भटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य!

5869

>> द्वारकानाथ संझगिरी

डोळे ही ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची सर्वात आकर्षक, लक्षणीय गोष्ट आहे. जैसलमेरच्या बाबतीत तिथल्या हवेल्या हे ‘ऐश्वर्याचे डोळे’ आहेत. त्या पाहताना माणूस विस्मयचकित होऊन स्तब्ध होतो. सुरवंटातून निपजणारं रंगीबेरंगी फुलपाखरू जेवढं गोड, धक्कादायक, तेवढंच सोकरी दगडाचं होणारं नक्षीकामातलं रूपांतर गोड धक्का देणारं.

‘हवेली’ हा शब्द पर्शियन भाषेतल्या ‘हवेली’ शब्दातून आपल्या हिंदीत आला. स्वतःच प्रशस्त घर! गंमत पहा, हवेलीची सुरुवात गुजरातमध्ये श्रीकृष्णाच्या घरापासून झाली. कृष्णासाठी बांधलेली घरं ही शिल्पकलेची प्रदर्शनं वाटायची. दगडावर काय काय गोष्टी कोरल्या जायच्या! राम – कृष्णाच्या आयुष्यातले प्रसंग, विष्णूचे अवतार वगैरेपासून गंधर्व, यक्ष, येशूचे एंजल्स आणि ब्रिटिश राजा-राणीपर्यंत. त्या हवेलीत पानघर (देवासाठी पानं), फूलघर (देवासाठी फुलांचे हार बनवणं), दर्जीघर (देवाचे कपडे शिवण्याची खोली), जलघर (देवासाठी पाणी), रसोई घर (देवासाठी प्रसाद बनवणे) वगैरे खोल्या असत. हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा ख्रिस्ती माणूस, त्यांनी गरिबीत खितपत पडलेल्या माणसांसाठी क्वचित काहीतरी केले. त्यांच्या झोपडीला ‘घराचं’ रूप पण दिलं नाही, पण जो कधीच दिसत नाही, त्या देवासाठी आलिशान घरं उभारून तो मोकळा झाला. पुढे मारवाडय़ांनी ठरवलं की, आपली घरंही देवासारखी सुंदर असावीत. मग त्यांनी हवेल्या बांधल्या. ती परंपरा नंतर राजस्थानमधल्या शेखावती मंडळींनी उचलली. त्यांनी शिल्पकलेपेक्षा चित्रकलेचा वापर हवेलीचं सौंदर्य वाढवण्यासाठी केला.

जैसलमेरमधल्या तीन महत्त्वाच्या हवेल्यांतून तुम्हाला फिरवून आणण्यापूर्वी तिथलं आर्किटेक्चर आणि कला याबद्दल सांगायला हवं.

जैसलमेरच्या भाटी राजपुतांचा विचार केला तर त्यांची इ.स. 1200 ते इ.स. 1500 ही तीनशे वर्षे मुस्लिमांच्या आक्रमणाला तोंड देण्यात गेली. ते सतत युद्धाच्या छायेत असत. मग त्यांनी अकबराला नातेवाईक करून घेतले. मांडलिकत्वाचा ‘कमीपणा’ स्वीकारल्यानंतर पुढे शांतता नांदायला लागली. तो काळ होता इ.स. 1500 ते इ.स. 1800 चा. त्यानंतर 12 डिसेंबर 1818 ला त्यांनी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीशी तह केला. म्हणजे त्यांचे संरक्षण ब्रिटिशांनी करायचं. इ.स. 1838-39 ला पहिलं अफगाण युद्ध ब्रिटिश लढले. त्यावेळी जैसलमेरच्या राजाने ब्रिटिशांना उंट दिले. 1857 च्या ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढय़ाच्या वेळी जैसलमेरचं ‘राजपूत शौर्य’ तटस्थ होतं. किंबहुना अकबराशी नातं जुळल्यानंतर राणा प्रतापासारखी काही असीम शौर्याची उदाहरणे सोडली तर राजपूत राजे ऐश्वर्यात लोळत होते.

हे चांगलं की वाईट हे प्रत्येकाने आपापल्या विचाराच्या चष्म्यातून पाहावं, पण त्यामुळे व्यापाराचा विकास झाला. व्यापारी, राजेमहाराजे यांच्या हातात पैसा खेळायला लागला आणि विविध कला, विशेषतः शिल्पकला, चित्रकला, मूर्तिकला यांचा विकास झाला. जैसलमेर इराण, इराक, अफगाणिस्तान, सिंध, चीन या देशांच्या व्यापाराच्या वाटेवर होते. हा मार्ग एकेकाळी ‘सिल्क रूट’ म्हणून सुप्रसिद्ध होता. त्यामुळे जैसलमेरमध्ये तूप, अफू, ज्वेलरी, सुका मेवा, मसाले वगैरेंचे बाजार उभे राहिले. त्यात व्यापारी आणि राजांनी पैसे कमविले आणि सुंदर हवेल्या उभ्या राहिल्या.

जैसलमेर हे शहर पंधराशेव्या शतकात किल्ल्याभोवती उभं राहिलं. तिथली घरं आणि घरांची आखणी दर्शविते की, हे शहरसुद्धा जाती व्यवस्थेप्रमाणे उभे राहिलंय. शहराच्या मध्यावर श्रीमंत, उच्चवर्णीय आणि व्यापारी कुटुंबीयांची मोठी घरं आहेत. ती दुमजली, सौंदर्यसंपन्न, कलात्मक आहेत. शहराच्या सीमारेषेवर दलित, शूद्र आणि गरीबांची मातीची घरं आहेत. श्रीमंत घरांच्या दर्शनी बाजूचं सौंदर्य कलाकुसरीने वाढवल्यामुळे हे शहर दगडावरच्या नक्षीकामाचं प्रदर्शन भरवल्यासारखं दिसतं. ज्यात स्थापत्यशास्त्र्ा दिसतं. त्यात हिंदू, जैन आणि मुस्लिम परंपरांचा प्रभाव आहे. म्हणून तिथे स्वस्तिक, विष्णू, लक्ष्मी, गणेश, कृष्णही आहेत. इस्लामिक भूमितीचं नक्षीकाम, घुमट, मेहराब आहेत. जैन तोरणे आहेत आणि जैन तीर्थकारांचे पुतळे आहेत. दर्शनी भागातलं नक्षीकाम दगडावर नाही, तर लाकडावर केलंय असं वाटावं इतकी नजाकत त्या नक्षीकामात आहे. दगडातून इतकं नाजूक नक्षीकाम तयार करता येतं? हा प्रश्न वारंवार सतावतो. इमारतीचे दगड हे चुन्याचे नाहीत तर बॉल आणि सॉकेट जॉइंटने एकमेकाला जोडले आहेत. जैसलमेरमध्ये स्थापत्य शास्त्र्ाज्ञांना ‘गजधर’म्हणत. ‘गजधर’ संपूर्ण इमारतीची आखणी करत असे. शिल्पकला करणाऱयांना ‘सिलावत’ म्हणत. वर्षानुवर्षे काम चाले, पण ते कधी थकत नसत. त्यातूनच पटवा, नथमल किंवा सलाम सिंगसारख्या हवेल्या उभ्या राहिल्या.

इ.स. 1800 ते 1860 या काळात जैनांमधल्या बाफा ओसवाल कुटुंबातल्या पाच भावांनी पाच हवेल्या बांधल्या. जैसलमेरच्या राजांनी त्यांना ‘पटवी’ हे टायटल दिले. त्यामुळे ते पटवा म्हणून ओळखले जायला लागले. ते आधी दागिन्यांसाठी सोन्याचांदीचे धागे बनवत. नंतर त्यांनी अफू आणि हिरे, माणकांच्या धंद्यात अफाट कमाई केली. इतकी की, ते राजाला पैसे उधार देत. उदयपूरचा राजा त्यांच्याकडून कर्ज घेई. एका छोटय़ा गल्लीत या पाच हवेल्या आहेत. त्या हवेल्यांच्या खिडक्या, बाल्कन्या वगैरे तोडून नंतर आपल्या घराला जोडाव्यात असं वाटतं राहतं. इतकं त्यावरचं नक्षीकाम सुंदर आणि नाजूक आहे. त्याचबरोबर एकदम सिमेट्रिकल! भूमीतीत चूक नाही. त्यांच्या तळमजला उंचावर असे. मग वरचे मजले सुरू होतात. गुडघे दुखत असले तरी मनाचा हिय्या करून वर चढाच. त्यांच्या दिवाणखान्याचा ‘काचमहाल’ केलाय! रंगीबेरंगी काचांच्या तुकडय़ांनी भिंती, खांब, छत वगैरे सुशोभित केलंय. तसंही इतर खोल्यांमध्ये ‘‘सजावट केली नाही तर शिक्षा ठोठावली जाईल’’ असा सज्जड दम देऊन आर्किटेक्टकडून काम करून घेतलं असं वाटतं. छत लाकडाचं आहे आणि त्यावर सोन्याची नक्षी आहे. प्रत्येक खिडकी, बाल्कनी, कमानीला वेगळं नक्षीकाम, पेंटिंग किंवा शिल्पकला! आणि विचार करा, हवेलीला साठ बाल्कन्या आहेत. काही कलाकारांनी संपूर्ण हयात या हवेल्या तयार करताना घालवली असेल. सुंदर स्त्र्ााr दिसली की, प्रेमळ मन तिच्यावर बसतं. हवेली पाहिली की, कलात्मक मन तिच्यावर जडतं.

अशीच पाहण्यासारखी हवेली म्हणजे नथमल या दिवाणाची हवेली. ही हवेली हायू आणि लालू या दोन आर्किटेक्ट भावांनी तयार केली. त्यांनी काय केलं असेल? हवेली दोन भागांत वाटून घेतली. एकाने उजवी बाजू, दुसऱयाने डावी! एकाचं ड्रॉइंग दुसऱयाला ठाऊक नाही. दोन भावांमध्ये सुदृढ स्पर्धा होती. इमारत पाहताना एकरूपता जाणवते, पण त्या एकरूपतेतही वैविध्य आहे. या हवेलीवर शेखावती परंपरेची छाप आहे. कारण दर्शनी भागावर पेंटिंग काढलेली आहेत. त्यात पक्षी, हत्ती, शिपायापासून थेट सायकल आणि वाफेच्या इंजिनाचं पेंटिंग आहे. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा प्रभाव त्यावर दिसतो. त्या हवेलीत आजही दिवाणाची आजची पिढी राहते.

जमलं तर सलाम सिंगची हवेलीसुद्धा पहा. माणूस वाईट, क्रूर, खुनी. त्याबद्दल पुढच्या वेळी बोलतोच. एका जुन्या हवेलीवर त्याने नवी हवेली चढवली. त्या हवेलीचा सर्वात वरचा मजला आणि छप्पर अफाट सुंदर आहे. नक्षीकाम म्हणजे भरजरी शालूला हेवा वाटावा असे. गच्चीवर प्रत्येक कमानीवर मोर आहेत. जणू एका साच्यातून काढले आहेत. त्या हवेलीच्या बोटीच्या आकारामुळे त्याला जहाज महालही म्हणतात.

जैसलमेर पाहताना दगडी नक्षीकामाचं कधी कधी अजीर्ण होतं, पण हे अजीर्ण त्रासदायक नाही. डोळे सुखावतात, मन आणि बुद्धी त्या कलावंतांना सलाम ठोकते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या