आगळं वेगळं – एव्हरेस्टची उंची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

आशिया आणि युरोप दोन्हीकडच्या प्लेटस्च्या दबावामुळे हिमालयाची उंची हळूहळू वाढत असते तर अधूनमधून होणाऱ्या भूकंपामुळे ती कमी होते. निसर्ग काळाच्या ओघात स्थिरता आणतो आणि संतुलन साधतो. 1934 तील भूकंपामुळे 150 वर्षं झालेली उंचीतील वाढ एकदम कमी झाली. कमी जास्त उंचीचा असा खेळ चालूच आहे.

नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांनी एकत्र अगदी अलीकडेच जाहीर केलंय की जगातील सर्वात उंच शिखर, माऊंट एव्हरेस्ट, आता 0. 86 मीटर्स जास्त उंच आहे. हे आता जाहीर करण्याचं कारण आहे की अलीकडे परत त्याची उंची मोजण्यात आली. चीन आणि नेपाळ दोन्हींनी आतापर्यंत शिखरावर असलेलं हिम उंचीत धरायचं की नाही याबद्दल दोन्ही देशांत वाद होता. चीनचं म्हणणं होतं की एव्हरेस्टची उंची त्याच्या खडकांएवढी धरावी. तर नेपाळ म्हणत होतं की त्यावरील हिमदेखील त्याच्या उंचीचाच भाग आहे.

चीनच्या आधीच्या मोजमापाप्रमाणे या शिखराची उंची 8844.43 मीटर होती, जी नेपाळच्या मते जवळ जवळ चार मीटर कमी होती. एव्हरेस्ट हे शिखर चीन आणि नेपाळच्या सीमेवर आहे आणि दोन्ही बाजूंनी त्यावर चढता येतं. नेपाळचे परराष्ट्र मंत्रालय आणि पाहणी विभाग यांनी म्हटलं आहे की, दोन्ही बाजूंच्या जमिनीची मापणी करणाऱ्यांनी याच्या उंचीबाबत आता एकमत व्यक्त केलं आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जीनपिंग यांच्या नेपाळ भेटीप्रसंगी हे एकत्रपणे जाहीर केलं. आता दोघांच्या मते ही उंची 8848.86 मीटर्स एवढी आहे.

एव्हरेस्ट 50 ते 60 दशलक्ष वर्षं जुनं आहे आणि दरवर्षी याची उंची अर्धा मीटरने वाढते. हिंदुस्थान आणि युरेशिया या दोन्ही बाजूंच्या प्लेटस् दबावाने एकमेकांवर आदळल्याने मधली जी जमीन वर आली ती म्हणजे हिमालय. एव्हरेस्टवर भरपूर हिम साठलेले आहे आणि त्याच्या शिखरावर 6 जणांना उभं राहता येईल एवढी जागा आहे. या पाहणीसाठी सकाळी 03.00 ही वेळ पकडण्यात आली. कारण दिवसा सूर्य प्रकाशामुळे उंची मोजण्यात चूक होऊ शकली असती.

भूगर्भशास्त्रज्ञ असं मानतात की, भूविज्ञानाप्रमाणे 2015 मध्ये जो मोठा भूकंप झाला, ज्यामुळे नेपाळमध्ये मोठी हानी झाली. त्यामुळे हिमालयाच्या उंचीतील फेरफार झाले. 7.8 परिमाणाच्या या भूकंपामुळे नेपाळमधील 9000 माणसं मृत्युमुखी पडली, 18 गिर्यारोहक जिवाला मुकले. एव्हरेस्टवरील हिमही याच काळात कमी झाले असावे. लँगतांग हिमल या हिमालयातील शिखराची उंची सुमारे एक मीटरने कमी झाली. त्याप्रमाणे एव्हरेस्टची उंची वाढली असू शकेल.

पर्वतराजींची उंची मोजताना सरासरी समुद्र सपाटी आधारांक लक्षात घेतला जातो. त्यामुळे सगळ्याच पर्वतांची उंची मोजणं त्यामुळे सोपं होते. नेपाळ बंगालचा उपसागर पायाभूत धरत होतं. तर चीनने त्याच्या पूर्वेकडील शॅनडाँग परगण्यातील पिवळा समुद्र पाया धरून एव्हरेस्टची उंची मोजली. एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी दोघांनीही ट्रीगनॉमेट्रीचे फॉर्म्युले वापरले. (त्रिकोणाचा पाया आणि कोन यांचा गुणाकार करून त्याची उंची काढणे.) पण हे सगळं हुशारीचं काम असलं तरीही यासाठी कुणीतरी त्या पर्वताच्या अगदी वर असण्याची गरज होती. सर्वेक्षण करणारे नेपाळी गेल्या वर्षी या शिखरावर गेले तर चिनी 2020 च्या मे महिन्यात गेले. या दोघांनीही ट्रीगनॉमेट्रीबरोबरच ‘ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम’देखील वापरली.

नेपाळी पदाधिकाऱ्यांनुसार त्यांनी आजूबाजूची 12 कमी उंचीची व सरळ एव्हरेस्टकडे पाहणारी शिखरं, ट्रिगॉनॉमेट्रीसाठी वापरली. ज्यामुळे त्यांना अगदी बरोबर ऊंची मोजता आली. चीनमधील मीडियाने सांगितलं की चिनी पाहणीकऱ्यांनीही अशीच पद्धत वापरली. एकदा इशाऱ्याचा दिवा (beacon) पर्वत शिखरावर ठेवला की त्याच्या आजूबाजूच्या शिखरांवर असलेले पाहणी करणारे ती सहा शिखरं ते बीकन हे अंतर मोजू शकतील आणि पर्वताची उंची सहज मोजता येईल, असे जिआंग ताओ, सहयोगी संशोधक, ‘चायनीज अॅपॅदमी ऑफ आर्व्हेयिंग आणि मॅपिंग’ यांनी सांगितले.

याआधी चीनने दोन वेळा उंची मोजण्याचा प्रयत्न केला होता.  1975 मध्ये आणि नंतर 2005 मध्ये. दुसऱ्या पाहणीच्या वेळेला एव्हरेस्ट शिखरावर ‘ग्लोबस पोझिशनिंग सिस्टीम’चं यंत्र बसविण्यात आलं. या वेळेला मात्र ‘बायडो (Beidou)’ नॅव्हिगेशन सॅटलाइट सिस्टीम’ ही चीनची पद्धत वापरली गेली. यामुळे हिम किती खोलवर आहे, हवा, वाऱ्याचा वेग या साऱ्याचा अंदाज घेता येतो आणि याशिवाय पर्यावरण संरक्षणासाठी ही माहिती वापरता येते. नेपाळने मात्र ‘जीपीएस’ ही अमेरिकन पद्धत वापरली, जी आंतरराष्ट्रीय दृष्टीने मान्यता पावलेली आहे.

आशिया आणि युरोप दोन्हीकडच्या प्लेटस्च्या दबावामुळे हिमालयाची उंची हळूहळू वाढत असते तर अधूनमधून होणाऱ्या भूकंपामुळे ती कमी होते. निसर्ग काळाच्या ओघात स्थिरता आणतो आणि संतुलन साधतो. 1934 तील भूपंपामुळे 150 वर्षं झालेली उंचीतील वाढ एकदम कमी झाली. कमी जास्त उंचीचा असा खेळ
चालूच आहे.

[email protected]