हेजिंग तंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण धोपट

मार्केटमध्ये काम करणं म्हणजे केवळ प्रॉफिट मिळवणं नाही, तर रिस्क मॅनेजमेंट करायला शिकणं आहे. मार्केटमध्ये झीरोला हीरो आणि हीरोला झीरो करण्याची ताकद आहे. त्या ताकदीला रोखण्याची क्षमता काही ट्रेडिंग टेक्निक्समध्ये असते. त्यातलेच हेजिंग हे टेक्निक खूपच महत्त्वाचे आहे.

हेजिंग टेक्निकमुळे संभाव्य नुकसानीपासून भांडवल वाचू शकते. हेजिंगची मूळ संकल्पनाच अशी आहे की, आधीपासूनच ओपन असलेली पोझिशन जर नुकसानीत जात असेल तर त्याला सपोर्ट म्हणून दुसरी पोझिशन घेतली जाते.

हेजिंगच्या पहिल्या टेक्निकमध्ये शॉर्ट सेलिंगचे तंत्र वापरले जाते. ज्यात ट्रेडर आपल्याकडे शेअर नसतानाही ब्रोकरकडून उधारीवर घेतो आणि ते विकतो. ज्यामध्ये ट्रेडरला अपेक्षा असते की, त्या ठरावीक शेअरची किंमत खाली जाईल. मार्केट संपण्यापूर्वी त्या शेअर्सची किंमत खाली गेल्यावर ट्रेडर ते शेअर्स विकत घेतो आणि ब्रोकरला परत करतो.

हेजिंगसाठी दुसऱ्या महत्त्वाच्या तंत्रात ऑप्शनचा वापर केला जातो. यामध्ये ट्रेडरनं मार्केट वर जाईल या अंदाजानं शेअर्सची खरेदी करून ठेवलेली असते. अशा अवस्थेत मार्केट वर गेले तर ट्रेडरचा फायदा होतो, पण खाली पडले तर त्याचे नुकसान होऊ शकते. इथं हेजिंग टेक्निक उपयोगी पडते. मार्केट वरच जाईल याची खात्री नसल्यामुळे किंवा खाली पडेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याला सपोर्ट म्हणून पुट ऑप्शन बाय केला जातो. पुट ऑप्शन बाय केल्यानंतर जर मार्केट खाली पडलं तर अर्थातच त्या ऑप्शनची प्राईस वाढते. ऑप्शनची किंमत वाढल्यामुळे शेअर खरेदीमुळे झालेले नुकसान भरून निघतं.

हेजिंगच्या तिसऱ्या तंत्रात फ्युचर कॉन्ट्रक्टचाही वापर केला जातो. फ्युचर कॉन्ट्रक्ट एक असे ऑग्रिमेंट असते की, ज्यामध्ये ट्रेडरने एका ठरावीक किमतीला आणि ठरावीक तारखेपर्यंत बाय किंवा सेल करण्याची हमी दिलेली असते. या फ्युचर खरेदीचा संबंध ट्रेडरच्या आधीपासून होल्ड केलेल्या शेअर्सशी असतो. फ्युचर हेजिंग करणाऱ्या ट्रेडरचा पोर्टफोलिओ तुलनेने मोठा असतो. फ्युचर खरेदी विक्रीमुळे ट्रेडर आपले भांडवल वाचवू शकतो.

थोडक्यात, हेजिंग हे रिस्क मॅनेजमेंट आणि लॉस कव्हर करणारे टेक्निक आहे. या टेक्निकची जशी ताकद आहे तशी या तंत्राला मर्यादादेखील आहे. वायदा बाजाराच्या टाईम आणि इंट्रेंसिक व्हॅल्यूच्या गणितात हेजिंग टेक्निक कायम फायद्यात राहील असे होत नाही. त्यामुळे हेजिंगचा वापर करताना ते डोळसपणे करणे आवश्यक आहे.

 (लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)