लेख: संत निवृत्तीनाथांचा हरिपाठ

568

>> नामदेव सदावर्ते

संत पंचरत्नांतील सद्गुरू निवृत्तीनाथ यांचा हरिपाठ अत्यंत उच्च प्रतीचा असून गूढ आत्मज्ञान प्रकट करणारा आहे. सध्याच्या युगात मानवी नीतीनियम व नैतिकता या गोष्टी चर्चेच्या झाल्या आहेत. अध्यात्म किंवा नामस्मरण याचा विचार कोणीही करत नाही. मात्र गेल्या काही शतकांत अनेक संतमहात्मे नामस्मरणाची महती गात उद्धरले. वारकरी, नाथ संप्रदायी, रामदासी आदी सांप्रदायिक भक्त नाममहिमा गात असत. निवृत्ती, ज्ञानराज, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी नामस्मरण भक्तीचा प्रचार करीत हरिपाठ गाईले आहेत. हरिपाठातून आत्मज्ञानही प्रकट केले आहे.

नवनाथांतील श्रेष्ठ सद्गुरू श्री गहिनीनाथ यांचा अनुग्रह लाभलेले संत निवृत्तीनाथ सर्वांना ईश्वरी नामस्मरणाविषयी आपले मनोगत हरिपाठातून प्रकट करीत आहेत. जनसामान्य भाविकांना सोपी उपासना, मार्गदर्शन व उपदेश करीत आहेत. संत निवृत्तीनाथांचा हरिपाठ पंचवीस अभंगांचा आहे, ते म्हणतात –

नामाचेनि स्मरणें नित्य पै सुस्नात ।

दुजियांची मात नेणो आम्ही ।।

माझ्या हृदयात श्रीहरीवाचून दुसरे दैवत नाही. वाणीने मी श्रीपतीचे नाम अखंडपणे घेत असतो. रामकृष्ण मूर्तीचे नाम मी सतत घेतो. त्यामुळे आम्ही तृप्त आहोत. नामस्मरणानेच आम्हाला नित्य मंगलस्नान घडते. नामस्मरणाशिवाय दुसरे काही आम्ही जाणत नाही. हृदयकमलात केशीराजाचे स्मरण करून आम्ही श्रीहरीच्या नामाचा अखंड जप करतो.

हरिवीण चित्ती न धरी विपरीत ।

तरताती पतित रामनामे ।।

विचारूनि पहा ग्रंथ हे अवघे ।

जेथे तेथे सांगे रामनाम ।।

वेदशास्त्र-पुराणांचा शोध घेऊन पहा, जिथे तिथे रामनामच तारक आहे असे सांगितलेले आहे. म्हणून हरिनामाशिवाय, श्रीहरिशिवाय ध्यानात, मनात दुसरे काहीच आणू नको. रामनामस्मरणाने पतितांचा उद्धार होतो. व्यासादिक मुनींनी

नित्य रामनाम घेतल्यानेच त्यांना वैकुंठ निवास प्राप्त झाले. शुकादिक मुनींनी संसारात विरक्त राहून निर्धाराने हरिनामोच्चार केला. मी रामनामी मन दृढ केल्यामुळेच सर्व गूढांची मला उकल झाली. 

एकाविण दुजे नाही पै ये सृष्टी ।

हे ध्यान किरिटी दिधले हरि ।।

एका श्रीहरीवाचून या सृष्टीत दुसरे काहीही नाही असे अर्जुनास श्रीहरीने ज्ञान-ध्यान दिले. विश्वरूपदर्शनाद्वारे हेच गुह्यज्ञान श्रीहरीने अर्जुनास दिले. अर्जुनास दिव्यदृष्टी दिल्यानंतर देवाने जे विश्वरूप दाखविले ते पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्यास आध्यात्मिक विराट स्वरूपाचे दर्शन घडल्यावर श्रीहरी या सर्व जीवमात्रात निरंतर भरलेला आहे हे गुह्यज्ञान घडले. सर्वत्र अद्वैताचे दर्शन झाल्यावर सृष्टीत श्रीहरीवाचून दुसरे दैवतच नाही हे आत्मज्ञान अर्जुनास प्राप्त झाले. हरिनाम जपाने आनंदाची अखंड पर्वणी साधते. संत निवृत्तीनाथ म्हणतात – 

निवृत्ती म्हणे हरिनामपाठ जपा । जन्मांतर खेपा अंतरती ।।

श्रीहरिनाम जीवाचा उद्धार करणारे आहे. याशिवाय दुसर्‍या तत्त्वाची थोरवी आम्ही जाणत नाही. नारायण नामजपाने अनेक पतित उद्धरून गेले. हरी हे एकच तत्त्व सर्वत्र भरलेले आहे, असे सर्व शास्त्र व पुराणे सांगतात. हरिनाम स्मरण केले असता यमकाळही थरथर कापतो. नामजपाने जन्ममरणाच्या खेपा चुकतात. 

गगनींचा घन जातू पैं वारेन । अवचिता पतन अधःपथे ।।

अध उर्ध्व हरि भाविला कुसरी । प्रपंच बोहरी आपोआप ।।

 

वायू आकाशातील मेघांना एकीकडून दुसरीकडे नेत असताना वितळून वरून अकस्मात पाणीरूपाने मेघ खाली पडतो. खाली आणि सर्वत्र हरीच भरला आहे असे जो मानतो, त्याची या संसारातून मुक्तता होते. सर्वत्र हरिमय सृष्टी पाहणार्‍याला प्रपंचाचा मोह उरत नाही. हरिस्मरणाने काळालाही मर्यादा पडते. देवतरूंमध्ये श्रेष्ठ अशा अश्वत्थ वृक्षाच्या प्रचंड पसार्‍याप्रमाणे या सृष्टीचा विस्तार आहे, असे शास्त्रात सांगितले आहे, पण आम्हाला हा विस्तार नको. प्रपंचाचा विस्तार वाढविणार्‍या वृक्षापेक्षा आम्हाला ईश्वर हवा. ‘श्रीहरी’ या अक्षराचे वळण इंद्रियांना लागले की, प्रपंच लहान व सोपा वाटू लागतो.

सर्वांभूती दयाशांति पै निर्धार ।

तो योगी साचार जनी इये।।

न लगे मुंडणे काया ही दंडणे ।

अखंड कीर्तने हरि स्मरे।।

या जगात सर्व प्राणिमात्रांच्या ठायी दया आणि शांती ठेवणारा निश्चित योगी समजावा. असा सर्वत्र ईश्वर पाहणारा योगी होण्यासाठी मुंडण अथवा देहदंड करावा लागत नाही. केवळ अखंड हरिनाम कीर्तन करावे. सर्व जीवात शिवात्मा वास करीत आहे. जीवमात्राच्या ठायी दया, क्षमा, शांती करुणामय वृत्ती ठेवावी. ज्याप्रमाणे सूर्य आकाशात प्रकाशतो आणि असंख्य नक्षत्रे लोप पावतात व तो एकटा सूर्य प्रकाशत राहतो, त्याप्रमाणे सर्व स्वरूपात आत्मा एकच आहे. चंद्र आकाशात येताच ज्याप्रमाणे पृथ्वीवरील कमळ उमलते, दोघांत एकच चैतन्य खेळत असल्यामुळे आनंद प्रकट होतो. 

ध्यान धरा हरि विश्रांति नामाची । विठ्ठली साची मनवृत्ती ।।

ध्यानेविण मन विश्रांतिविण स्थान । सूर्याविण गगन शून्य दिसे।।

श्रीहरीचे ध्यान करा. नाम हेच एक विश्रांतीस्थान समजा. म्हणजे मनाची वृत्ती विठ्ठलरूपी रंगून जाईल. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य नसला तर आकाश शून्य दिसते, त्याचप्रमाणे ध्यानाशिवाय मन, विश्रांतीशिवाय स्थान समजावे. मनाची वृत्ती विठ्ठलमूर्तीकडे लावण्यापेक्षा ‘वि-ठ्ठ-ल’ या तीन अक्षरांत वृत्ती ठेवावी. विठ्ठलनामाचा जप केला तर संसारुनिवृत्त असे मन मुक्त होते. मी विठ्ठल कीर्तनात मन रमवितो. त्यामुळे माझे मन विठ्ठलमय होते, असे निवृत्तीनाथ म्हणतात. 

प्रपंचाची वस्ती व्यर्थ काह्या काज ।

आम्हा बोलता लाज येत सये ।।

हरिनामाशिवाय या संसारात वसती करणे काय उपयोगाचे? नामावाचून या प्रपंचात दुसरे काही बोलण्यास लाज वाटते. काय करावे? हा हरी कसा भेटेल? ज्याप्रमाणे चंद्रसूर्य अमावस्येला एकत्र भेटतात, त्याप्रमाणे मन निरंतर हरीस्वरूपात एकरूप करू. तसेच आम्ही त्याचे निरंतर ध्यान करू आणि या ध्यानाने एकात्मतेची मनाची अवस्था हवी. हरिनामाचे पठण ही आमची वाट असून आम्ही नामस्मरणापुढे प्रपंच व्यर्थ मानतो.

 

लटिका संसार वाहाविसी व्यर्थ । विषयांचा स्वार्थ झणी करा ।।

 

संसार हा खोटा आहे. त्याचा भार विनाकारण कशाला वाहतोस? प्रपंच वाढवावा तसा विषयांचा स्वार्थ अधिक वाढत जातो. दुःखभाराने व्यर्थ शिणवू नको मन, शोक करू नकोस.

 

नामाचेनि बळे तरिजे संसार ।

आणिक विचार करू नको ।।

नाम जपा वेगी म्हणे हरिहरी ।

प्रपंच बोहरी आपोआप ।।

 

देवाचे नामस्मरण हीच शक्ती, या शक्तीनेच संसार तरून जाईल. रामनाम चिंतनाशिवाय दुसरा विचार करू नको. नामस्मरणाचा महिमा अनादी काळापासून आहे. नामसंकीर्तनाचे आद्य प्रणेते श्री नारद मुनी हे सतत ‘नारायण नारायण’ असे नामोच्चार करीत तिन्ही लोकांत संचार करीत होते. त्यांचेच शिष्य भक्त प्रल्हाद, ध्रुव, वाल्या कोळी, शबरी, बिभीषण, विदूर, उद्धव, सुदामा यांनी नामभक्ती करून ईश्वर उपासना केली. कलियुगात अनेक संतमहात्मे नामस्मरणाची महती गात उद्धरले. वारकरी, नाथ संप्रदायी, रामदासी आदी सांप्रदायिक भक्त नाममहिमा गात असत. निवृत्ती, ज्ञानराज, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी नामस्मरण भक्तीचा प्रचार करीत हरिपाठ गाईले आहेत. हरिपाठातून आत्मज्ञानही प्रकट केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या