
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गावागावांत पोहोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणाऱया तसेच धम्मक्रांतीचा प्रचार-प्रसार करून आंबेडकरी चळवळ जनमानसात रुजविणाऱया लोकगायकांमध्ये नागोराव पाटणकर हे एक प्रमुख नाव होते. त्या नागोराव पाटणकर यांचा गौरवास्पद वारसा कसोशीने सांभाळत स्वतःची ‘भीमराज की बेटी’ अशी ओळख निर्माण करणाऱया प्रसिद्ध गायिका किरण पाटणकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भातील सांस्कृतिक क्षेत्राची हानी झाली आहे. किरण पाटणकर यांनी गायलेली आंबेडकरी चळवळीतील अनेक गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत.
किरण पाटणकर यांचा जन्म अमरावती जिह्यातील बडनेरा येथे झाला. नंतर त्यांचे कुटुंब नागपूरला स्थानांतरित झाले. गायक वडील नागोराव पाटणकरांची लोकप्रियता त्या काळात शिखरावर होती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मुलगा प्रकाशनाथ आणि पाठोपाठ मुलगी किरण यांनीही गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. किरण यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती व वेगवेगळ्या कार्यक्रमांतून त्यांची कला बहरत होती. लोकगायक व कव्वाल म्हणून या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अल्पावधीत त्यांची ओळख निर्माण झाली. त्या काळात गावोगावी होणाऱया शंकरपट, मंडई, मेळावे अशा कार्यक्रमांमधून त्यांच्या कव्वालीचा बाज बहरत गेला. आंबेडकरी जलशांमधून किरण पाटणकरांचा आवाज घुमत गेला. आनंद शिंदे, जानीबाबू, मज्जिद शोला अशा सर्व मोठय़ा गायकांसोबत किरण यांच्या कव्वालीच्या सामन्यांची लोक आतुरतेने वाट पाहायचे. अशा कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांच्या गीतांची फर्माईश ही ठरलेली असायची. किरण पाटणकर यांनी शेकडोच्या संख्येने भीमगीते गायली असून त्यांच्या गीतांच्या कॅसेट्स आणि सीडी जनमानसांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत्या.
दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा सोहळ्यात या गीतांना आजही मोठी मागणी असते. गायनातून लोकप्रियतेचा शिखर पाहिलेल्या किरण पाटणकरांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा मधुर आवाज हरपला आहे. प्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांच्या आवाजातील ‘तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे’ हे गाणे गाजले होते. हे गाणे नागपूरच्या मोमीनपुरामध्ये राहणारे झहिर आलम यांनी लिहिले होते. अल्ताफ यांच्या आवाजात हे गाणे येण्यापूर्वी अनेक वर्षे ते किरण पाटणकर सादर करीत असत. किरण पाटणकर या त्यांच्या वॉर्डातून बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविका होत्या. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी रामटेक मतदारसंघातून अनुक्रमे बसपा आणि वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूकही लढविली होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला गीतांचा साज वाढविणारा एक आवाज कायमचा पडद्याआड गेला आहे.


























































