
>> यशवंत तुकाराम सुरोशे
खरं तर मातृभाषेतून शिकता शिकता इंग्रजी शिकायलाच हवे याबाबत दुमत नाही. पण इंग्रजी शिकण्याच्या नादात मातृभाषेला अव्हेरण्यात आपलाच तोटा आहे. मातृभाषेचा, एका भाषेचा ऱ्हास होईल, त्याअगोदर आपला ऱ्हास झालेला असेल. किमान आपल्या जीवन व्यवहारासाठी तरी आपण मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे. मातृभाषेसाठी, एका भाषेसाठी नाही तर स्वतःसाठी मातृभाषेत शिकायला हवे.
सुट्टीच्या दिवसांतली गोष्ट. घराच्या मागच्या खिडकीतून डोकावले तर मोकळ्या शेतात शाळकरी मुलांचा खेळ चालू होता. क्रिकेट खेळायचा कंटाळा आला असेल म्हणून किंवा नव्यापणाची (खरं तर जुन्याच!) क्रेझ म्हणून मुले चक्क विटीदांडू’चा खेळ खेळत होती. खरं तर झोपमोड झाल्यामुळे मी चिडलो होतो. पण विटीदांडूच्या खेळातील आरडाओरडा स्पष्ट झाल्यावर मी ताजातवाना होऊन खिडकीपाशी उभा राहिलो.
गोल रिंगण आखलेल्या ‘कोंडात’ विटी ठेवायची. दोन्ही बाजूंना टोकदार झालेली बांबूची पिवळीधमक विटी पाहून मन बालपणात गुंतले. सात–आठ जणांचा चमू खेळत होता. हा कळप तसा माझ्या परिचयाचा. पण मी न्याहाळले तर एक नवा मित्र या कळपात दिसला. मी खिडकीतूनच आवाज दिला. ‘‘जयेश… हा कोण रे नवा दोस्त…’’
‘‘काका, तो परेश आहे… माझा चुलत भाऊ… डोंबिवलीचा!’’ जयेशने तत्काळ माहिती पुरवली. पत्नीने चहाचा कप हातात दिला नि मी मुलांचा खेळ पाहत उभा राहिलो.
क्षणभर मला पुस्तकातला ‘साकव’ हा पाठ आठवला. यात ग्रामीण आणि शहरी भागातील मुले एकत्र येतात, एकमेकांच्या भावविश्वातील अनुभवांची देवाण–घेवाण करतात नि समृद्ध आयुष्याचा एक साकव उभारला जातो. या आठवणीत रमताना या शहरी मुलांचा खेळ मी न्याहाळू लागलो. इतर सारी मुले सराईतपणे दांडूने विटी जोराने टोलवत नि रिंगणापासूनचे दांडूचे अंतर अंदाजे सांगत. अंदाज करूनच इतर खेळाडू मान्य करत. मग प्रत्येकाचे गुण वाढत जात. शहरातून आलेला परेश ही आकडेमोड ऐकताना प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहत राहायचा. खेळाची वेळ आल्यावर मित्र त्याला आठवण द्यायचे. परेशचा टोला चुकायचा. विटी फार दूर जात नसे आणि काही अंतरावर गेली तर तो अंदाजे अंतर इंग्रजीतून सांगायचा… म्हणजे फोर्टी, नाहीतर,थर्टी फाईव्ह! त्याचे असे बोलणे ऐकून गावकरी मित्र समजून घ्यायचे. इतरांना पटवून द्यायचे. पण परेशला गावकरी मित्रांचे मराठीतील अंकवाचन मुळीच कळत नव्हते. तो भांबावायचा! दांडूने विटी जोराने टोलवण्याऐवजी तो मित्रांच्या दोनशे पस्तीस, माझे एकशे पासष्ट, माझे एकशे तीस या अशा शब्दांतच अडकून पडला. शेवटी खेळाचा डाव त्याच्यावर आला.
नमनालाच घडाभर तेल ओतण्याचे कारण असे की, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना मराठीतील आकडेमोड समजत नाही. त्यांना फक्त इंग्रजीतील अंकओळख आहे. आता या मुलांना फक्त इंग्रजीच शिकायचे आहे, हा त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग झाला! पण या मुलांना, भावी नागरिकांना महाराष्ट्रात जीवन जगायचे असेल तर आजूबाजूला मराठी बोलणारीच माणसे आहेत. कदाचित मराठी बोलणारी माणसे इंग्रजी आकडेमोड समजून घेतीलही… कारण मराठी माणसाला या अनिवार्यतेची जाणीव झाली आहे. पण केवळ इंग्रजीचाच ध्यास घेतलेल्यांना व्यवहारात मराठीचा वापर करता नाही आला तर?
मी विटी–दांडू खेळणाऱ्या परेशचा विचार करतोय. भविष्यात परेश बसने प्रवास करतोय. बसमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. वाहक तिकिटाचे दर सांगत तिकिटे देत आहे. इथे परेश पुन्हा वाहकांच्या तोंडाकडे पाहत राहील. वाहक चिडेल, सहप्रवासी हसतील, परेश रागावेल, कामात वेळ जाईल. यापैकी एक किंवा अनेक गोष्टी घडतील. थोडक्यात परदेश प्रवासात आपली भाषेमुळे जशी त्रेधातिरपीट होते, अडचण होते तशीच परेशची होईल, फक्त आणि फक्त इंग्रजीचा आग्रह धरणाऱ्यांची होईल.
प्रश्न साधे आहेत, उत्तरेसुद्धा साधीच असतील! कदाचित नवे उपाय येतील, नवे उपाय शोधले जातील. पण ज्या शिक्षणाने रोजच्या जगण्यात अडथळे येत असतील तर त्याचा अट्टहास का करायचा? कितीतरी पालकांना आपल्या मुलांची ही गोंधळाची अवस्था माहीत आहे. सुरुवातीच्या पिढीने या गोष्टीचा प्रचंड अभिमान बाळगला. ‘‘माझ्या मुलांना मराठी नाही समजत’ असे छाती काढून सांगितले. मग पुढच्या पिढीने तोच कित्ता गिरवला. पण त्यापुढे मध्यमवर्गीय मराठी माणूस अनुनय करायला गेला, पण त्याचे वास्तवाचे भान सुटले. त्याने आपल्या मुलांना घरी, मराठीतील शब्द, अंक, म्हणी, वाप्रचार, सुभाषिते यांच्यापासून दूरच ठेवले. शेवटी परिणाम तोच झाला. आज ग्रामीण भागातही सेमी इंग्रजी माध्यमातून काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतून, काही खासगी अनुदानित शाळांमधून गणित इयत्ता पाचवीपर्यंत शिकवले जाते. पहिलीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून गणित शिकणाऱ्या पाचवीपर्यंतच्या ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना चार अंकी, पाच अंकी, सहा अंकी संख्या मराठीतून वाचता येत नाही. ऐकून लिहिता येत नाही. यातील काही विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्यासुद्धा मराठीतून लिहिता–वाचता येत नाही. वरील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इंग्रजीतून अंकलेखन व वाचन अचूक करता येते. पण बेरीज व वजाबाकी करण्याच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत असे चित्र आहे. कारण ग्रामीण भागात चार, पाच अंकी संख्याचे वाचन इंग्रजीतून आले की, पालक नि शिक्षण निरीक्षक खूश होतात. पण मूळ संकल्पना विद्यार्थ्यांना भाषेच्या अडथळ्यामुळे किंवा अध्यापनातील अडथळ्यामुळे समजल्या नसाव्यात (याबाबत संशोधन सुरू आहे).
खरं तर मातृभाषेतून शिकता शिकता इंग्रजी शिकायलाच हवे याबाबत दुमत नाही. पण इंग्रजी शिकण्याच्या नादात मातृभाषेला अव्हेरण्यात आपलाच तोटा आहे. मातृभाषेचा, एका भाषेचा ऱहास होईल, त्याअगोदर आपला ऱहास झालेला असेल. किमान आपल्या जीवन व्यवहारासाठी तरी आपण मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे. मातृभाषेसाठी, एका भाषेसाठी नाही तर स्वतःसाठी मातृभाषेत शिकायला हवे.
नवमध्यमवर्गीयांचे एक चित्र डोळ्यासमोर येते. वृद्धावस्थेत असणारा नवमध्यमवर्गीय पालक आपल्या आयुष्याचे संचित इंग्रजी शिकलेल्या मुलाला समजावतोय. पालकांचे शब्द जड झालेत. मुलगा समजू शकेल हे शेवटचे शब्द! समजून दिलेला मुलाचा प्रतिसाद समजेल पालकाला! फारच भावनिक चित्र रेखाटण्याचे कारण नाही, पण भावना पोहोचवण्यात जी अडथळा आणते ती भाषा नव्हेच! आणि जे जीवन जगायला अडथळा ठरते ते शिक्षण नव्हे!
पालकांनो! परिस्थिती गळ्याशी आली आहे. इंग्रजी शिकून रोजगार मिळतोच हा भूतकाळ झाला आहे. त्यापेक्षा मातृभाषेत शिकून कौशल्य प्राप्त केल्यावर रोजगार मिळू शकेल असे धोरण राबवायला शासनास भाग पाडू असे करणे सर्वांच्याच हिताचे आहे.































































