मुद्दा – मान्सून काळातील ‘नॉन कोविड’ आजार आणि उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कांचन नायकवडी

हिंदुस्थानसारख्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये मान्सून निसर्गाची पालवी फुलवण्यासोबत वातावरण नयनरम्य करतो. याच काळात विशेषतः वनक्षेत्रांमधील वनस्पती व प्राणी प्रफुल्लित होतात. तसेच पावसाळा शेतकऱयांसाठी लाभदायक असतो, ज्यांचे प्रमुख उत्पन्न स्रोत कृषी आहे.

हिंदुस्थानातील पावसाळा ऋतूदरम्यान विभिन्न समुदाय देवाचा आशीर्वाद घेत त्यांच्या कापणी हंगामाला साजरे करतात. असाच एक महत्त्वपूर्ण सण आहे ‘बेहदिएनख्लम.’ जो दरवर्षी हिंदुस्थानातील सर्वाधिक मुसळधार पाऊस पडणारे राज्य मेघालयमध्ये जुलै महिन्यात शुद्धीकरण विधी म्हणून साजरा केला जातो. या सणाच्या नावाचा अर्थ असा आहे की ‘कॉलरा राक्षसाचा पाठलाग.’

यामधून निदर्शनास येते की मान्सून दिलासा व नयनरम्य वातावरणासोबत अनेक आजारदेखील सोबत घेऊन येतो, ज्यामध्ये संसर्गजन्य आजारदेखील आहेत. म्हणून सल्ला आहे की सावधगिरी बाळगत पावसाचा आनंद घ्या. शेवटी, प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे.

खाली पावसाळ्यादरम्यान मानवांना होऊ शकणारे काही आजार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याविषयीचे उपाय दिले आहेत.

अन्न व पाण्यामार्फत होणारे आजार –

घरी ताजे शिजवलेले अन्न सेवन करणे हा आरोग्यदायी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पाणी उकळून किंवा गाळून पिणे अत्यंत आवश्यक आहे. वारंवार हात स्वच्छ धुवायला विसरू नका.

योग्य स्वच्छता राखली नाही तर सामान्यतः हिपॅटायटिस ए, कॉलरा, विषमज्वर व अतिसार हे आजार होतात. दूषित पाणी पिणे आणि अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले जंक फूड सेवन केल्यानेदेखील शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. या ऋतूदरम्यान प्रतिबंधात्मक काळजी घेतली नाही तर पोटासंबंधित आजार व ताप आणि काही केसेससंदर्भात हिपॅटायटिस ए, अॅक्यूट लिव्हर फेल्युअर असे गंभीर आजार होऊ शकतात.

मलेरिया व डेंग्यू –

मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचते आणि ते दीर्घकाळापर्यंत साचून राहू शकते. ही स्थिती डासांची निर्मिती होण्यासाठी अगदी अनूकूल आहे, ज्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार होऊ शकतात. डेंग्यू आजारामध्ये तुमच्या शरीरातील रक्तामधील प्लेटलेट्स कमी होतात आणि वेळेवर यावर उपचार न केल्यास मृत्यू ओढावू शकतो.

कीटकांपासून संरक्षणासाठी मॉस्क्विटो रिपलण्ट्स, मच्छरदाण्या उत्तम पर्याय आहेत आणि कीटकांचा घरामध्ये प्रवेश करण्याला प्रतिबंध करण्यासाठी सायंकाळपूर्वी दरवाजे व खिडक्या बंद करण्याचा पर्यायदेखील उपयुक्त आहे. रोपटे लावलेल्या भांडय़ामधील पाण्याचा निचरा करा आणि घरामध्ये पाणी साचू देऊ नका.

सामान्य फ्लू व व्हायरल ताप –

हवेमातर्फत पसरणारे हे आजार सामान्यतः वर्षभर असतात. पण पावसाळ्यादरम्यान या आजारांमध्ये झपाटय़ाने वाढ होते. हवेमध्ये उच्च प्रमाणात ओलावा निर्माण होत असल्यामुळे सूक्ष्मजीवांना विकसित होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते, ज्यामुळे आजारांमध्ये अधिक वाढ होते. याची काही लक्षणे आहेत, ताप, घसा खवखवणे, नाक गळणे, डोळ्यांमधून पाणी येणे.

  • पावसामध्ये मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद दिलासादायी असला तरी तसे न करणे योग्य ठरेल.
  • घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट अशा पावसापासून संरक्षण करणाऱया वस्तूंचा वापर करा. जीवाणू, विषाणूच्या संसर्गापासून संरक्षणासाठी चिखल व घाणेरडय़ा पाण्यातून चालू नका. नेहमी सोबत अतिरिक्त सॉक्स, शूज व कपडे ठेवा.
  • पावसातून घरी परतल्यानंतर जंतू दूर करण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करा.

आरोग्यदायी आहार सेवन करणे महत्त्वाचे –

पूर्वी सांगितल्याप्रमाणे अनेक आजार टाळण्यासाठी ताजे व आरोग्यदायी अन्न सेवन करणे आवश्यक आहे. सफरचंद, जांभूळ, लिची, मनुका, चेरी, पीच, पपई, पेअर्स व डाळिंब यांसारखी ‘हंगामी फळे’ पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारामधील सर्वोत्तम सप्लिमेण्ट्स आहेत. तसेच आरोग्यदायी व पोषक सूप्सचे सेवन करा. तळलेल्या स्नॅक्सच्या जागी भुट्टा, डिमसम्स, स्प्राऊट्स भेळ अशा भाजलेल्या पदार्थांचे सेवन करा. यामुळे ब्लोटिंग (गोळे येणे) टाळण्यामध्ये मदत होऊ शकते. लिंबू, मधासह बनवलेली हर्बल चहा आणि आले, लवंग, वेलची, दालचिनी, तुळस इत्यादींपासून बनवलेला काढा सेवन करत शरीर उत्तेजित करा.

यासोबत लक्षात ठेवा की, कोविड-19 चा प्रादुर्भाव अजूनही आहे. अनेक तज्ञ व एपिडेमिओलॉजिस्ट्सचा सल्ला आहे की, पावसाळ्यादरम्यान केसेसमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. आरोग्यदायी आहार सेवन करा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम व चिंतन करा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण शरीराची तपासणी करा. यंदा मान्सूनमध्ये घरीच राहा व आरोग्यदायी राहा. आरोग्यदायी जीवनासाठी प्रतिबंध महत्त्वाचा आहे.