लेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको!

>> दिलीप देशपांडे ([email protected])

आज गुरुपौर्णिमा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. ते व्हायलाच हवेत. फक्त त्यात उत्सवीपणा नसावा. असे मोठे उत्सव साजरे करण्याबरोबर सद्गुरूंनी जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे, जो उपदेश दिला आहे त्याचे आचरण करणे हीच खरी गुरूपूजा आणि गुरुदक्षिणा आहे.

आपल्या संस्कृतीत गुरूशिष्याच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे महर्षी व्यास आणि गणेश, वसिष्ठ ऋषी आणि श्रीराम, गोरक्षनाथ-निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वर, जनार्दन स्वामी-एकनाथ महाराज, नामदेव महाराज-विसोबा खेचर, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद, स्वामी शिवानंद सरस्वती -सद्गुरू ओम मालतीदेवी ही परंपरा आहे.

प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत. त्यावेळी श्रद्धेने गुरुपूजन करून यथाशक्ती गुरुदक्षिणा देत होते. या दिवशी आपण आई-वडील-शिक्षक-आपल्या कला, क्रीडा, संगीत, विज्ञान, व्यवसायातील आपले मार्गदर्शक व आध्यात्मिक क्षेत्रातील सद्गुरूंचे प्रामुख्याने पूजन करतो. आपण बघतो गुरुपौर्णिमेला शेगाव ‘श्री गजानन महाराज’, अक्कलकोट ‘श्री स्वामी समर्थ’, गोंदवले ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’, शंकरमठ पुणे, ‘श्री शंकर महाराज’, मिरज ‘ॐ मालतीआई, गरुडेश्वर ‘वासुदेवानंद सरस्वती’ या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव सर्व साधक एकत्र येऊन मोठय़ा प्रमाणावर साजरा करत असतात. गुरूप्रति आदर, श्रद्धा दाखवण्याचा गुरुपौर्णिमा अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस. या दिवशी अनेक शाळा, मठ, मंदिर, आश्रम, गुरुकुलात गुरुपूजन करून आपल्या सद्गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त केली जात असते.

आई-वडील हे आपले पहिले गुरू आहेत. मुलांवर योग्य संस्कार करून एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी ते आपल्याला सक्षम करतात. त्यानंतर शालेय जीवनात शिक्षक हे गुरूस्थानी असतात. पण आज काहीच शाळा, कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकरूपी गुरूसमोर नतमस्तक होताना दिसतात. तरी पण खेदाने म्हणावे लागतेय की, जेवढे इतर दिवस आणि डे साजरे करण्याचे एक फॅड सुरू आहे, त्यात या दिवसाला शाळा-कॉलेजेसमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नाही ही सत्य परिस्थिती नाकारून चालणार नाही. मुळात आता तसे शिक्षक-विद्यार्थ्यांचे संबंधही राहिलले नाहीत.

आध्यात्मिक मार्गातील अनेक व्यक्ती आपल्या सद्गुरूंचे भक्तिभावाने पूजन करून आशीर्वाद घेतात. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंच्या पूजनाची पौर्णिमा आहे. प्रत्यक्ष शक्य असेल तर घरीच गुरुपूजन करतात.

गुरू आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा, प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आनंदी जीवन कसे जगावे शिकवतात. गुरू शब्दाचा अर्थच मुळात अंधार नाहीसा करणे हा आहे. गुरू ज्ञानाचा सागर असतात. गुरूच्या कृपेनेच शिष्य मोठे कार्य करू शकतो. निवृत्तीनाथ यांच्या गुरुकृपेतूनच ज्ञानेश्वरांच्या हातून ज्ञानेश्वरी लेखनाचं महत्कार्य घडलं. छत्रपती शिवाजी महाराज एकदा शिवथरघळीला आपल्या तलवारी अभिमंत्रीत करायला व समर्थांचे दर्शनला गेले होते. महाराजांनी विडा, तांबुल खाणे सोडले होते. ही गोष्ट समर्थांना माहीत होती. दर्शनानंतर समर्थांनी महाराजांच्या हातावर विडा ठेवला, महाराजांनी तो तत्काळ भक्षण केला. समर्थ महाराजांना म्हणाले, राजे आम्ही ऐकले होते तुम्ही तांबुल, विडा वर्जिला ऐसे? त्यावर महाराज तत्काळ म्हणाले, महाराज आम्ही विडा, तांबुल नाही सेविला, आम्ही प्रसाद सेविला. असा भाव व दृढश्रद्धा गुरूंप्रति हवी.

।। गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः।।

।। गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।

हा श्लोक आपण रोज म्हणत असतो. गुरू हे प्रत्यक्षात ब्रह्मा, विष्णू, आणि महेश म्हणजेच शिव आहेत आणि साक्षात परब्रह्मच आहेत. अशा गुरूंना आपण नमस्कार करतो. आपण बघतो, माणूस किती मोठा असो, श्रीमंत असो, अधिकारी असो गुरूचरणाशी नतमस्तक होतो. ज्ञानप्राप्तीसाठी, जीवनात आत्मानंद मिळवण्यासाठी त्याला गुरूची आवश्यकता ही असतेच. गुरूशिवाय जीवन अपूर्णच आहे म्हणावे लागते. गुरूकडून प्रेरणा मिळत असते. म्हणून म्हणतात-

सद्गुरूसारीखा असता पाठीराखा

इतरांचा लेखा कोण करी।।

म्हणून….

धरावे पाय आधी सद्गुरूचे.

आयुष्यात सुखदुःखाचे अनेक चढउतार येत असतात. माणूस खचून जातो. अशावेळी आपले सद्गुरूच पाठीशी उभे असतात. आपले मनोबल वाढवीत असतात. अडचणीतून मार्ग दाखवितात.

आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट।।

गुरुविण कोण दाखविल वाट।।

आज गुरुपौर्णिमा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. ते व्हायलाच हवेत. फक्त त्यात उत्सवीपणा नसावा. असे मोठे उत्सव साजरे करण्याबरोबर आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे, जो उपदेश दिला आहे त्याचे आचरण करणे. गुरुमंत्र दिला आहे त्याचा जप करणे, साधना करणे, नामात तल्लीन होणे हीच खरी गुरूपूजा आणि गुरुदक्षिणा आहे. सद्गुरूंना हेच अपेक्षित असते. याचं प्रत्येकाला किती भान आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. नेमका त्याचाच विसर पडत चाललाय असे वाटत नाही का?

आपली प्रतिक्रिया द्या