लेख – मराठी आणि अभिजात भाषेचा दर्जा

>> योगेंद्र ठाकूर

केंद्र सरकारने आतापर्यंत कन्नड, मल्याळम, तामीळ, तेलुगू, संस्कृत व ओरिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. ज्या निकषावर या भाषांना अभिजात भाषा दर्जा दिला आहे ते निकष मराठी भाषाही पुरी करते. परंतु केंद्र सरकारने मान्यता दिली नाही तरी आपल्या सगळ्यांची मराठी भाषा ही ‘अभिजात’च आहे. कारण सुमारे 2250 वर्षांपूर्वीच्या ‘विनयपीटक’ या पाली भाषेतील बौद्ध धर्मग्रंथात महाराष्ट्राचा उल्लेख सापडतो, असं मत महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘अभिजात मराठी भाषा समिती अहवालमध्ये म्हटलेले आहे आणि ‘संशोधनाच्या आधारे एक सुसंगत आराखडा मांडायचा झाल्यास महारठ्ठी किंवा महाराष्ट्री म्हणजे मराठी भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा मराठी असेल अशी घोषणा 1 मे 1960 रोजी करण्यात आली. तरी या घोषणेला कायद्याचे स्वरूप 1965 मध्ये दिले गेले. त्याचवर्षी महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम 1964 हा कायदा विधान मंडळाने पास केला. त्यानुसार शासकीय व्यवहारांसाठी मराठी ही अधिकृत भाषा राहील, अशा प्रकारची अधिसूचना 1 मे 1966 रोजी काढण्यात आली. अशाप्रकारे मराठीला ‘राजभाषेचा दर्जा’ मिळून 55 वर्षे झाली. तर महाराष्ट्र राज्य निर्मितीला 61 वर्षे पूर्ण झाली तरी मराठी भाषेला अजून अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाला नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत कन्नड, मल्याळम, तामीळ, तेलगू, संस्कृत व ओरिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. ज्या निकषावर या भाषांना अभिजात भाषा दर्जा दिला आहे ते निकष मराठी भाषाही पुरी करते. परंतु केंद्र सरकारने मान्यता दिली नाही तरी आपल्या सगळ्यांची मराठी भाषा ही ‘अभिजात’च आहे. कारण सुमारे 2250 वर्षांपूर्वीच्या ‘विनयपीटक’ या पाली भाषेतील बौद्ध धर्मग्रंथात महाराष्ट्राचा उल्लेख सापडतो, असं मत महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘अभिजात मराठी भाषा समिती अहवाल – 2013’मध्ये म्हटलेले आहे आणि पुढे असेही नोंदवून ठेवलेय की, ‘संशोधनाच्या आधारे एक सुसंगत आराखडा मांडायचा झाल्यास महारठ्ठी किंवा महाराष्ट्री म्हणजे मराठी भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

मराठीची पूर्वपीठिका पाहिली तर तिला आपण महाराष्ट्र म्हणतो. त्या भूमीला इ. स. पूर्व चौथ्या-पाचव्या शतकापासून पृथगात्मता प्राप्त झाली होती असे दिसते. महाराष्ट्राच्या मराठीतील दिग्गज व्यासंगी संशोधक-अभ्यासकांनी वेळोवेळी तसेच म्हटले आहे.

डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्या ‘महाराष्ट्र संस्कृती’ (1979) या पुस्तकात, विविध अभ्यासकांची मते आढळतात. कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी आपल्या ठाणे- ग्रंथसंग्रहालय (इ. स. 1906), पुणे-ग्रंथकारसंमेलन (इ. स. 1908) व बडोदे-साहित्य संमेलन (1909) येथील भाषणांत प्राकृत व्याकरणकारांचा आधारही दिला आहे. विंध्याच्या उत्तरेस शौरसेनी व मागधी या संस्कृताचा अपभ्रंश होऊन निर्माण झाल्या व महाराष्ट्रात संस्कृतचा अपभ्रंश होऊन जी भाषा निर्माण झाली तीच महाराष्ट्री, असे प्राकृत व्याकरणकाराचे मत आहे. चिंतामणरावांच्या मते आर्य दक्षिणेत आले तेव्हा संस्कृत भाषा मृतच होती. ती फक्त ग्रंथातच चालू होती. आर्यांची बोलण्याची भाषा तिच्याहून भिन्न होती. त्या भाषेला महाराष्ट्रात विशिष्ट रूप येऊन तिची महाराष्ट्र प्राकृत भाषा झाली.

महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच भाषा होय, असे मत राजाराम रामकृष्ण भागवत यांनीही आपल्या ‘प्राकृत भाषेची चिकित्साः’ या निबंधात मांडले आहे. त्यांच्या मते महाराष्ट्री ही संस्कृतापासून उद्भवली हे खरे, पण ती लौकिक संस्कृतापासून नव्हे, तर संस्कृतच्या पूर्वरूपापासून. पुढे भागवत म्हणतात की, ‘प्राकृत भाषांची नावे त्या त्या लोकांवरून किंवा त्यांनी बसविलेल्या देशांवरून पडलेली आहेत, यात शंका नको. या दृष्टीने पाहता शालिवाहन, पैठण व महाराष्ट्र यांचा आज 2200 वर्षे अविभाज्य संबंध आहे. प्राचीन काळी हिंदुस्थानातील सर्व प्रांतांतील नाटकांत स्त्रियांच्या तोंडी महाराष्ट्री भाषा घालण्याची पद्धत होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राखेरीज इतर अनेक प्रांतांत महाराष्ट्री रूढ असल्याचे पुरावेही मिळतात. सातवाहनाचे साम्राज्य एक दोन शतके हिंदुस्थानातील अनेक प्रांतांवर होते. त्यांची भाषा महाराष्ट्री होती. हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. तेव्हा मराठय़ांच्या साम्राज्यकाळी ज्याप्रमाणे मराठी भाषा तंजावर, बंगलोर, ग्वाल्हेर, उज्जयनी, इंदोर इ. प्रांतात पसरली. त्याचप्रमाणे सातवाहनांच्या साम्राज्यकाळी त्यांची महाराष्ट्री साम्राज्यातील देशात पसरली असणे पूर्ण शक्य आहे. शिवाय महाराष्ट्री भाषा सौंदर्य, सौकुमार्य, मधुरता या गुणांमुळे सर्वत्र विख्यात झाली होती. व्याकरणकारांनी, कवींनी तिचे महत्त्व गायले होते. त्यामुळे ती स्त्रियांच्या तोंडी घालावी, असे नाटककारांना वाटणे साहजिक आहे.

महाराष्ट्री भाषा सर्व हिंदुस्थानभर प्रसृत होण्याचे आणखी एक कारण आहे. इ. पू. तिसऱया शतकात मगधप्रांती फार मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी भद्रवाहूच्या नेतृत्वाखाली हजारो जैन लोक महाराष्ट्रात येऊन राहिले. दीर्घ काळ येथे राहिल्याने त्यांनी येथल्या महाराष्ट्री भाषेतच ग्रंथरचना केली. जैनांचे बहुतेक सर्व कथावाङ्मय महाराष्ट्री भाषेतच असे. तिला जैन महाराष्ट्री म्हणतात. जैन धर्म सर्व हिंदुस्थानात पसरला आहे. तेव्हा महानुभवांच्या धर्मप्रसारामुळे ज्याप्रमाणे मराठीचा प्रसार महाराष्ट्राबाहेर पंजाब, काबूलपर्यंत झाला, त्याचप्रमाणे जैनांच्या धर्मग्रथांमुळे महाराष्ट्रीचा सर्व हिंदुस्थानात प्रसार झाला.
सातवाहन वंशाचे राज्य महाराष्ट्रावर इ. पू. 250 पासून इ. पू. दुसऱया शतकापर्यंत होते आणि या सातवाहनांचे नाणेघाट, कारला, कान्हेरी, नाशिक येथील सर्व शिलालेख महाराष्ट्रात आहेत. या लेखांतून सातवाहनांच्या पराक्रमाचे वर्णन महाराष्ट्रात-प्राकृतात केलेले आहे. सातवाहन काळात बोलली जाणारी प्राकृत अथवा महाराष्ट्री या मराठी भाषेच्या जननी आहेत. सातवाहनांच्या काळात पहिल्या शतकात हाल नावाच्या कवीने रचलेल्या ‘गाथा सप्तशती’ हा प्राकृत भाषेतील ग्रंथ किमान दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याशिवाय काही ग्रंथ, शिलालेख, संस्कृत असूनही अनेक मराठी शब्द असलेली शाकुंतल, मृच्छकटिकसारखी नाटके जुनी आहेत.

यापेक्षाही बलवत्तर व निःसंदेह पुरावा म्हणजे हाल सातवाहन या राजाने रचलेला ‘गाथा सत्तसई-सप्तशती’ हा ग्रंथ होय. हा ग्रंथ म्हणजे सुभाषितांचा कोश आहे आणि हाल राजाने अनेक ग्रथांतून व लोकांच्या पाठांतून सुभाषिते व गाथा, संग्रहित केल्या आहेत. अनेक ग्रंथांतून या गाथा वेचल्या याचा अर्थच हा की, यापूर्वी महाराष्ट्री भाषेत अनेक ग्रंथ झाले असले पाहिजेत आणि लोकांच्या पाठांतून या गाथा वेचल्या, यावरून महाराष्ट्री ही त्या वेळी लोकभाषा होती हे उघड आहे. महाराष्ट्री भाषेतील या सत्तसईमध्ये गोदावरी, सह्याद्री यांचा अनेकवार उल्लेख येतो. त्यामुळे तिची रचना महाराष्ट्रात झाली व ते त्या काळच्या महाराष्ट्रजीवनाचे वर्णन आहे यात शंका नाही. वर निर्देशिलेले शिलालेख इ. पू. दुसऱया, पहिल्या शतकातले आहेत. तर सत्तसईची रचना इ. स. पहिल्या शतकातली आहे. यावरून इ. पू. 3ऱया, 4थ्या शतकापासून महाराष्ट्री ही महाराष्ट्राची लोकभाषा होती हे निःसंशय दिसते.

अशा रितीने महाराष्ट्री ही महाराष्ट्राची भाषा होती व ती इ. पू. 4 थ्या, 5 व्या शतकापर्यंत मागे जाते याविषयी शंका राहत नाही. अशा अभिजात मराठी भाषेला केंद्र सरकारने ‘अभिजात’ भाषेचा दर्जा अजून मात्र दिलेला नाही. तरी आपली मराठी भाषा ‘अभिजात’च आहे.

आपली प्रतिक्रिया द्या