गणितज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे

डॉ. राजीव करंदीकर गणिताच्या आवडीने आकडय़ांच्या जगात रमणाण होत डॉ. करंदीकर इव्हीएमचं गणित सोपं करून सांगतात.

‘‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (ईव्हीएचा) वापर संपूर्णपणे सुरक्षित आणि खात्रीशीर असल्याबद्दल मी आश्वस्त असून उलट तो जुन्या मतपेटय़ांपेक्षा अधिक सुरक्षित आहे’’, असं मत प्रसिद्ध सेफॉलॉजिस्ट (निवडणूक अंदाजतज्ञ) आणि चेन्नई येथील चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिटय़ूटचे संचालक असलेले प्रसिद्ध गणिती डॉ. राजीव करंदीकर यांनी व्यक्त केलं होतं. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात मुंबई प्रेस क्लबमधील एका वार्तालापादरम्यान त्यांनी हे मत व्यक्त करताना स्पष्ट केलं होतं की, ‘‘मी कोणती राजकीय विचारसरणी वैयक्तिकरीत्या पसंत करतो याच्याशी माझ्या मताचा संबंध नसून विशुद्ध तांत्रिक आणि प्रक्रियात्मक बाबीच्या मूल्यांकनातून माझं हे मत बनलेलं आहे. ‘‘डॉ. करंदीकर एनडीए ईव्हीएम मशीन्समध्ये छेडखानी करतोय. या विरोधी पक्षांच्या आरोपाची चौकशी (शहनिशा) करणाऱया समितीचेही सदस्य होते, अशा प्रकारे त्या यंत्रांमध्ये फेरफार करण्याची शक्यता अनेकविध कारणांमुळे जवळजवळ नाहीच.’’

यासंदर्भात ते पुढे म्हणाले की, ‘‘ही यंत्रं अगदी रॅण्डमली मतदान केंद्रांना दिली जातात. त्यामुळे त्यांच्यामध्ये छेडखानी करणं प्रत्येक यंत्र पाठविण्यापूर्वी अशक्यच ठरतं. ही रॅण्डम निवड प्रत्येक टप्प्यावर दिल्लीपासून ते राज्य आणि जिल्हा मतदारसंघ व थेट मतदान केंद्र या सर्वच स्तरांवर होत असल्यामुळे अफरातफर अशक्य असते. शिवाय उमेदवारांनी नाव मागे घेण्याची शेवटची तारीख झाल्यावरच उमेदवारांची नावं मशीन्सवर येतात, कारण कोणालाही कोणता नंबर निवडायचा हे ठाऊक नसतं. मग एकच शक्यता ठरू शकते ती म्हणजे ज्या ठिकाणी मतदान आहे तिथे जेव्हा मशीन्स सीलबंद अवस्थेत पोहोचतात, परंतु आयआयटी आणि इतर प्रतिष्ठत संस्थांतील तज्ञांच्या समितीने सांगितलंय की, हे सील तोडणं आणि पुन्हा लक्षात न येता लावणं कठीण आहे.

थोडक्यात निवडणुकीच्या वादळी राजकीय वातावरणात एक विज्ञाननिष्ठ गणिती संख्याशास्त्रज्ञ किती महत्त्वाचा असतो हे आपल्या लक्षात आलंच असेल. मी रेडिओसाठी बनविलेल्या संख्याशास्त्रविषयक रेडिओ डॉक्युमेंट्री मालिका ‘‘संख्या लावा कामाला’’ बनविताना डॉ. करंदीकरांशी प्रदीर्घ चर्चा करून मुलाखत घेतली होती. त्यानंतर आजतागायत निवडणुकांचे अंदाज आणि डॉ. करंदीकर हे अगदी अभेद्य नातं असल्याचं लक्षात आलं होतं. परंतु डॉ. राजीव करंदीकर यांच्यामध्ये मुलांमध्ये गणिताची आवड कशी याविषयी बोलायला लागल्यावर जाणवतो तो त्यांच्यामधील गणिताविषयी संख्याशास्त्राविषयी मूलभूत विचार करणारा शिक्षक. ते म्हणतात, ‘‘मुलांना दैनंदिन आयुष्यामधील घटनांना समजून सांगत विश्लेषण करीत गणित शिकवायला हवं. केवळ प्रमेय व सिद्धांत मोडून त्याची सिद्धता नव्हे. त्यांना लॉजिकल विचार करणं शिकवावं लागेल तेव्हाच गणिताची भीती दूर होऊन ते त्यात आनंद घेऊ शकतील. माझ्या मुलाच्या बाबतीत मी हेच धोरण ठेवलं होतं.’’

आपल्या मुलांना गणित शिकविण्यासाठी स्वतःच्या चिंतनातील पद्धती वापरणाऱया डॉ. करंदीकरांना त्यांच्या गणिताचे शिक्षक / प्राध्यापक/ वडिलांनी थेट पुस्तक घेऊन शिकवलं नव्हतं. आपण जसे शिकविण्याचा प्रयत्न करतो तसं. डॉ. राजीव करंदीकर यांच्या संशोधन विषयात प्रोबॅब्लिटी थियरी, सेफॉलॉजी (भारतीय निवडणुकांच्या संदर्भात) आणि क्रिप्टोग्राफीसहित ऍनालॅटिक्सशी संबंधित अनेक विषयांचा समावेश आहे. गोपिनीय कल्याणपूर या आपल्या मार्गदर्शकांबरोबर त्यांनी दोन पुस्तकेही संख्याशास्त्राविषयी लिहिली आहेत. इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली.

एक्झिट पोल्स वा ओपिनियन पोल्स यावर विश्वास कसा ठेवायचा? ‘‘20 ते 25 हजार सॅम्पल साईज असलेल्या अभ्यासातून मॉडेलचा वापर करून 10 कोटी लोकांबाबत अंदाज कसा व्यक्त करता येतो? या प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष निकालांनी स्पष्ट झालेली असली तरी ती नेहमीच खरी ठरतील असं नाही हे, मात्र प्रांजळपणे ते नमूद करतात. अधिकाधिक अचूकता असण्याच्या दृष्टीनं मॉडेलची रचना हवी’’ असे ते आग्रहानं प्रतिपादन करतात. हिंदुस्थानमधील पहिले ओपिनियन पोल्स त्यांच्या मार्गदर्शनाखाली दूरदर्शन, आज तक (टीव्ही ट्रेंड) इत्यादींनी केले होते. सध्या ते एबीपीशी याबाबत संलग्न असून त्यांनी आयसीआयसीआय बँक आणि इतर अनेक वित्तीय संघटनांसाठी त्यांनी शिकविण्याचं काम केलंय.

भविष्यामध्ये संख्याशास्त्रीय विश्लेषणाचं महत्त्व खूपच असल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रत्यक्षात आपण अगदी आपल्या साध्या, परंतु दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या तंत्रावर आधारित गॅजेट्सच्या वापरातून अनुभवत आहोत. पर्यावरणातदेखील संख्याशास्त्र महत्त्वाचे ठरते. त्यांच्या वापरातून पर्यावरणाविषयी आपण सजग राहू शकतो. डॉ. राजीव करंदीकरांसारख्या संख्याशास्त्रज्ञांचे आभार मानावे तेवढे थोडेच नाही का? 3 जूनच्या जागतिक पर्यावरण दिनासाठी ते मानायला हवेच.