीवरील ही सुखद जाणीव आणि आकाशातील इंद्रधनुष्य, हीच ठळक वैशिष्टय़े भाद्रपदाची. निळ्या नभात इंद्रधनुष्य दिसू लागल्यावर पावसानं आपलं आवरतं घेतलंय, असं खुशाल समजावं. तरी पण एखाद वेळी पावसाची चावट सर भिजवून जातेच. ज्यांना पावसाचं अनिवार आकर्षण त्यांना ही पर्वणीच वाटते. प्रियजनांची भेट कितीही वेळा झाली तरी त्यातील गोडी कमी होत नाही. तशी ही पावसाची सर केव्हाही कोणत्याही वेळी स्वागतार्ह वाटते. मला तर वाटतं सर्वच ऋतुंचे थोडेथोडे स्वभावधर्म घेऊनच की काय हा भाद्रपद सजतो. वसंताचे फुलांचे वैभव, ज्येष्ठाचे फलवैभव श्रावणाचं हिरवे सौंदर्य, अश्विनाची सोनेरी उन्हं, हेमंताचे गार वारे, शिशिरातील कोवळी थंडी, असं सगळं काही एकत्र या ऋतुत मिळतं. नाना ठिकाणी फिरून अनेक गोष्टी आत्मसात करून एखाद्यानं आपलं व्यक्तिमत्त्व बहुआयामी घडवावं आणि कायम लोकांचे आकर्षण बनावं तसा हा भाद्रपद बहुआयामी वाटतो. अष्टपैलु वाटतो. अगदी माळरानावर गावाबाहेर कोणीही बघत नसताना, आपली दखल घेतली जाणार नाही, याची पुरेपूर जाणीव असताना ‘दिल अपना गाता है!’ सारखा हा भाद्रपद फुलत असतो. पायाशी लडीवाळपणे स्पर्शणारी हिरवी हिरवळ ते झाडांचे टोक, आकाशाचे निळेपण सर्वत्र एक फुलण्याचा महोत्सव असतो. नगण्य अशा गवताला फुलं आणण्याचे सामर्थ्य भाद्रपदात आहे ते असे. लाकडावरसुद्धा फुलं फुलविण्याचे धारिष्टय़ यात आहे.

बाहेर टाकलेल्या लाकडाच्या फळकुटाचं या दिवसात निरीक्षण जरूर करा. त्यावरसुद्धा या दिवसात पिवळट रंगाची बसकट फुले फुललेली दिसतात. गवतात सापडणाऱ्या दुर्वांमध्येसुद्धा भरपूर विविधता आढळते. म्हणूनच वाटतं, सर्वांना फुलविण्याची, अगदी आपआपल्या परीने आनंद लुटण्याची संधी भाद्रपद देतो आणि मदतदेखील करतो. नवल वाटते ते निसर्गाचे. प्रत्येकाची जननशक्ती तो प्रत्येकाला पटवून देतो. स्वतःच्या जिवंतपणाची ओळख करून देतो. अगदी भल्या पहाटे घराबाहेर पडावं तर ओल्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी केशरी पिवळय़ा रानफुलांचे दर्शन होते. अस  वाटतं रात्रभर जागून कोणी फुलांच्या रांगोळय़ाच काढल्या आहेत आणि मग विहिणीच्या तोऱ्यात प्रत्येक जाणाऱ्याला स्वतःचा मान वाढला आहे याची सुखद जाणीव मनाला आनंद देत राहते. ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ अशा मनाच्या मस्तीत आपण आपले ताण तणाव क्षणभर का होईना, विसरून जातो. याचा अनुभव कोणी अजून घेतला नसेल तर या भाद्रपदात जरूर घ्या. अर्थात तो शेअर करावासा वाटला तरच. नाही तर आपला अनुभव आपणच घ्यावा. म्हणतात आनंद वाटल्यानं वाढतो. भाद्रपदात केलेले संजीवन निष्ठाचं  संगोपन अश्विनात पूर्णत्वाला जाते.

साऱ्याच ऋतुंचे ते एक एक असे स्वभाववैशिष्टय़ असते. परस्परांना पूरक असे हे ऋतू आपल्याला बरेच काही नियमितपणे शिकविण्याचा प्रयत्न करतात आणि गंमत अशी की, काय शिकलात? असा प्रश्न विचारत नाहीत. फक्त देत राहतात. समृद्ध करतात. आपल्याशी आपला संवाद घडविण्याचे शिकवितात. निसर्गातील बदल आपलेसे करण्याचे शिकवितात. निसर्गाची ही चित्रफीत आपल्यासमोर उघडी करून दाखवितात. अत्यंत व्यस्त अशा दिवसाच्या एखाद्या निवांत क्षणी अतिप्रिय आठवणीप्रमाणे आपल्याला आपले वैशिष्टय़ जाणवून देतात आणि मग आपणही नकळत स्वतःशी बोलून जातो, ‘अरे, आता हे दिवस सुरू झालेत की!’ आंब्याचा मोहोर निमूटपणे फुलत जातो. अरे हा उन्हाळा कसा आला, ही जाणीव  भाद्रपद करवून देतो. काळय़ाभोर रस्त्यावर हा पिवळा केशरी फुलांचा सडा, वरती आकाशात हलकेहलके वर येणारा सोबत गुलाबी सोनेरी प्रकाशाची उधळण करणारा आदित्य. या अशा वातावरणात मनावर होणारे संस्करण निश्चितपणे आपल्याला निसर्गाच्या जवळ पोहोचवून मोठे होण्याचे शिकवतो. निसर्ग कायम जागाच असतो. भाद्रपद आपल्यालाही जागे करीत जातो. फुले फुलू लागतात. फुलपाखंराचे जग निःशंक होते. त्यांचे बागडणे -विहरणे, सुखद अनुभूती देते. आषाढात नाहीशा झालेल्या पाकोळ्या पुन्हा फिरून आपल्या नाचऱ्या पंखांनी पावले उमटवत राहतात. जणू काही पुढे येणाऱ्या अश्विनाच्या स्वागत पताकाच वाटतात.

आपली प्रतिक्रिया द्या