लेख : वेबन्यूज: मोबाईल रेडिएशनचा धोका पुन्हा चर्चेत

1341

>> स्पायडरमॅन

‘मोबाइल रेडिएशनचा धोका’ हा कायमच शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय ठरलेला आहे. नुसते मोबाईलच नाही, तर बरेचदा मोबाईल टॉवरदेखील रेडिएशनच्या धोक्याला कारणीभूत असल्याच्या चर्चा झडतच असतात आणि त्यावरती वेगवेगळ्या संशोधकांची अभ्यासू मतेदेखील समोर येत असतात. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार ‘शिकागो ट्रिब्यून’ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामुळे सॅमसंग आणि आयफोनसारख्या मातब्बर मोबाईल उत्पादक कंपन्या कायद्याच्या कचाटय़ात सापडण्याची चिन्हे आहेत.

शिकागो ट्रिब्यूनने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालात संशोधकांनी सॅमसंग आणि ऍपलच्या काही डिव्हाइसेसमुळे घातक असे रेडिएशन पसरत असल्याचा दावा केला आहे. कायद्याने ठरवलेल्या मानकापेक्षा या उत्पादनातून होणारे रेडिएशन (radio-frequency radiation exposure) बरेच अधिक असल्याचे मत या संशोधकांच्या अहवालात मांडण्यात आले आहे. हा प्रसिद्ध करण्यात आलेला अहवालच आता या दोन कंपन्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे समोर आले आहे. संशोधकांनी दिलेल्या अहवालात या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनांचा उल्लेखदेखील करण्यात आला असून सॅमसंगची तीन मोबाईल उत्पादने आणि  iPhone 7 Plus, iPho हा 8 आणि iPho हा X या उत्पादनांचा या घातक रेडिएशन पसरवणाऱ्या मोबाईल उत्पादनांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ग्राहकांच्यात प्रचंड लोकप्रिय असलेल्या सॅमसंगच्या Galaxy S8 आणि Note8 सारख्या मॉडेल्सचा देखील या यादीत समावेश आहे. अमेरिकेत या रिपोर्टच्या अनुषंगाने लगेचच सॅमसंग आणि आयफोन या दोन्ही कंपन्यांवरती एक खटला दाखल झालेला असून या खटल्यास असा दावा करण्यात आला आहे की, एफसीसी (Federal Communications Commission) ने ठरवून दिलेल्या कायदेशीर मर्यादेपेक्षा या दोन कंपन्यांच्या काही मोबाईल उत्पादनांपासून होणारे रेडिएशन हे अधिक आहे आणि हे सरळ सरळ कायद्याचे उल्लंघन आहे. काही संशोधकांनी मात्र या अहवालाविषयी शंका उपस्थित केली असून अशा प्रकारचे अहवाल हे कितपत ग्राह्य मानावे असा थेट प्रश्नच त्यांनी विचारलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या