
>> साधना गोरे
पावसाळा म्हटला की, हिरव्या हिरव्या गालिच्यांनी नटलेला निसर्ग, दुथडी भरून वाहणारे धबधबे आणि नद्या, खड्डय़ांमुळे झालेली रस्त्यांची चाळण, वाहतुकीचा खोळंबा, तुंबलेली गटारे आणि नाले ही ठरलेली दृश्ये आहेत. तसं पाऊस आणि छत्री यांचंही एक अनोखं नातं आहे. काही जण कडक उन्हाळ्यापासून संरक्षण व्हावं म्हणूनही छत्री वापरतात, पण रंगीबेरंगी छत्र्यांचं मनोहारी दृश्य दिसतं ते ऐन पावसाळ्यातच! निसर्गातल्या हिरवळीइतपंच जिथतिथं दिसणाऱया रंगीबेरंगी छत्र्यांचं रूपही डोळ्यांना सुखावतं. प्राचीन काळी मात्र भारतात आणि जगभरातच छत्रीला एक राजकीय व धार्मिक महत्त्व असल्याचं दिसतं.
‘छत्री’ या शब्दाचं मूळ संस्कृत ‘छत्रः’ शब्दात आहे. मराठीतील काही जुन्या ग्रंथांत ‘छत्री’चं रूप ‘छतरी’ असंही आहे. छत्रीचा ‘छतरी’ असा हळुवार उच्चार आजच्या उर्दू, हिंदी, पंजाबी या भाषांमध्ये होताना दिसतो, तर आजच्या मराठीप्रमाणे ‘छत्री’ असा उच्चार गुजराती, बंगाली या भाषांमध्ये केला जातो. कश्मिरीमध्ये हा उच्चार ‘छतुरॅय्’, सिंधीमध्ये ‘छटी’, उडियामध्ये ‘छाता’, असामीमध्ये ‘छाट’ किंवा ‘छाती’ असा होतो. या उत्तर भारतीय भाषांखेरीज द्राविडी भाषांतील कानडीमध्येही ‘छत्री’ म्हटलं जातं.
पूर्वीच्या काळी छत्र किंवा छत्री हे राजसत्तेचं प्रतीक मानलं जात असे. अनेक राजे, सरदार इ. मंडळींच्या डोक्यावर सावलीसाठी छत्र धरले जाई. अनेक राजांची सिंहासनेही छत्रयुक्त असत. राजाचं हे ‘छत्र’ म्हणजे एक प्रकारचं राजचिन्हच असे. एकछत्री, छत्रधारी, छत्रपती या शब्दाचं मूळ या राजचिन्हातच असल्याचं दिसतं. शिवाजी महाराजांनी ‘छत्रपती’ ही पदवी धारण केली होती आणि ती त्यांच्या वंशात शेवटपर्यंत होती. ‘व्युत्पत्तिकोश’कार कृ. पां. कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे नंतरच्या काळात ‘छत्र’ शब्दाच्या अर्थात आणि उपयोगात बरीच क्रांती झालेली दिसते. अलीकडील काळात समुद्रकिनारा, उपाहारगृहे इ. ठिकाणी मोकळ्या हवेत बसल्यावर उन्हाचा ताप होऊ नये म्हणून छत म्हणजे मोठय़ा आकाराच्या छत्रीचा वापर केला जातो. समाधीवर सावलीसाठी छत्रीच्या आकाराचं बांधकाम करण्याची प्रथा तर फार जुनी असल्याची दिसते. त्यावरून काही भागांत समाधीला ‘छत्री’ असंही म्हटलं जातं.
राजाच्या डोक्यावरील ‘छत्र’ हे राजचिन्ह असलं तरी आजच्या मराठीत ‘छत्र धरणे’ म्हणजे एखाद्याला आधार देणं, त्याचं भरणपोषण करणं असा अर्थ रूढ झालेला आहे. याच्या उलट छत्रभंग, छत्र हरपणं किंवा मोडणं म्हणजे आधार नाहीसा होणे, पोषिंदा मरण पावणं असा अर्थ होतो. छत्र हे मुळातच सत्तेचं प्रतीक असल्याने थेट सत्तेच्या अधिकाराशी जोडलेली ‘छत्र गेले म्हणजे कुत्रेसुद्धा विचारत नाही’ अशी एक म्हणही आहे. ‘छत्रपती की पत्रपती’ अशीही एक म्हण आहे. याचा अर्थ डोक्यावर छत्र तरी असावं किंवा अगदी कफल्लक अवस्थेत पानावर जेवण्याची पाळी यावी. म्हणजे एक तर राजा असावं किंवा भिकारी असावं, मध्यम स्थितीतील लोकांचे फार हाल होतात. त्यांना अब्रूने तर रहावं लागतं, पण पुरेसा पैसा नसला तर भीकही मागता येत नाही.
संस्कृत ‘छत्रः’ या शब्दाच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ अळिंब किंवा अळंभे असाही आहे. वरच्या बाजूला गोलाकर घुमट आणि मधोमध देठ अशा आकारातली ही अळिंब वनस्पती म्हणजे तीच, जिला आपण ‘कुत्र्याची छत्री’ या नावानं ओळखतो. या वनस्पतीचं पोषण प्राण्यांचं मलमूत्र, विष्ठा तसंच मृत प्राणी, वनस्पती यांच्याद्वारे होत असतं. त्यामुळे कुत्री मुतण्याच्या हमखास जागी या वनस्पती उगवलेल्या दिसतात. महाराष्ट्राच्या काही भागांत या छत्रीला थेट ‘कुत्र्याचा मूत’ असंही म्हणतात. हिंदीमध्येही तिला ‘कुकुरमुत्ता’ असंच नाव आहे.
या शिवाय अळिंबीला ‘भूछत्र’ किंवा ‘भुईछत्री’ असंही नाव आहे. हेही नाव तिच्या आकाराचं द्योतकच म्हणता येईल. याशिवाय तिचं आणखी एक विनोदी म्हणता येईल असं नाव म्हणजे ‘आदित्याची छत्री.’ आदित्य म्हणजे सूर्य, पण ही भुईलगत असणारी इवलीशी वनस्पती, जो सगळ्या सृष्टीला तापवतो त्या सूर्याचीच छत्री म्हणजे केवढी ही अतिशयोक्ती! मराठीत इतक्या नावांनी ओळखली जाणारी ही ‘कुत्र्याची छत्री’ तुमच्या डोळ्यांसमोर अजून आली नसेल तर, तिच्या इंग्रजी ‘मशरूम’ नावाने तुम्हाला तिची ओळख लगेच पटेल. तिच्या काही खाण्यायोग्य जातींची छान भाजीही केली जाते. निसर्गतः या कुत्र्याच्या छत्र्या फक्त पावसाळ्यातच जिथंतिथं आढळून येतात. यावरून अचानक येऊन मोठय़ा प्रमाणात फोफोणाऱ्या, प्रभाव पाडू पाहणाऱ्या गोष्टीला, व्यक्तीला ‘कुत्र्याची छत्री’ म्हटलं जातं.