ठसा – डॉ. प्र. ल. गावडे

>> किरण गोटीमुकुल

ज्ञानदानाचे महत्कार्य अव्याहतपणे सुरू ठेवत शिक्षण क्षेत्रातील कार्यात नवनवीन प्रयोग करून त्यात नावीन्य निर्माण करणारा ज्ञानसाधक, विद्येचा उपासक म्हणजे डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे (प्र. ल. गावडे). आज त्यांच्या एका माजी विद्यार्थ्यांचा सकाळीच ते गेल्याचे दुःखद वृत्त सांगणारा फोन आला.

माझी गावडे सरांशी वैयक्तिक ओळख नव्हती, पण सावरकर अभ्यासक म्हणून त्यांनी संपादित केलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध मी अभ्यासत होतो तेव्हा सरांविषयी अधिक माहिती कळली. सरांनी संपादित केलेल्या प्रबंधाचे ‘सावरकर ः एक चिकित्सक अभ्यास’ हे पूर्वी प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक नुकतेच नव्याने पुनःप्रकाशितही झाले आहे. हा ग्रंथ पु. ग. सहस्त्र्ाबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वि. म. महाजन सरांचे मित्र यांच्यामुळे साकारला गेला. अत्यंत मितभाषी असलेल्या गावडे सरांचा नेवासे येथे 20 जून 1924 साली जन्म झाला. त्यांचे वडील लक्ष्मण रंगनाथ गावडे हे न्यायालयात नोकरीला होते. डॉक्टर गावडे सरांचे माध्यमिक शिक्षण अहमदनगरच्या ‘भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात’ झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते पुण्यात आले. प्रथम ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ आणि नंतर सर परशुराम भाऊ महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. 1950 साली ते बी.ए. झाले. त्यानंतर 1952 मध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांनी एकाच वेळी मराठी आणि संस्कृतमध्ये घेऊन पुणे विद्यापीठातून ते एम.ए. झाले. तसेच 1956 त्यांनी शिक्षण क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम एम.एड. पूर्ण केला. गावडे सरांचा ज्ञानर्जनाचा हा प्रवास अखंडपणे सुरू होता. पुढे 1968 साली त्यांनी पुणे विद्यापीठातून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर विद्यावाचस्पती (पीएच.डी.) मिळवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पीएच.डी. करणारे ते प्रथम व्यक्ती होते. सावरकरांचे भव्य-दिव्य साहित्य त्यांनी चिकित्सक आणि संशोधक वृत्तीने अभ्यासले होते. या त्यांच्या पीएच.डी. प्रबंधास पुणे विद्यापीठाचा ‘न. चिं. केळकर पुरस्कार’ तसेच ‘परांजपे पुरस्कार’ प्राप्त झाला. ‘सावरकर – एक चिकित्सक अभ्यास’ या प्रबंधाचे ग्रंथरूपात प्रकाशन झाल्यावर 1971-72 मध्ये त्या ग्रंथासही महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला.

प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांचे ज्ञानदानाचे कार्य अग्रेसर होत गेले. 1946-1982 या प्रदीर्घ कालखंडात गावडे सरांनी अध्यापक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, नूतन मराठी विद्यालय, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे गरवारे कला, वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन केले. तसेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय, पुणे आणि पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग या ठिकाणीही अध्यापन त्यांनी केले. मराठी वाङ्मय हाच त्यांच्या अध्यापनाचा मूळ विषय होता. डॉक्टर प्र. ल. गावडे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान प्रदीर्घ आणि मौल्यवान आहे. शैक्षणिक लेखन, संत साहित्यावर लेखन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर लेखन, स्वतंत्र लेखन यातून गावडे सरांनी विपुल लेखन केले. तसेच शासकीय पाठय़पुस्तक-निर्मितीसाठी संपादनही त्यांनी केले होते. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, व्यासंग, सखोल चिंतन, संशोधन यातून ‘कवी यशवंत- काव्यरसग्रहण’ तसेच ‘सावरकरांचे साहित्यविचार’ ही स्वतंत्र पुस्तके त्यांनी लिहिली. संत तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, हे संतसाहित्य गावडे सरांचे संशोधन विषय होते. आज गावडे सर आपल्यात नाहीत, पण त्यांची विपुल साहित्य-संपदा तसेच त्यांचे संशोधन कार्य त्यांची सतत आठवण करून देत राहील.

आपली प्रतिक्रिया द्या