
>> विनायक श्रीधर अभ्यंकर
‘सोने की चिडिया’ संबोधून हिंदुस्थानला लुटण्यासाठी क्रूर मंगोलियन, मोगल व अफगाणी फौजा हिंदुस्थानी उपखंडातील शांतता बिघडवून थैमान घालत होत्या व शांतताप्रिय समाज हे सर्व सहन करीत होता. अशा वेळी दुर्बल बनलेल्या समाजाचे क्षात्रतेज जागृत करण्यासाठी गुरुदेव नानक सरसावले. तेजोभंग होऊन दुर्बल झालेल्या देशबांधवांचे क्षात्रतेज उद्दिपित करण्याचे कार्य संतांनी या पवित्र मातृभूमीत केले.बाबराच्या आक्रमणाने भेदरलेल्या एतद्देशीय जनसामान्यांच्या जीवनात वीरश्रीचे बीज पेरणारे गुरुदेव नानक व आलमगीराच्या पुंडाईचा समाचार घेण्यासाठी या आनंदभुवनी मावळ्यांच्या जीवनात संजीवनी ओतणारे समर्थ रामदास या दोघांचे चरित्र नीट निरखून पाहिले तर लक्षात येते की, समाजसुधारणेची जाणीव असणारे हे संत आत्मोन्नतीबरोबरच देशगौरवालाही विसरले नव्हते.
पंजाब हा पाच नद्यांच्या अवगुंठनात पावनपूत झालेला वीरांचा प्रदेश. हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या प्रत्येक लढय़ात आपला वाटा उचलणारा हा नरशार्दुलांचा, अनेक योद्धे पुरवून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची जपणूक करणारच प्रांत. गुरू गोविंदसिंग, रणजितसिंह, भगतसिंग या सर्वांना प्रेरणा देणारा देश आजही उभा आहे तो गुरुदेव नानकसाहेब यांच्या उपदेशामृतावर. हे दोनच शब्द उच्चारल्याबरोबर डोळ्यांसमोर धीरगंभीर राजबिंड्या तेजोवलयांकित महामानवाची प्रतिमा तरळू लागते. धवल वस्त्र परिधान ईश्वरी स्पर्शाचा हा महामानव म्हणजे देवदूतच. धर्माचरणाला पवित्र कर्माच्या कसोटीवर उतरवून नव्या जीवनाचे सार सारासार प्रज्ञेने मांडणारा द्रष्टा कर्मयोगी.
‘सोने की चिडिया’ संबोधून हिंदुस्थानला लुटण्यासाठी क्रूर मंगोलियन, मोगल व अफगाणी फौजा हिंदुस्थानी उपखंडातील शांतता बिघडवून थैमान घालत होत्या व शांतताप्रिय समाज हे सर्व सहन करीत होता. अशा वेळी क्षात्रतेज जागृत करण्यासाठी गुरुदेव नानक सरसावले. धर्म हा सदाचाराबरोबरच विश्वबंधुत्व शिकवतो व मानवाने मानवाचा यथायोग्य गौरव करावा याची शिकवण देतो हे आपल्या कृतीने पटवून देणारा प्रेषक, व्यवहाराच्या मोहपाशात अडकून न पडता सचोटीने समस्त मानवजातीला अंधश्रद्धा व धार्मिक गुलामीतून बंधमुक्त करणारा तो ज्ञानी आत्मा म्हणजेच गुरुदेव नानक. अध्यात्माबरोबरच लौकिकार्थाने प्रपंचाचा भार देशहितासाठी व देशबांधवांसाठी उचलून धरण्याची किमया दाखविणारे जादुगार म्हणजे गुरुदेव नानक.
संतांच्या जीवनात बर्याच ठिकाणी एकसूत्रता व एकवाक्यता आढळून येते. भागवत धर्माचा प्रसार करीत असताना तेजोभंग होऊन दुर्बल झालेल्या देशबांधवांचे क्षात्रतेज उद्दिपित करण्याचे कार्य संतांनी या पवित्र मातृभूमीत केले. बाबराच्या आक्रमणाने भेदरलेल्या एतद्देशीय जनसामान्यांच्या जीवनात वीरश्रीचे बीज पेरणारे गुरुदेव नानक व आलमगीराच्या पुंडाईचा समाचार घेण्यासाठी या आनंदभुवनी मावळ्यांच्या जीवनात संजीवनी ओतणारे समर्थ रामदास या दोघांचे चरित्र नीट निरखून पाहिले तर लक्षात येते की, समाजसुधारणेची जाणीव असणारे हे संत आत्मोन्नतीबरोबरच देशगौरवालाही विसरले नव्हते.
संत रामदास व गुरुदेव नानकसाहेब यांनी त्यांच्या कालखंडात स्वतःचा प्रपंच बाजूला सारून हिंदुस्थानच्या उन्नतीसाठी सार्या मातृभूमीचा प्रपंचच आपल्या शिरावर घेऊन तीर्थाटन केले. अंधश्रद्धा, पूर्वापार अघोर रूढी व दांभिक धर्मांधतेवर आपल्या अमोघ वाणीने प्रहार करीत मानवधर्माचे महत्त्व पटवून देणारे हे दोन संत खरे म्हणजे क्रांतिकारी समाजसुधारक होत. साहित्यात रसाळ आणि अनमोल असा साहित्य खजाना समाजाला मार्गदर्शक म्हणून बोधामृत पाजणारे हे प्रज्ञावंत धर्माला शाश्वत विचारांचे अनुष्ठान देणारे कर्मयोगीच होते. व्यावहारिकतेला वैराग्याची जोड देणारे हे पुण्यात्मे होते. ईश्वरभक्तीबरोबरच जनसेवेचे कंकण बांधून जगन्नाथाचा रथ कुशलतेने हाकणारे हे समाज सारथी होते. गुरुदेव नानक व संत रामदासस्वामी यांनी आपल्या ग्रंथांमधून, काव्यातून क्षात्रतेजाची जी ज्योत पेटवली, त्यातूनच गुरु गोविंद सिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदय झाला. विस्मीत व कर्तव्यमूढ झालेल्या समाजात जागृती निर्माण करून अन्याय, अत्याचाराविरुद्ध कटिबद्ध होण्यास प्रवृत्त केले ते यांच्या साहित्याने.
माणूस हा माणूस आहे. मग कोणीही हिंदू नाही की मुसलमान नाही. म्हणून प्रथम मानवता धर्म शिका अशी शिकवण गुरुदेवांनी आपल्या संपूर्ण प्रवासात देत देत सर्वधर्मीय शिष्यांचा ताफा जमवला. धर्माच्या नावाखाली मतलबासाठी झगडणारे देवाचेच काय, पण कोणाचेच प्रेषित होऊ शकत नाहीत. कारण खरा धर्म माणसाला आत्मतेज देऊन ईश्वरप्राप्तीकडे नेतो. कर्मकांडात व क्रतवैकल्यात अडकून पडणारा धर्म असूच शकत नाही हे ठासून प्रथम गुरुदेव नानकांनी मांडले. कष्टाच्या अन्नाला अमृताचा ओलावा असतो, तर पिळवणुकीयच पक्वान्नाला गोडी नसते हे त्यांनी मालिक भागोला दाखवून दिले व स्वकष्टाने कमावलेल्या अन्नातच खरा राम आहे हे पटवून दिले. संत रामदास व गुरुदेव नानक लौकिकार्थाने संसारापासून दूर राहिले, परंतु त्यांनी उपदेश मात्र असा केला की, संसारात राहूनच ईश्वराला शोधा.
गुरुदेव नेहमी म्हणत, मृत्यू हा नव्या जीवनाचे प्रवेशद्वार आहे आणि म्हणून मृत्यूला न भिता सामोरे जात कारण शरीर निःसत्त्व झाले, जीर्ण झाले, निरुपयोगी झाले की जीव त्या देहाचा त्याग करतो आणि पुन्हा नव्या देहाचा पेहरावा घेऊन जन्माला येतो. कारण आत्मा हा अमर आहे.
गुरुदेव नानकसाहेबांच्या जीवितकार्याला परिस्थितीनिरपेक्ष अशी दोन अंगे होती. निरर्थक रूढीचे भजन हे परिस्थितीनिरपेक्ष अंग होय. गुरुदेव नानकांची शिकवण ही त्या काळीच नव्हे तर आजही मार्गदर्शक व क्रांतिकारी आहे. जोपर्यंत मानव बाह्य देखाव्यावर भुलेल, हुरळून जाईल, शाश्वताचे हितकारक चिंतन सोडून तो जोपर्यंत अशाश्वताच्या आहारी गेलेला राहील, तोपर्यंत ही गुरुवाणी क्रांतिकारीच राहणार हे निर्विवाद! गुरुदेवांनी फक्त पंजाबच नव्हे तर हिंदुस्थानातील तमाम रयतेच्या गळी हे नैतिक मूल्याचे महत्त्व कळवळ्याने उतरविण्याचा व त्या मूल्यांना अनुसरून जीवनाला वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. अतिरेक्यांच्या आत्मघातकी जाळ्यात सापडलेल्या हिंदुस्थानला भयपाशातून मुक्त करण्यासाठी ही शिकवण पुन्हा देण्यासाठी गुरुदेव नानकसाहेब पुन्हा अवतरावेत हीच आज त्यांच्या जयंतीदिनी प्रार्थना!
(लेखक निवृत्त नौदल अधिकारी आहेत.)
































































