कोकण Shopping

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नम्रता पवार

आपण जेव्हा खास एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा तिथे नेमकं काय मिळतं माहीत असणे खूप गरजेचं आहे. चला तर मग निसर्गसंपन्न कोकणात नेमकं काय खास मिळतं ते पाहू.

खाद्या ठिकाणी फिरायला गेलो की तेथे प्रसिद्ध असणारा खास पदार्थ वा वस्तू आपण आठवणीने घरी घेऊन येतो वा खास त्याचा आस्वाद घेतो. मात्र अनेकदा तिथं नेमकं काय पिकतं वा काय विकलं जातं याची काहीच माहिती नसते. अशावेळी फसगत तर होतेच, परंतु पैसेदेखील वाया जातात.
मुंबई-खरंतर पेण ते गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुठे काय खरेदी कराल?

वडखळ पेण गावामध्ये अनेक कातकरी स्त्रिया रानफळे, फुलं, नाचणी, मध, गावठी अंडी, ओले काजूगर, कुळीथ,भाज्या, सुके मासे अशा विविध मोसमाप्रमाणे वस्तू विकायला असतात. उन्हाळय़ात पांढरे कांदे, कलिंगड, पोहय़ाचे पापड, सुके मासे, कडवे वाल विकायला असतात. कारण पावसाळय़ात या पदार्थांचा साठा करून ठेवता येतो.

पावसाळय़ात मात्र विविध रानभाज्या, रानफुलं विकायला असतात, तर हिवाळय़ात ओले काजूगर, गावठी अंडी, कोकम, मध, नाचणीचं पीठ विकायला असतात.

पेणमध्ये लोकमान्य श्रीखंड खूपच प्रसिद्ध आहे. या श्रीखंडाची चव खरोखरच खूप छान आहे. सीताफळाचं श्रीखंड तसेच बासुंदीला अधिक मागणी असते. हे श्रीखंड आणि बासुंदी फक्त पेणमध्येच मिळतं.
इंदापूर माणगाव – हातसडीचा तांदूळ, गावठी पोहे, तेलवांगी, कडवे वाल मिळतात.
महाड – वटवाघुळ तेल (वातनाशक)
परशुराम घाट – मांसाहारी थाळी (हॉटेल ओमेगा)
चिपळूण – मांसाहारी व शाकाहारी थाळी (हॉटेल अभिषेक)
संगमेश्वर – मोहनथाळ (संगमेश्वरी खाजा)
रत्नागिरी (जयगड) – रीळे गावात विविध फळांचे जॅम आणि सरबत यांची फॅक्टरी आहे.
राजापूर – ठाकूर बेकरीतील मक्रुन्स, नानकटाई तसेच तिळाची नानकटाई व इतर बेकरी उत्पादनं प्रसिद्ध आहेत. मिरीचे लोणचेही प्रसिद्ध आहे.
कणकवली – मालवणी खाजा व खडखडे लाडू
कुडाळ – झांटय़े काजू, वालीच्या शेंगा, आईस्क्रिमची दुकानं प्रसिद्ध आहेत.
सावंतवाडी – माशांचे ताजे जेवण, मालवणी खाजा, लाकडी खेळणी, पुराणिकची स्पेशल कोकोनट बर्फी व आंबा नारळ वडी, फणसाचे काप व चिवडा.
गोवा – विविध फ्लेवर्सचे काजू मिळतात. यामध्ये खारवलेले काजू, भाजके काजू असतात. वुडन कार्व्हिग फर्निचर, पणजीला कॅफे रियलमध्ये बटाटय़ाची पातळ भाजी समोशासोबत देतात. कॅफे सेंट्रल हे वाईन केकसाठी प्रसिद्ध आहे.
सी फुडसाठी रिटझ् क्लासिक, स्पाईस गोवा, कॉपरलीफ, विनंती, पणजीत गीता बेकरी ही शंभर वर्षे जुनी व सुप्रसिद्ध बेकरी आहे.

स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी करा
कोकणात फिरताना तेथील खाद्यपदार्थ वा इतर प्रसिद्ध वस्तू खरेदी करायच्या असतील तर तिथल्या स्थानिक विक्रेत्यांकडूनच खरेदी करा. कारण यांचा उदरनिर्वाह निसर्गातील विविध गोष्टींवरच अवलंबून असतो. इथल्या हॉटेल्स आणि दुकानांमध्ये नेहमी ताजे पदार्थ विक्रीस ठेवलेले असतात आणि ते अतिशय रास्त भावात मिळतात.

कातकरी समाज हा अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि गरीब असा आहे. घरातील पुरुष डोंगरदऱयात, जंगलात जाऊन रानमेवा घेऊन येतात तर स्त्र्ाया हा रानमेवा बाजारात विक्रीस घेऊन येतात. यांच्या मालामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते. त्यांच्या उपजीविकेपुरतेच पैसे ते तुमच्याकडून घेतात.
गावठी मध, कोकम, अंडी, मोसमी फळं, सुकी मासळी, ओले काजूगर, हिरव्या ताज्या भाज्या या वस्तूंचं समाधान आपल्याला कमी किमतीत मिळतं. तेवढं समाधान आपल्याला मॉलमध्ये आकर्षक असलेल्या पॅकमध्ये असलेल्या महागडय़ा वस्तूंमध्ये कधीच मिळणार नाही.

कोकणी विक्रेत्याचा स्वभाव
कोकणात प्रवास करताना अनेक स्त्रिया खासकरून कातकरी समाजातील स्त्रिया माल विकण्यासाठी बसलेल्या दिसतात. अतिशय गरीब परंतु प्रामाणिक स्त्रिया व्यवहारात खूप हुशार असतात. आपले दोन रुपये जरी चुकून राहिले तरी मागून धावत येऊन आपल्या हातात देणार. अनेकदा निसर्गातील हा रानमेवा पाहून तसेच एवढे कमी दर पाहून आपण आहे त्या भावात या वस्तू विकत घेतो, मात्र काही महाभाग मात्र अजून किंमत कमी करून या विक्रेत्यांना जेरीस आणताना दिसतात. अशावेळी नाईलाजाने त्यांना किमती वाढवून सांगाव्या लागतात. या वस्तू निसर्गातील असल्या तरी त्यासाठी बरीच पायपीट करावी लागते आणि या पैशावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो हे लोक विसरून जातात.

एखादा कोकणी विक्रेता तुम्हाला प्रेमाने त्याच्याकडील फळं चाखायला देईल, एखादी जास्तीची भाजीदेखील देईल त्याचे पैसेदेखील घेणार नाही. परंतु त्याने सांगितलेल्या किमतीत तो अजिबात घासाघीस करणार नाही. कारण त्याला माहीत असतं की मुळातच त्याने खूप कमी किंमत लावलीय.
गोव्यात मात्र सगळे व्यवहार अतिशय सुशेगाद चालतात. मुळात इथल्या बाजारपेठा उशिराने उघडल्या जातात. दुपारी जेवणासाठी व वामकुक्षीसाठी दुकानं अर्धवट उघडी ठेवली जातात. वामकुक्षी झाल्यानंतर रात्री आठपर्यंत दुकानं बंद केली जातात.