
>>प्रभाकर पवार
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील भीमा-कोरेगाव दंगलीनंतर पुणे पोलिसांनी पन्नासच्या वर आरोपींना अटक केली. परंतु ‘विद्रोही’ मासिकाचे संपादक सुधीर प्रल्हाद ढवळे (मुंबई), रोना विल्सन (नवी दिल्ली), इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्सचे सरचिटणीस अॅड. सुरेंद्र गडसिंग, निवृत्त प्राध्यापिका शोमा सेन (दोघेही नागपूर) व महेश सीताराम राऊत (चंद्रपूर) या पाच आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक तर आहेच, परंतु भविष्यात या देशात जातीय विद्वेष वाढविणारी आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी देश पोखरणाऱ्या माओवादी नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचे त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून आढळून आले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ज्या पद्धतीने तामीळ अतिरेक्यांनी मारले त्याच पद्धतीने सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा कट नक्षलवाद्यांनी रचला होता असेही पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष पोलीस पथकाच्या तपासात उघड झाले आहे.
भीमा-कोरेगाव दंगलीपूर्वी मुंबईचे सुधीर ढवळे व त्यांच्या सहकाऱयांनी पुण्यात आयोजित केलेल्या एका समारंभात केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे भीमा-कोरेगाव दंगल भडकली. म्हणजे भीमा-कोरेगाव दंगल माओवाद्यांच्या प्रोत्साहनामुळेच घडली असल्याचे पुरावे पुणे पोलिसांना सापडले आहेत. तेव्हा माओवाद्यांनी आता दलित चळवळीच्या बुरख्याखाली शहरी भागात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ज्या माओवाद्यांनी हसत हसत नेपाळ गिळंकृत केला ते माओवादी आता हिंदुस्थानचा लचका तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुणे, नागपूर, गुजरात, कोलकाता, मुंबई आदी भागांत माओवाद्यांनी आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. ज्या ज्या ठिकाणी दलितांचे, अल्पसंख्यकांचे, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत त्या त्या ठिकाणी माओवादी विचारांचे समाजकंटक घुसतात आणि प्रकरण चिघळून टाकतात. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर दलित नेते प्रकाश आंबेडकरांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्यानंतर माओवाद्यांनी त्याचा फायदा घेतला. बऱ्याच ठिकाणी माओवादी घुसले. त्यांनी दहशतीच्या जोरावर सर्वत्र बंद केला. मुंबईत तर प्रचंड तोडफोड केली. पार्क केलेल्या मोटारींची नासधूस केली. पोलिसांवर हल्ले केले. याला प्रत्त्युत्तर जर मुंबई पोलिसांनी दिले असते, लाठीचार्ज केला असता तर परिस्थिती आणखी चिघळली असती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कोणताही प्रतिकार केला नाही. त्यामुळेच बंद काळात मुंबईत शांतता होती. याचे श्रेय मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडलसगीकर व त्यांच्या ‘टीम’ला द्यावे लागेल. परंतु भविष्यात माओवादी शांत राहतील असे संभवत नाही. माओवाद्यांनी जसा पुण्यासारख्या शहरात शाळा-कॉलेजात व आयटी हबमधे शिरकाव केला आहे तसेच मुंबईतही बस्तान मांडले आहे. तेव्हा मुंबईतील माओवाद्यांना जर वेळीच ठेचून काढले नाही तर उद्या ते प्रत्येक चळवळीत छुप्या रीतीने भाग घेऊन मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील हे लक्षात ठेवा. गडचिरोलीसारख्या जंगली भागात माओवाद्यांकडे पोलिसांविरुद्ध लढण्यासाठी सैनिक आहेत, तर शहरी भागात राज्यकर्त्यांना जेरीस आणण्यासाठी फ्रंटल संघटना आहेत.
मुंबईच्या दहिसरपासून ते वरळीपर्यंत व चेंबूरपासून ते दक्षिण मुंबईपर्यंत ज्या ज्या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या वस्त्या आहेत अशा ठिकाणी माओवाद्यांनी आपले नेटवर्क तयार केले आहे. चळवळीच्या नावाखाली गोरगरीबांना राज्यकर्त्यांविरुद्ध भडकविले जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे जीवे ठार मारण्याच्या नुकत्याच धमक्या देण्यात आल्या आहेत. नाणार असो, जैतापूर असो, अथवा बुलेट ट्रेन असो अशा आंदोलनांना विरोध करण्यासाठी माओवाद्यांनी कंबर कसली आहे. स्थानिक लोकांच्या आंदोलनात घुसून हिंसाचार करायचा हेच या माओवाद्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कबीर कला मंचचे कार्यकर्ते कुठल्याही आंदोलनात भाग घेतात. या देशाचा विकास कसा खुंटेल यासाठी प्रयत्न करीत असतात. कोणत्याही आंदोलनात घुसून हिंसा करायचा हा एकमेव धंदा माओवाद्यांचा असून भीमा-कोरेगावची दंगल माओवाद्यांनी घडवून दोन जमातींमध्ये तेढ निर्माण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. इसिस, तालिबान, बोको हराम, लश्कर-ए-तोयबा, अल कायदा आदी अतिरेकी संघटनांपेक्षाही माओवाद्यांचा हिंसाचार भयानक आहे. आपल्या देशातील नक्षलवाद्यांना चीनमधून शस्त्र व पैसा पुरविला जातो. चीन व पाकिस्तान या देशांतून माओवादी नक्षलवाद्यांना रक्तलांच्छित हिंसाचारासाठी सतत प्रोत्साहित केले जाते. जातीधर्माच्या नावाखाली दलित व अल्पसंख्याकांना भडकविले जाते. तेव्हा अशा माओवादी विचारांच्या नेत्यांच्या संपर्कात अलीकडील तरुणांनी येऊ नये व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, नाहीतर या देशात अराजक माजेल, तरुण पिढी बरबाद होईल हे लक्षात ठेवा.






























































