सुभाषिणी – मुद्राराक्षस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ऋतुजा फडके

सात अंकांमध्ये समाप्त होणारं ‘मुद्राराक्षस’ हे नाटक एका वेगळ्या आणि विशिष्ट शैलीत बांधलेलं आहे. हे नाटक वाचताना आधुनिक पिढीला शेरलॉक होम्सची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे काय होणार ही आतुरता विशाखदत्तांनी अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवली आहे. विशुद्ध कूटनीतीने परिपूर्ण अशा राजनीतीला आधार बनवून हे नाटक लिहिलं गेलं आहे.

‘मुद्राराक्षस’ हे नाटक संस्कृत नाटय़सृष्टीतील एक प्रकाशमान हिरा आहे. या नाटकाच्या नाटककाराला या नाटकामुळेच महान संस्कृत नाटककारांच्या पंक्तीत जाऊन बसायचा मान मिळाला. नाटक वाचल्यावर आपल्या नक्कीच लक्षात येईल की, सरस्वतीने या नाटकाच्या नाटककारावर आपली स्निग्ध छाया कायम ठेवलेली आहे. हे नाटक म्हणजे नाटककाराच्या व्यावहारिक आणि राजकीय ज्ञानाचं प्रदर्शन आहे. पुन्हा या कवीचा कालखंड शोधणं म्हणजे इतिहासकारांसाठी महत्प्रयासच, पण तरीही या नाटककाराने नाटकाच्या प्रस्तावनेत या समस्येचा थोडय़ाफार फरकाने उलगडा केलेला दिसतो.

‘आज्ञापितोस्मि यथाद्य त्वया सामन्तवटेश्वरदत्तपौत्रस्य महाराजभास्करेदत्तसूनोः कवेर्विशाखदत्तस्य कृतिभिनवं मुद्राराक्षसं नाम नाटकं नाटयितव्यमिति।’

सामंत नटेश्वरदत्ताचा नातू, महाराज भास्करदत्ताचा पुत्र ‘विशाखदत्त’ यांची कृती म्हणजे ‘मुद्राराक्षस हे नाटक. त्यांच्या जन्मकाळाविषयी अजूनही बरेच मतभेद आहेत. तरीही त्यांचा कालखंड साधारणतः इसवी सनाचे सहावे शतक किंवा नवव्या शकाच्या आधी मानला जातो. त्यांचे ‘दत्त’ हे नाव आणि प्रस्तावनेत येणारा ‘बार्ली’च्या पिकाचा उल्लेख यावरून ते हिंदुस्थानच्या पूर्वेकडील राज्यात म्हणजेच बिहारमध्ये वास्तव्य करणारे असावे असेही मत आहे.

संस्कृत नाटककारांचं सगळ्या शास्त्रात पारंगत असणं हे एक भूषण आहे आणि त्याला विशाखदत्तसुद्धा अपवाद नाहीत. ‘मुद्राराक्षस’ वाचताना हे लक्षात येईल की, विशाखदत्तांकडे न्यायशास्त्र, नाटय़शास्त्र, अर्थशास्त्र, राजनीतिशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्र या सगळ्या शास्त्रांचे पांडित्य होते. परिस्थितीचा स्वाभाविकपणे चालू असणारा प्रवाह आपल्याकडे कसा वळवून घ्यायचा हा तर विशाखदत्तांचा हातखंड आहे. ‘मुद्राराक्षस’ या नाटकावरून एक गोष्ट नक्कीच प्रतीत होते की, विशाखदत्त हे वैदिक धर्माचे अनुयायी होते. आश्रमधर्मावर त्यांची श्रद्धा होती. वैदिक ऋषींचे दिव्य जीवन त्यांच्यासाठी आदर्श जीवन होते. वैदिक पद्धतीने दैनंदिन हवन इत्यादी कृत्यं करणं त्यांच्या दृष्टीने आदर्श पद्धती होती. त्यांचे आश्रयदाता विष्णूंचे उपासक होते, पण विशाखदत्त यांची भगवान शिवांवर अचल श्रद्धा होती असासुद्धा एक मतप्रवाह आहे. पौराणिक धर्मावर त्यांची निष्ठा होती. ग्रहण तसेच ग्रहणाच्या वेळी केली जाणारी सगळी धार्मिक कृत्यं यावर त्यांचा गाढा विश्वास होता.

सात अंकांमध्ये समाप्त होणारं ‘मुद्राराक्षस’ हे नाटक एका वेगळ्या आणि विशिष्ट शैलीत बांधलेलं आहे. हे नाटक वाचताना आधुनिक पिढीला शेरलॉक होम्सची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे काय होणार ही आतुरता विशाखदत्तांनी अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवली आहे. विशुद्ध कूटनीतीने परिपूर्ण अशा राजनीतीला आधार बनवून हे नाटक लिहिलं गेलं आहे. हे नाटक घटनाप्रधान आहे, परंतु रसाच्या दृष्टीने या नाटकात वीररसाचा उद्भेद झालेला दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकात वीररसाला उद्दिप्त करण्यासाठी कुठेही दुंदुभीची गर्जना नाही की कुणामध्ये युद्ध चालू नाही, गदा किंवा इतर शस्त्र्ाांचे आघात नाहीत, पण तरीही विजय आणि पराजय यांच्या मार्फत नाटकात वीररसाची प्रचीती येते. नाटकात नायिकासुद्धा नाही हे या नाटकाचं एक वैशिष्टय़. या नाटकाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे नाटकाची चतूरतापूर्वक बांधणी. ‘बुद्धी’ हा नाटकाचा स्थायिभाव आहे आणि याच बुद्धीचा प्रणेता आर्य चाणक्य नाटकाचा नायक आहे.

नाटकातून वीररस कसा उत्पन्न होतो, नाटकाची नेमकी कथावस्तू काय हे पुढच्या लेखात पाहू.

[email protected]