प्रासंगिक – आषाढस्य प्रथम दिवसे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सौ. वनमाला पानसे

कवी कुलगुरू कालिदास ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणजे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशीच का आठवतात? कारण कालिदासाच्या ‘मेघदूत’ या महाकाव्यातील यक्ष एक वर्षभर आपल्या प्रिय पत्नीलाही भेटू शकणार नव्हता. रामगिरी पर्वतावर एकटाच राहणाऱया या यक्षाने आषाढ मेघाबरोबरच आपल्या प्रियतमेला जो संदेश पाठवला तो हा श्लोक-

‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्र्लिष्ट सानुं

वप्रक्रिडा परिणतगंज प्रेक्षणीयं ददर्श।।

‘मेघदूत’ या काव्याचे कथासूत्र असे आहे. अलकानगरीतील एका यक्षानं आपल्या कामात चुका केल्यामुळे अलकानगरीचा राजा कुबेर यक्षाला शाप देतो की, ‘यक्षा, तू माझ्या राज्यात राहून घोर अपराध केला आहेस, म्हणून मी तुला शाप देतो की, एक वर्षभर तुझं सर्व सामर्थ्य नष्ट होऊन तू दुबळा होशील. एक वर्षभर, तू तुझ्या प्रिय पत्नीलाही भेटू शकणार नाहीस.’

यानंतर आठ महिने रामगिरीवरील आश्रमात एकटाच राहात असताना आषाढ महिन्याच्या प्रारंभी त्या यक्षाला प्रियाविरहाचं दुःख असहय़ झालं. आषाढाचा महिना, आकाशात काळय़ा मेघांची दाटी झालेली, काही वेळाने पर्जन्यधारा भूमीवर कोसळू लागल्या. ‘गंधवतीः पृथ्वीः’च्या ओल्या मातीच्या सुगंधानं आसमंत भरून गेलेला. आषाढाच्या पहिल्या दिवशी कोसळणाऱया जलधारा बघून शापित यक्ष पत्नीच्या विरहानं अधिकच व्याकूळ झाला.

‘आषाढाचा प्रथम दिवस तो सुरम्य संध्येचा

वातावरणी भरून होता सुगंध प्रीतीचा

एक अनामिक हुरहूर हृदयी जशी कातरवेळ

प्रियतमेच्या आठवणीने उठे मनी कल्लोळ’

आपल्या पत्नीची प्रत्यक्ष भेट नाही तर तिला निदान प्रेमसंदेश तरी पाठवावा, पण कुणाबरोबर? या यक्षानं मेघालाच आपला दूत बनवून त्यांच्याबरोबरच आपला प्रेमसंदेश पाठवायचं ठरवलं. म्हणून हे ‘मेघदूत’ काव्य. नभांगणातल्या चांदण्या मोजता येत नाहीत तसा कविकुलगुरू कालिदासाच्या ‘मेघदूत’ या श्रेष्ठ काव्याचा आनंद मोजता येणारच नाही. तो नुसता अनुभवायचा आहे.

मेघदूतातील पहिल्याच श्लोकात शापित यक्ष राहात होता. त्या रामगिरीचं वर्णन आहे. जनकाची कन्या जानकी हिनं रामगिरीवरील सुंदर सरोवरात स्नान केल्यामुळे तेथील जल पवित्र झाले. प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना याच पर्वतावर विश्रांतीकरिता थांबले होते – तो हा रामगिरी.

रामगिरीवर अतिशय दुःखमय जीवन कंठणारा यक्ष पत्नीच्या विरहाने एवढा कृश झाला होता की त्याच्या हातातील सुवर्णकंकण गळून भूमीवर पडले.

विरही यक्षाने प्रेमळ शब्दानं मेघाचं स्वागत केलं व म्हणाला, ‘हे मेघा, तू माझा परममित्र आहेस. वैशाख वणव्याने तप्त झालेल्या धरित्रीला तू शीतल करतोस तसा माझा विरहाग्नी शांत कर. तुला मी माझी प्रिया राहात असलेल्या अलका नगरीचा मार्ग सांगतो व माझ्या प्रियेसाठीचा संदेशही तुला सांगतो.’

मेघाला दूत बनविण्याची कल्पना कालिदासासारख्या प्रतिभासम्राटालाच सुचणार.

आषाढ मेघाबरोबर संदेश पाठवायचं ठरल्यावर यक्ष मेघाला अलकानगरीचा मार्ग सांगतो. वाटेवरची वने-उपवने, त्यात फुललेली फुले, त्याभोवती गुंजारव करणारे भुंगे, उपवनात नाचणारे मोर बघून तू तेथेच न थांबता पुढे जा. यक्ष आणखी म्हणाला की, राजवाडय़ाच्या सौंद्यावर राजकुलातील सुंदर स्त्रिया बघून त्यांच्यात न रमता तू पुढे जा.

यानंतर फिरत फिरत तू गंगा-सरस्वतीच्या संगमावर जाशील. यक्ष मेघाला विचारतो की ‘प्रिय मित्रा, माझी प्रियतमा राहते ती अलकानगरी तू कशी ओळखशील? तर हे बघ जिच्या अंगांगावर पांढराशुभ्र हिम पसरला आहे अशी शुभ्रवसना अलकानगरी तुला लगेच ओळखता येईल. तेथील माझं घर तुला सहज ओळखता येईल. लांबूनच माझ्या घरासमोरचा पुष्पाच्या भारानं लवलेला मंदारवृक्ष दिसला की समज तेच माझे घर. ज्या माझ्या प्रिय पत्नीला संदेश देण्यासाठी तू जात आहेस ती माझ्या विरहानं कृश झालेली माझी प्रियतमा भूमीवर फुले मांडून विरह दिवसांची कालगणना करीत असेल. माझ्या प्रियतमेचे वर्णन माझ्या तोंडानेच कसा करू? माझी प्रिया म्हणजे विधात्याने सर्व कला-प्रतिष्ठा पणाला लावून निर्माण केलेली एकमेव स्त्री प्रतिमा आहे.

यक्ष पुढे मेघाला समजावून समजावून सांगतो की, ‘तू माझा परममित्र आहेस हे प्रियेला सांग. म्हणजे ती तुझा मोठा सन्मान करील.’ असं सांगून यक्ष मेघाला शुभास्ते पंथानः असे प्रवासाकरिता शुभेच्छा देतो.

‘मेघदूता’त शृंगाररस ठायी ठायी दिसला तरी त्याला अश्लीलतेचा स्पर्श नाही. यातून पती-पत्नीच्या सात्त्विक व अमरप्रेमाचा साक्षात्कार होतो. कालिदासाने मेघदूताखेरीज ऋतुसंहार, कुमारसंभव, रघुवंश ही काव्ये व मालविकाग्नीमित्रम, शाकुंतल व विक्रर्मोवशीय ही नाटके लिहिली. कालिदासाची ही काव्य-नाटके जगभर प्रसिद्ध आहेत. भारतीय साहित्यातून कालिदासाचं साहित्य वजा केलं तर खाली शून्य उरेल एवढं कालिदासाचं साहित्य मोलाचं आहे. म्हणूनच आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून या महाकवीच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण साजरा करतो. तोच हा ‘आषाढस्य प्रथम दिवसे.’