लेख – इराणच्या अणू कार्यक्रमात इस्रायलचा जीव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद वि. प्रभू 

या वर्षी मेच्या शेवटच्या आठवडय़ात इराणची राजधानी तेहरानच्या उपनगरात रिव्होल्युशनरी गार्डचे कर्नल हसन सय्यद खुदाई यांची मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात बंदूकधारी इसमांनी गोळ्या घालून हत्या केली. खुदाई हे इराणच्या बाहेर इस्रायली नागरिक, पर्यटक यांची हत्या आणि घातपात, अपहरण करण्यात गुंतले होते असा कथित आरोप आहे. या हत्येची जबाबदारीही इस्रायलने घेतलेली आहे. इराणच्या अणू कार्यक्रमाशी ही हत्या संबंधित नसली तरी त्याच मालिकेतील ही हत्या आहे. या हत्येमुळे संतप्त झालेल्या इराणने ‘बदला घेऊ’ अशी भाषा वापरली आहे. इराण आणि इस्रायल यांचे वैर काही नवे नाही.

इराणने  अण्वस्त्रे बनवण्याच्या दिशेने आपला अणू कार्यक्रम वळवल्यानंतर इस्रायलला आपल्या अस्तित्वाला धोका असल्याची जाणीव झाली आणि तेव्हापासून इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. इस्लामी जगतामध्ये फक्त एकच अण्वस्त्रधारी देश आहे आणि तो म्हणजे पाकिस्तान! त्यानंतर इराण आणि तुर्कस्तान हे  अण्वस्त्रे बनवण्याच्या नजीक पोहोचले असल्याचे बोलले जाते. इराणचा अणू कार्यक्रम हा साधारणतः 1957 पासून सुरू असून तो नागरी आणि शांततेसाठी आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे इराणच्या अणू कार्यक्रमाची मुहूर्तमेढ अमेरिकेने रोवली होती. इराणचे राजे मोहम्मद रजा पहलवी यांच्या राजवटीत अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणशी संबंध चांगले होते. इराणने इस्रायलला ‘सार्वभौम देश’ म्हणून मान्यताही दिली होती. या कालावधीत इराणचा अणू कार्यक्रम हा अण्वस्त्रे बनण्याच्या दिशेने वळला नव्हता, पण इराणमध्ये 1979 साली क्रांती झाली आणि राजेशाही समाप्त झाली. इराणमध्ये ‘डेथ अमेरिका’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. इराण-अमेरिका संबंध बिघडले. इथूनच इराणच्या अणू कार्यक्रमाला एक नवी दिशा मिळाली. विशेष म्हणजे इराणचे सर्वेसर्वा अयातोल्लाह खोमेनी यांनी प्रारंभी अणू कार्यक्रमाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. ‘‘अर्धवट अवस्थेत असलेला बुशहर अणू प्रकल्प गहू साठवण्यासाठी कोठार म्हणून वापरण्यास हरकत नाही,’’ हे खोमेनी यांचे उद्गार जगप्रसिद्ध आहेत. 1980 ते 1988 पर्यंत इराण-इराक यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले. या युद्धात संधी साधून इस्रायलने इराकची ओसिराक अणुभट्टी नष्ट केली होती. याच युद्धाच्या दरम्यान इराणला विजेची तीव्र टंचाई भासली होती, त्यामुळेच या देशाने अणू ऊर्जेकडे जास्त लक्ष देण्यास प्रारंभ केला.

इराणने पॅलेस्टिनच्या स्वातंत्र्यलढय़ाला पाठिंबा देताना हिजबुल्लाह, हमास अशा इस्रायलविरुद्ध लढणाऱ्या दहशतवादी गटांना अर्थ आणि शस्त्रपुरवठा सुरू केला. एवढेच नव्हे तर इस्रायलच्या शेजारच्या सीरियालाही तशा प्रकारची मदत पुरवली. इस्रायलबरोबरचे राजनैतिक संबंधही तोडले. याचदरम्यान इराणने आपला अणू कार्यक्रम अण्वस्त्रे बनविण्याच्या दिशेने वळवला असल्याचे संकेत अमेरिका आणि इस्रायल यांना मिळाले. इस्रायलला ‘‘जगाच्या नकाशावरून नष्ट करू’’ अशी घोषणा 2000 सालीच खोमेनी यांनी केली होती. त्यातच इराणने 2010 च्या सुमारास अण्वस्त्रे (अणुबॉम्ब) बनवण्याच्या दिशेने प्रगती केल्याने इस्रायलच्या अस्तित्वावरील संकट आणखीन गडद झाले आहे. तेव्हापासून अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणचा अणू कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. 2010 पासून इराणी अणुशास्त्रज्ञांच्या हत्येचे सत्र सुरू झाले ते अद्याप थांबलेले नाही. इराणी अणुशास्त्रज्ञांची हत्या, अणू प्रकल्पावर सायबर हल्ले आणि ड्रोन हल्ले अशी तिहेरी पद्धत अमेरिका आणि इस्रायल यांनी अवलंबलेली दिसते. बॉम्बहल्ले करून इराणी अणू प्रकल्प नष्ट करण्याचा अंतिम पर्याय आपल्याकडे आहे, असे इस्रायलचे तत्कालीन अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी एकदा बोलून दाखवले होते, पण सततच्या घातपातांमुळे इराणने आपले अणू प्रकल्प डोंगराळ भागात भूमिगतरीत्या तयार केले आहेत. त्यामुळे ते नष्ट करणे इस्रायलसाठी आता सोपे राहिलेले नाही.

इराणने अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या समृद्ध युरेनियमचा साठा करण्यास प्रारंभ केल्यानंतर इस्रायलच्या ‘मोसाद’ गुप्तहेर संघटनेच्या इराणमधील कारवायांना वेग आला. 12 जानेवारी 2010 रोजी राजधानी तेहरानमध्ये इराणी अणुशास्त्रज्ञ मसूदअली मोहम्मदी यांची मोटार बॉम्बस्फोटाने उडवून हत्या करण्यात आली. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये खोरामाबाद येथील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या क्षेपणास्त्र तळावर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. त्यामध्ये 18 सैनिक ठार झाले होते. इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे शिल्पकार जनरल हासन मुकादम हेसुद्धा या स्फोटात ठार झाले होते. 29 नोव्हेंबर रोजी अणुशास्त्रज्ञ माजीद शहरियारी यांच्या मोटारीमध्ये बॉम्बस्फोट घडवून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या समवेत असलेले इतर दोन अणुशास्त्रज्ञ जखमी झाले होते. 23 जुलै 2011 मध्ये अणुशास्त्रज्ञ दारियस रेझायनिझाद यांची तेहरानमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि इस्पहान अणू प्रकल्पावर स्फोट घडवून आणण्यात आला. 11 जानेवारी 2012 रोजी अणुशास्त्रज्ञ मुस्तफा अहमदी रोशन आणि त्यांच्या कार चालकाची बॉम्बस्पह्ट घडवून हत्या करण्यात आली. याचदरम्यान अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी मिळून इराणी अणू प्रकल्पांवर सायबर हल्ले चढवण्यास प्रारंभ केला. या दोघांनी मिळून तयार केलेल्या ‘स्टुक्सनेट’ या कॉम्प्युटर व्हायरसने इराणच्या नातांझ अणू प्रकल्पावरील 1000 सेंट्रिफ्यूज आणि 30 हजार कॉम्प्युटर बरबाद करण्यात आले. हे सायबर हल्ले अजून सुरूच आहेत.

इराणनेही प्रत्युत्तरादाखल जगभरातील विविध देशांमधील इस्रायली लक्ष्यांवर हल्ले करण्याचा असफल प्रयत्न केला. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समधील इस्रायली दूतावासावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इराणचा हात असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. 13 फेब्रुवारी 2012 मध्ये दिल्लीतील इस्रायली दूतावासाच्या नजीक झालेल्या कारबॉम्ब स्फोटात चार लोक जखमी झाले होते,  त्याच वर्षी जुलैमध्ये बल्गेरियात इस्रायली पर्यटकांची बस स्फोटाने उडवण्यात आली. त्यात 5 इस्रायली पर्यटक ठार झाले होते. यामागे इराणी हस्तकांचा हात असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. 2018 मध्ये तेहरानधील एका गोदामावर मोसादच्या गुप्तहेरांनी धाड टाकून इराणच्या अणू कार्यक्रमासंदर्भातील गुप्त माहिती असलेला पन्नास हजार पानांचा दस्तावेज व 163 कॉम्पॅक्ट डिस्क चोरून नेल्या होत्या.

इराणला सर्वात मोठे धक्के बसले ते 2020 मध्ये. जानेवारीमध्ये इराणच्या ‘कद’ फोर्सचे कमांडर कासेम सोलेमानी यांची अमेरिकेने इराकमध्ये हत्या केली. इराणच्या अणू कार्यक्रमाचे ‘जनक’ मोहसीन फक्रिझादेह यांची नोव्हेंबरमध्ये तेहरानजवळ हत्या करण्यात आली. यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप इराणने केला आणि ‘‘बदला घेऊ’’ अशी धमकी दिली.

इस्रायलने इराणमध्ये आपल्या गुप्तहेरांचे जाळे विणले आहे. ‘‘इराण हा परकीय गुप्तहेरांचा स्वर्ग आहे’’ असे उद्गार इराणच्या संसदीय रणनीती समितीच्या अध्यक्षांनी काढले. परवाच इराणने अण्वस्त्रे बसवून सोडता येईल अशा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यामुळे इस्रायलची चिंता आणखी वाढली आहे. याशिवाय 2017 मध्ये सीरियामध्ये इराणने आपला लष्करी तळ स्थापन केला. या तळावर इस्रायली लष्कर वारंवार रॉकेटचा मारा करीत असते. अमेरिकेने इराणवर आर्थिक आणि इतर अनेक निर्बंध घातले आहेत. तरीसुद्धा इराणचा अण्वस्त्रे बनवण्यासाठी अणू कार्यक्रम गुप्तपणे सुरूच आहे. इराणने आठ अणुबॉम्ब तयार करता येतील, एवढे समृद्ध युरेनियम जमा केले आहे अशी वदंता आहे. इकडे तहामध्ये गुंतवून इराणच्या अणू कार्यक्रमाची गती कमी करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे. त्याचबरोबर इराणचे अणू प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल योजना बनवत असल्याच्या बातम्या येत आहेत.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

[email protected]