
उत्तर प्रदेशसारख्या राजकीयदृष्टय़ा अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रीय राजकारणाचे गणित अवलंबून असणाऱ्या राज्याच्या सत्ताकारणात सलग पाच दशके केंद्रस्थानी राहणे खचितच सोपे नाही. मात्र समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी हा चमत्कार करून दाखवला होता. सोमवारी वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, मात्र त्याआधीची 40-50 वर्षे मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे ‘श्वास’च होते. काही काळ राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू होण्याची किमयादेखील मुलायमसिंह यांनी करून दाखवली होती. केंद्रातील सत्तेत संरक्षण मंत्रीपदासारखे अत्यंत महत्त्वाचे खाते मुलायमसिंह यादव यांनी सांभाळले, पण त्यांच्या नशिबी पंतप्रधानपदाची खुर्ची मात्र नव्हती. एकदा नव्हे तर दोनदा, मुलायमसिंह या खुर्चीच्या अगदी जवळ पोहोचले होते, मात्र अंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणामुळे त्या पदाने दोन्ही वेळेस त्यांना हुलकावणी दिली. एकदा 1996 मध्ये वाजपेयी सरकार 13 दिवसांतच कोसळल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत आणि दुसऱयांदा 1999च्या लोकसभा निवडणुकीनंतर. 1996 मध्ये ज्योती बसू यांनी नकार दिल्यावर आणि लालू यादव चारा घोटाळय़ात अडकल्यावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते हरकिशनसिंह सुरजित यांनी पंतप्रधानपदासाठी मुलायमसिंह यादव यांचेच नाव सुचविले होते. मुलायमसिंह यांच्या शपथविधीची तयारीही सुरू झाली; परंतु पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि अचानक त्यांचे नाव मागे पडून पंतप्रधानपदाची लॉटरी अवचितपणे एच. डी. देवेगौडा यांना लागली. 1999 मध्येदेखील मुलायमसिंह यादव यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आघाडीवर होते. पण लालूप्रसाद, शरद यादव आणि इतर काही नेत्यांनी त्यात खोडा टाकला आणि नेताजींपासून पंतप्रधानपद दुसऱयांदा दूर राहिले. हे शल्य त्यांच्या मनात शेवटपर्यंत होते. एवढेच नव्हे, तर ज्यांच्यामुळे हे सगळे घडले त्या सगळय़ांची नावे त्यांनी एका जाहीर सभेत उघडपणे घेतली होती. मुलायमसिंह यादव हे एक वादग्रस्त नेते जरूर होते, परंतु उत्तर प्रदेशच्या आणि केंद्रीय राजकारणात त्यांचा प्रदीर्घ काळ वरचष्मा होता हे नाकारता येणार नाही. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्हय़ातील सैफई गावात एका सामान्य कुटुंबात जन्मलेले मुलायमसिंह यादव यांनी पदवी घेतल्यानंतर काही काळ शिक्षक म्हणून काम केले. मात्र 1960च्या दशकात समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी भारावलेल्या तरुणाईत मुलायमसिंहदेखील होते. डॉ. लोहियांच्या विचारांचे पाईक म्हणून पुढे दोन यादव देशाने पाहिले. एक लालूप्रसाद आणि दुसरे मुलायमसिंह. त्यावेळी मुलायमसिंह हे कुस्तीचे मैदान गाजविणारे पेहलवान म्हणूनही प्रसिद्ध होते. पुढे याच कुस्तीने त्यांची ओळख आमदार नाथुसिंग यांच्याशी झाली आणि तेथून मुलायम यांचा राजकारणी म्हणून श्रीगणेशा झाला. 1967 मध्ये वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी मुलायमसिंह यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. पुढे डॉ. लोहिया यांच्या निधनानंतर लोकदलमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर राजकारणात त्यांची ‘सायकल’ शेवटपर्यंत जोरातच धावली. 1980 मध्ये लोकदलचे अध्यक्ष, नंतर उत्तर प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते, 1989 मध्ये पहिल्यांदा, नंतर आणखी दोनदा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षणमंत्री असा मुलायमसिंह यांचा राजकीय आलेख चढताच राहिला. उत्तर प्रदेशात प्रदीर्घ काळ ते लोकप्रिय नेते म्हणून परिचित होते. मात्र असे असले तरी बाबरी मशीद प्रकरणातील करसेवकांवरील गोळीबाराचे त्यांचे आदेश, मुस्लिमांचे अतिरेकी लांगूलचालन आणि हिंदुत्वाबद्दलची एकूण भूमिका यावरून मुलायमसिंह यांची प्रतिमा ‘खलनायक’ म्हणूनही झाली. त्यांच्यावर पडलेले करसेवकांच्या रक्ताचे डाग शेवटपर्यंत कायम राहिले. त्यावेळी शरयू नदीत तरंगणारी रामजन्मभूमी आंदोलनातील साधूंची प्रेते ही मुलायमसिंह यादव यांच्या राजकीय कारकीर्दीची काळी बाजू त्यांना कायम मारक ठरली. त्यांचा राजकीय वारसा पुढे चालविणारे त्यांचे पुत्र अखिलेश यांची कारकीर्द मात्र ‘नेताजीं’सारखी बहरली नाही. आपल्या उत्तरायुष्यात मुलायमसिंह यांच्या मनात हे शल्यदेखील असावेच. अर्थात असे असले तरी उत्तर प्रदेशच्या राजकारणाला कलाटणी देणारा, काँग्रेससारख्या तेथील परंपरागत सत्ताधारी पक्षाला तेथे मुळापासून हादरा देत आपल्या समाजवादी पक्षाचे सरकार स्वबळावर स्थापन करणारा ताकदवान नेता, यादव आणि मुस्लिम असे ‘मायी’ हे समीकरण यशस्वी करीत तेथील राजकारणाचा बाज बदलून टाकणारा राजकारणी, सर्वसामान्यांचे ‘नेताजी’, डॉ. लोहियांच्या विचारांचा वारसदार ही त्यांची ओळख इतिहासात कायमच राहील.



























































