लेख – शाश्वत विकासाच्या दिशेने कोकण

>> विश्वास मुळीक

शाश्वत विकास ही बदलत्या काळाची गरज आहे. याचा अनुभव आपण कोरोनाच्या लॉक डाऊनच्या काळात घेतला आहे. जेव्हा हिंदुस्थानसह संपूर्ण जगात लॉक डाऊन केले गेले तेव्हा काही कालावधीसाठी पृथ्वीने विश्रांती घेतली. त्यामुळे निसर्गात चांगले बदल घडून आलेले दिसले. जून महिन्यात अनलॉक काळात मुंबई ते सावंतवाडीपर्यंत प्रवास करताना मला हे दिसून आले. जणू काही निसर्ग या दिवसांची अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. हे बदल पर्यावरणाच्या दृष्टीने जरी अनुकूल असले तरी जगाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नव्हते. मानव पर्यावरणावर अवलंबून असला तरी त्याला स्वतःच्या कुटुंबाचे संगोपन करण्यासाठी आर्थिक गणित मांडून चालावे लागते. यामुळे पर्यावरण आणि विकास याची योग्य सांगड घातली गेली पाहिजे जी शाश्वत विकासाद्वारे शक्य होऊ शकते.

कोकणातील सिंधुदुर्ग जिह्यासह रत्नागिरी, रायगड हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित केले जाणार, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले. मागील आठवडय़ातच ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसारच हा निर्णय घेण्यात आल्याने या योजनेची अंमलबजावणी होणारच, असे म्हणणे योग्य ठरेल. या बैठकीला उपस्थित असलेले ज्येष्ठ शास्त्र्ाज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटिव रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवित कोकणच्या आणि राज्याच्या विकासासाठी या संकल्पनेची आवश्यकता असल्याचे सांगितले. या सर्व घडामोडी पाहता कोकण प्रांत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

शाश्वत विकास ही बदलत्या काळाची गरज आहे. याचा अनुभव आपण कोरोनाच्या लॉक डाऊनच्या काळात घेतला आहे. जेव्हा हिंदुस्थानसह संपूर्ण जगात लॉक डाऊन केले गेले तेव्हा काही कालावधीसाठी पृथ्वीने विश्रांती घेतली. त्यामुळे निसर्गात चांगले बदल घडून आलेले दिसले. जून महिन्यात अनलॉक काळात मुंबई ते सावंतवाडीपर्यंत प्रवास करताना मला हे दिसून आले. जणू काही निसर्ग या दिवसांची अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. हे बदल पर्यावरणाच्या दृष्टीने जरी अनुपूल असले तरी जगाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नव्हते. मानव पर्यावरणावर अवलंबून असला तरी त्याला स्वतःच्या कुटुंबाचे संगोपन करण्यासाठी आर्थिक गणित मांडून चालावे लागते. यामुळे पर्यावरण आणि विकास याची योग्य सांगड घातली गेली पाहिजे जी शाश्वत विकासाद्वारे शक्य होऊ शकते.

संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी सप्टेंबर 2015 मध्ये पार पडलेल्या सर्वसधारण शिखर परिषदेत ‘आपल्या विश्वाचे परिवर्तन’ असा ठराव पारित केला. या विषयपत्रिकेत समावेश असलेल्या शाश्वत विकासाची 17 ध्येये आणि 169 उद्दिष्टे 2030 पर्यंत साध्य करावयाची असून त्याची सुरुवात जानेवारी 2016 पासून झाली आहे. शाश्वत विकासाची ध्येये आणि त्याची उद्दिष्टे साध्य करण्याकरिता महाराष्ट्राने ‘व्हिजन 2030’ डॉक्युमेंट तयार केले आहे. कृषी व संलग्न कार्ये, उद्योग पायाभूत सुविधा, सामाजिक क्षेत्र व सुशासन हे ‘व्हिजन 2030’चे मुख्य आधारस्तंभ आहेत. याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित केले जाणार आहे. उशिरा का होईना पण शाश्वत विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने पावले टाकली याचे सर्वांनीच स्वागत करायला हवे.

याबाबत 2016 रोजी जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात एक राष्ट्रीय परिषद पार पडली होती. परिषदेचा विषय होता आंतर विद्याशाखीय शाश्वत ग्रामीण विकास दृष्टिकोन ः समस्या आणि आव्हाने (Interdisciplinary Approach to Sustainable Rural Development : Issues and Challenges) दोन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातून शंभराहून अधिक प्राध्यापक, प्राचार्य, तज्ञ आणि संशोधक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मी M.Philचा विद्यार्थी असल्यामुळे या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित होतो. मुंबई विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेत सिंधुदुर्ग जिह्याबाबत रिसर्च पेपर सादर करण्याची मला संधी मिळाली होती. या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शाश्वत विकासाबरोबारच ग्रामीण व तेथील जनतेच्या विविध समस्यांवर चर्चा झाली होती.

आता आपण ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव रिजनअंतर्गत नेमके काय केले जाते हे पाहूया. सर्वप्रथम या तीन जिह्यांचे इनोव्हेटिव सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणातून जिह्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेली जमीन, पाणी, वने याची माहिती गोळा करून विकास आराखडा निश्चित केला जाईल. आपल्याला एखादा प्रकल्प राबवायचा असेल तर वनक्षेत्र लागवडीखाली नसलेली मोकळी जमीनच निवडावी लागेल. पूर्वनियोजित प्रकल्प असलेली जमीन निवडता येणार नाही तसेच एखादा प्रकल्प कार्यरत असल्यास तो वाढविता येणार नाही. उदाहरणार्थ ग्रीनफिल्ड रिजन असलेल्या जिह्यात विमानतळ, विद्युत प्रकल्प इत्यादी यांची संख्या फक्त एकच राहील. पुन्हा त्याच ठिकाणी तसाच दुसरा प्रकल्प राबविता येणार नाही. बांधकाम क्षेत्राचा विचार केला तर त्यासाठी अनेक परवानग्या घेणे बंधनकारक असेल. जसे की बांधकाम हे पर्यावरणपूरक असेल, त्यातून कोणतेही प्रदूषण होणार नाही. बांधकाम क्षेत्र असलेल्या जमिनीवरील वनांची कत्तल न करता बांधकाम करावे लागेल. जमिनीच्या रचनेत अपवादात्मक परिस्थिती सोडून फेरबदल करता येणार नाही. आता आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे सर्व निर्बंध पाहता विकास होणे शक्य आहे का! नक्कीच करता येईल, अर्थात शाश्वत विकासाद्वारे.

तर आता आपण पाहूया ग्रीनफिल्ड रिजनमध्ये विकास कशा प्रकारे केला जातो. सर्वप्रथम ग्रीनफिल्ड रिजन असलेल्या भागाचे तज्ञांकडून इनोव्हेटिव सर्वेक्षण केले जाते आणि पुढील 100 वर्षांचा विचार करून विकासाचा आराखडा तयार केला जातो. जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असलेल्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. कोकण विभागातील हे तीन जिल्हे पहिले तर आपणास लक्षात येईल की जणू निसर्गाने या जिह्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगीच दिली आहे. निसर्गाने दिलेल्या या देणगीचे आपण जतन केलेच पाहिजे. यामुळे कोकणातील स्थानिक लोकांच्या काwशल्याला, त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळणार आहे. M.Phil आणि आता PhD च्या संशोधनानिमित्त मी गेली सहा वर्षे कोकणातील ग्रामीण भागात अनेक गावांना भेटी देत आहे. त्यातून असे दिसू आले की, कोकणात बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता प्रचंड आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर येथे संशोधन करण्यासाठी प्रचंड वाव आहे. जसे की सिंधुदुर्गातील सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेच, पण इतर तालुक्यांमध्येही आपणास विविध काैशल्ये पाहावयास मिळतात. बांबूचे फर्निचर, बांबूपासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू, अख्ख्या नारळापासून तयार केलेल्या कलाकृती, मातीचे घर इत्यादी. त्याशिवाय संपूर्ण राज्याला पुरवठा करू शकेल एवढय़ा विपुल प्रमाणात इथे झाडांचे (नर्सरी) उत्पादन करता येईल. कोकण विभागात वायुप्रदूषणाचे प्रमाण कमी आहे. यामुळे देशविदेशातल्या पर्यटकांची कोकणला पसंती अधिक आहे. ग्रीनफिल्ड रिजनमुळे वरील सगळ्या गोष्टीत वाढ व्हायला मदत होईल. यामुळे झाडांची संख्या वाढेल, पशुसंवर्धन होण्यास मदत होईल, जल साधनसंपत्तीत वाढ होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील स्थानिकांचे आरोग्य हे संपन्न राहील.

स्थानिक तरुणांना शिक्षण, व्यवसाय, रोजगारात नवीन संधी – इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजनमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर दिसू लागतील. परिणामी येथे हिंदुस्थानी पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल. यामुळे स्थानिक पातळीवर मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. कोकणातील विविध वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळेल. याचा परिणाम शिक्षणावरदेखील दिसून येईल. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात विविध विषयांचा समावेश करता येईल. जसे की टुरीझम मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी, ओशन एज्युकेशन, काwशल्य विकास, आधुनिक शेती व्यवस्थापन इत्यादी. बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे जिह्यातील तरुणांना लांब शहराकडे जावे लागणार नाही. त्यांना विविध व्यवसायाच्या संधी निर्माण होतील आणि व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळेल. उदाहरणार्थ पर्यटन व्यवसाय, नर्सरी उद्योग, लघुउद्योग, मत्स्यव्यसाय, सोलर प्रकल्पाला ग्रीनफिल्ड रिजनमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान असेल. या सर्व गोष्टींमुळे साहजिकच मोठय़ा प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होईल. कोकण हा डोंगराळ भाग असल्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण जास्त आहे तसेच सपाट जमिनीची संख्या फारच कमी आहे. अशा वेळी कमी जमिनीवर जास्त उत्पादन घेण्यासाठी व्हर्टिकल फार्मिंगचे व्यवस्थापन करण्यास ग्रीनफिल्ड रिजनमध्ये शासनाकडून मदत मिळू शकेल. ग्रीनफिल्ड रिजनमध्ये जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जाईल. कोकण भागात पावसाचे सरासरी प्रमाण 3000 ते 4000 मि. मी. एवढे असते. सद्य स्थितीत यातले बरेचसे पाणी हे वाया जाते. त्यावर इनोव्हेटिव संशोधन करून हे पाणी कसे साठवावे, त्याचा योग्य वापर कशा प्रकारे केला जाईल व वापरलेले पाणी पुन्हा दुय्यम गरजांसाठी कसे वापरता येईल याचा आराखडा तयार केला जाईल.

अशा प्रकारे तात्पुरत्या लोभाच्या हव्यासापोटी नैसर्गिक संसाधनांना ओरबडणारा विकास हा इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजनमुळे थांबला जाईल आणि सध्याच्या पिढय़ांच्या गरजा भागविताना पुढील पिढय़ांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी संसाधने शिल्लक राहतील अशा पद्धतीने विकासाचा आराखडा तयार केला जाऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या