
>> वैश्विक
सूर्याच्या सर्वात जवळ असलेल्या बुधाची चर्चा फारशी होत नाही. एक तर तो इतर ग्रहांप्रमाणे आकाशात सहजतेने दर्शन देत नसल्याने आणि सूर्यतेजात लुप्त असल्याने त्याला पाहायचं तर पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर लगेच पूर्व किंवा पश्चिम क्षितिजाकडे नजर रोखायला हवी. तो क्षितिजावर जास्तीत जास्त 30 अंशच वर येत असल्याने क्षितिज ढगाळलेलं किंवा प्रदूषित असेल तर बुध दिसणं कठीणच. तो बिचारा मंद तेवणाऱया ज्योतीसारखा. त्याला शुक्राची तेजस्विता नाही. शुक्राप्रमाणेच बुधही सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणारा आंतरग्रह परंतु शुक्र सूर्यापासून थोडा दूर आणि क्षितिजावर जास्तीत जास्त 47 अंशांपर्यंत येणारा त्यामुळे हे दोन्ही ग्रह पूर्वेला उगवून किंवा पश्चिमेला उगवून पश्चिमेलाच मावळणारे असले तरी बुधाचं कोणाला अप्रूप नाही.
ते खगोल अभ्यासकाला मात्र असतं. नुसत्या डोळय़ांनी न दिसणाऱया अनेक खगोलीय ‘वस्तू’ दुर्बिणीतून शोधायची सवय असल्याने किंवा रोजच्या सरावाने त्या पटकन सापडत असल्याने निरीक्षक बुधाचाही वेध घेतात. आमच्या आकाशदर्शन कार्यक्रमात आम्ही सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी प्रेक्षकांना ‘बुध’ दाखवण्याची पराकाष्ठा करतो असा हा बुध लक्ष वेधून घेतो तो त्याचं ‘अधिक्रमण’ सूर्यबिंबापुढून होतं, तेव्हा पण तेव्हाही तो शुक्रासारखा ठसठशीत न दिसता अगदी बारीक ठिपक्यासारखाच दिसतो तरी असं ‘मर्क्युरी ट्रान्झिट’ पाहणं महत्त्वाचं. सध्या ते इतक्यात शक्य नाही आणि नुसता बुधही पाहणं? काळात कठीणच. तेव्हा त्याची थोडी वैज्ञानिक माहिती घेऊ.
बुध रोज सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर तासभर दिसू शकेल. या सूर्याच्या सान्निध्यातील ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर आहे. सुमारे 5 कोटी 79 लाख किलोमीटर म्हणजे पृथ्वीपासून तो 10 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा व्यास आहे 4880 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या एक तृतीयांशाने त्याचा आकार बुधही सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत वेगाने फिरतो. तो सूर्याच्या जवळ जातो तेव्हा 4 कोटी 60 लाख आणि दूर असतो तेव्हा 98 लाख किलोमीटरवर असतो. त्याचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे बुधावरून एखादा उपग्रह उडवायला सेकंदाला 4 किलोमीटरची गती पुरेशी ठरेल. पृथ्वीवर तीच गती 11 किलोमीटर असते पण अतितप्त बुधावर पाऊल ठेवणार कोण? त्याचं तापमान दिवसा 427 सेल्सिअस तर रात्री ’ 173 इतकं असतं. आपल्याकडे पारा चाळीस अंशाच्या जवळ जाऊ लागला की काहीतरी होते. रात्री शून्य तापमान अपल्याला असहय़ होतं. मग 427 अंशाचं ऊन? शून्याखाली 173 अंश असं गोठवणारी रात्र इतक्या विषम तापमानात तिथे कुठला जीव तग धरू शकेल?
मंगळाकडे माणसाचं जास्त लक्ष आहे. कारण या पृथ्वीसदृश शेजाऱयाकडे राहायला जाता येईल, असं संशोधकांना वाटतं. म्हणजे तिथे पर्सिव्हरन्स उतरतं आणि ‘इन्जेन्युइटी’ हेलिकॉप्टर उडतं! बुधाकडे जाण्याची हिंमत कोण करणार? तरीही अमेरिकेचं मरीनर-10 हे यान बुधाचा बोध घेण्यासाठी गेलं. हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असल्याने त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणामही यानावर होणारच. तो टाळण्यासाठी आणि वेग नियंत्रित करण्यासाठी मरीनरने 1 नोव्हेंबर 1973 रोजी उड्डाण केलं आणि पृथ्वी, शुक्र, बुधाच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत ‘क्लिंगशॉट’ (गोफण फेक) पद्धतीने 19 मार्च 1974 आणि 19 मार्च 1975 अशा दोन वेळा बुधाच्या अगदी जवळ जाऊन त्याचे फोटो घेतले, परंतु दोन्ही वेळेत त्याला बुधाच्या एकाच प्रकाशित बाजूचे फोटो मिळाले. त्यामुळे फक्त 45 टक्के बुध 1300 किलोमीटर अंतराळावर कॅमेऱयात टिपला गेला. मात्र त्यावर 1300 किलोमीटरचे कोलोमिस बेसिन (खोरे) असल्याचे लक्षात आले. बुधाच्या पृष्ठभागावर गेल्या 4 कोटी वर्षात सातत्याने उल्का व अशनी आढळल्याने त्याचा पृष्ठभाग चुण्या पाण्यासारखा झालाय. म्हणून त्याला ‘रिंकल्ड प्लॅनेट’ किंवा सुरकुतलेला ग्रह म्हणतात. प्रखर सूर्यप्रकाश पडूनही डांबरासारख्या पृष्ठभागामुळे बुध त्यापैकी 12 टक्केच परावर्तीत करतो आणि म्हणून तेजस्वी दिसत नाही.
3 ऑगस्ट 2004 रोजी ‘मेसेंजर’ हे अमेरिकेचे दुसरे सुसज्ज यान बुधाकडे झेपावले, पण त्याला बुधाच्या कक्षेत जायला तब्बल साडेसहा वर्षे लागली. अखेर 2008 आणि 2009 मध्ये त्याने बुधाचा 95 टक्के भाग टिपून सुमारे 10 हजार सुंदर फोटो काढले. त्यातीलच कोलोरिस खोऱयाचा फोटो लेखात आहे. ‘नासा’च्या उपक्रमाने बुध पृथ्वीवरील अभ्यासकांच्या अधिक जवळ आला, पण त्याला न्याहाळायचं तर नजर तयार आणि तीक्ष्णच हवी!






























































