
>> मोहन एस. मते
दुसऱया लाटेतील आकडय़ांना मागे टाकणारे कोविड संसर्गाचे आणि ओमायक्रोनचे आकडे सध्या समोर येत आहेत. यामध्ये तूर्त दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूचे अत्यल्प प्रमाण. त्याच्या मुळाशी आहे ते लसीकरण. अन्यथा आज हाहाकार उडाला असता. त्यामुळे ओमायक्रोनचे आव्हान पेलताना लसीकरणाला, बूस्टर डोसला जनतेने उत्स्फूर्तपणाने पुढे येऊन प्रतिसाद देणे आणि प्रतिबंधात्मक नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सिर सलामत तो पगडी पचास हा काळाचा मंत्र आहे.
कोरोना विषाणूचे संकट आल्यापासून मूळ विषाणू सातत्याने बदलत नवीन रूप घेऊन येत आहे. दरवेळी हा विषाणू नव्या रूपात आला की त्याच्या घडणीनुसार त्याला एक वैज्ञानिक नाव दिले जाते. मागील महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने एक नवा निर्णय घेतला की, कोरोनाच्या नव्या रूपाला उगम देशाची नावे दिली तर त्या देशांची बदनामी होत असल्याने या रूपांना ग्रीक अक्षरे द्यायची. ग्रीक लिपीत 24 अक्षरे आहेत त्यानुसार कोरोना विषाणूचा ब्रिटनमध्ये जो पहिला नवा प्रकार आढळला त्याला अल्फा, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या प्रकाराला बिटा, फिलिपिन्सच्या प्रकाराला थिटा, ब्राझीलच्या रूपाला गामा आणि हिंदुस्थानातील रूपाला डेल्टा ही नावे निश्चित करण्यात आली आहेत.
गतवर्षाखेरीस दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार आढळला आणि पाहता पाहता तो आज जगभरात पसरलेला आहे. ग्रीक अक्षरानुसार त्याला ओमायक्रोन हे नाव दिले आहे. याचे वैज्ञानिक नाव बी 1.1.529 असे आहे. दक्षिण आफ्रिकेत केवळ 20-25 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असल्याने तिथे ओमायक्रोन अत्यंत वेगाने पसरताना दिसला. त्यातच प्रामुख्याने हाँगकाँग, बेल्जियम आणि इस्रायल या देशातही कोरोनाचे या प्रकारचे रुग्ण सुरुवातीला आढळले आहेत. जगातील अन्य काही देशांत याचे प्रमाण वाढते आहे. अमेरिकेतील विषाणूतज्ञांच्या मते सध्याच्या लसी ओमायक्रोनवर परिणामकारक आहेत का? हा प्रकार अधिक घातक आहे का? याबाबत अद्याप काहीही ठोस सांगता येत नाही. पण जगभरात ओमायक्रोनच्या संसर्गाच्या वेगाने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क राज्यात पूर्वीच कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने तेथील गव्हर्नरनी आपत्ती आणीबाणी जाहीर केली.
पहिल्या आणि दुसऱया लाटेत महाराष्ट्राला, मुंबईला प्रचंड फटका बसला. तो केवळ आर्थिक आणि जीवितहानी करणारा होता असे नव्हे, तर एकूणच महाराष्ट्राच्या समाजजीवनावर त्याचा विचित्र परिणामही झाला. या धक्क्यातून महाराष्ट्र अजूनही म्हणावा तसा सावरलेला नाही. कुटुंबामधल्या बऱयाच व्यक्ती निघून गेल्यामुळे एक विचित्र वातावरण अनेक कुटुंबाना अनुभवावे लागले आहे. हा सगळा अनुभव लक्षात घेऊन सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना लोकांनीसुद्धा स्वयंप्रेरणेने, समंजस बुद्धीने आणि अतिशय संवेदनशीलतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे. ज्या गोष्टी सहजपणे करणे शक्य आहे त्याला प्राधान्य देऊन पुढाकार घेतला पाहिजे. अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी या देशांनीसुद्धा लोकांना सावध करून काळजी घेण्याचे आव्हान सुरुवातीपासून केले आहे. कोरोना काय किंवा ओमायक्रोनसारखे प्रकार काय, भविष्यात केव्हाही निर्माण होऊ शकतात. तो धोका कायमचा लक्षात ठेवायला हवा. स्वयंप्रेरित उपाययोजना लोकांनी करणे आता खूप आवश्यक ठरते.
मिनी लॉक डाऊन याचा अर्थ अंशतः संचारबंदीच म्हणता येईल. मात्र त्यात लोकांनीच समजूतदारपणा दाखवून आपल्या अनावश्यक व्यवहारांवर नियंत्रण आणले पाहिजे. विषाणूंचा प्रसार संसर्गजन्य आहे. म्हणजेच गर्दीमुळे तो अधिक मोठय़ा प्रमाणात वेगाने पसरतो हे लक्षात घेता सर्वप्रथम गर्दी टाळण्यावरच भर दिला पाहिजे. आवश्यक अशा कामासाठी बाहेर पडताना फिजिकल डिस्टन्सिंग काटेकोरपणे कसे पाळता येईल याचा विचार गांभीर्याने झाला पाहिजे. मास्क हा प्रकार तर आता पुढची काही वर्षे वापरावा लागेल अशीच आज परिस्थिती आहे. लोकल रेल्वे, बसेस या ठिकाणी अनावश्यक गर्दी होणार नाही किंवा गर्दी टाळून प्रवास करणे शक्य होईल असा विचार लोकांनी करायला हवा.
2021 हे संपूर्ण वर्ष कोरोनाग्रस्त होते. 21 व्या शतकातलं हे एकविसावं वर्ष जगातील प्रत्येकाचा जीव कासावीस करून गेले. मानवी इतिहासांमध्ये हे वर्ष कायमचे लक्षात राहील. जगभरात लाखो लोकांचे जीव घेणारे आणि जगण्याविषयी सतत दहशत निर्माण करणारे वर्ष असेदेखील त्याचे चित्र लोकांच्या मनामध्ये घर करून राहणार आहे. आज 2022 चा विचार केला तर वेळ काय सांगून येईल याचा भरवसा नाही. कोविडचे संकट कमी-अधिक प्रमाणात या वर्षातही कायम राहातील की काय असेच चित्र सध्या दिसते आहे. कोरोनापाठोपाठ ज्या पद्धतीने नवीन नवीन विषाणू संक्रमित होत आहेत त्यावरून ही शृंखला कायम राहील आणि लोकांना आता सगळ्या विषाणूंशी संघर्ष करीत जगावे लागेल असे दिसते. या पार्श्वभूमीवर वेगवेगळे उपाय शोधत स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सतत प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
आतापर्यंत जगातल्या अनेक देशांना त्या देशातील अनेक नेत्यांना, बुद्धिवंतांना, एवढेच नव्हे तर सामान्य माणसालासुद्धा आपण खूप सुरक्षित आहोत असा अभिमान वाटत होता. विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर म्हणजेच आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण कोणत्याही समस्येशी लढू शकतो, अशी एक जबरदस्त भावना निर्माण झाली होती. मात्र कोरोनाने अभिमानाच्या या फुग्यातली हवाच काढून टाकली आहे. जगाला वेगवेगळ्या औषधांमधून, शस्त्र्ाामधून सुरक्षित करण्याचा कितीही दावा केला असला तरी सुद्धा आधी स्वतःला सुरक्षित करण्याची कसोटी कोरोनाच्या काळात पार पाडावी लागली. येणाऱया काळातही काही बंधने किंवा वेळेचे भान ठेवून जीवनशैली सांभाळावी लागेल. त्यातून आपण सुरक्षित तर जग सुरक्षित असा एक नवा व्यवहार अमलात आणावा लागेल. प्रामुख्याने तुम्ही जो मास्क वापराल तीच कोरोना किंवा ओमायक्रोनवरची लस आहे असे समजून घराबाहेर पडताना कायम मास्क वापरण्याची सूचना या शब्दामधून जागतिक आरोग्य संघटनेनी केली आहे. ओमायक्रोनची लक्षणं वेगळी आहेत. त्यामुळे त्यावर कोरोनासंदर्भात वापरली गेलेली लस पूर्णपणे प्रभावी ठरेल की नाही याबद्दल संशोधन सुरू आहे. पण लस घेतलेल्या व्यक्तींना या विषाणूसंसर्गापासून सुरक्षाकवच मिळाले आहे हे निश्चित आहे. अन्यथा गेल्या 8-10 दिवसांत ज्या पद्धतीने ओमायक्रोनचा आणि कोविडचा प्रसार देशात झाला आहे त्यामध्ये मृत्यूसंख्या कमालीची वाढली असती. पण सध्या ती अत्यंत कमी आहे. याचे श्रेय लसीकरणाला दिले गेले पाहिजे. तथापि, हीच परिस्थिती यापुढेही कायम राहील याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. विषाणूंमध्ये म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन होतच असते. त्यातून नवा व्हेरियंट तयार होऊन नवे संकट उद्भवू शकते. ते टाळायचे असेल तर संसर्ग वेळीच रोखणे गरजेचे आहे. यासाठी लसीकरणाला जनतेने उत्स्फूर्तपणाने पुढे येऊन प्रतिसाद देणे आणि प्रतिबंधात्मक नियमावलींचे काटेकोरपणाने पालन करणे आवश्यक आहे. गरजा कमी ठेवण्याचा सध्याचा काळ आहे. बचेंगे तो और भी लढेंगे हे समयसूत्र आहे. सिर सलामत तो पगडी पचास हा काळाचा मंत्र आहे. काळासोबत चालणे याकडे अपरिहार्यता किंवा अगतिकता म्हणून न पाहता त्यातच शहाणपण असते हे प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवे.































































