मुद्दा – पोलिसांवरील हल्ल्यांसाठी ‘कठोर शिक्षा’च अनिवार्य!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेश राणे

मुंबई आणि परिसरातील दोन भिन्न घटनांत पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या. एका घटनेत दुचाकीवरून जाणाऱया महिलेच्या जोडीदाराने हेल्मेट, मास्क घातला नव्हता. त्याविषयी विचारल्यावर महिलेने वाहतूक पोलिसास अमानुष मारहाण केली. याची क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाली. दुसऱया घटनेत काम संपवून घरी जात असलेले हवालदार बाळू चव्हाण यांना कारमधील व्यक्तींच्या कपडय़ांवर रक्ताचे डाग दिसले. ते पाहून गाडी अडवल्याच्या रागातून चौघांनी त्यांच्यावर तलवार, कोयता, रॉडने हल्ला केला. चोरी, खून, मारामारी आदी गुन्हे समाजात घडत असतात. यासह लक्षवेधी अपराध म्हणजे पोलिसांना मारहाण होणे. याविषयी मुंबईतील या घटनांच्या निमित्ताने त्यांच्यावर प्रकाश टाकणे अनिवार्य ठरते. पोलिसांशी अयोग्य वर्तन करणे, त्यांच्याशी नाहक हुज्जत घालणे, त्यांच्यावर धावून जाणे अशा घटना घडल्या आहेत. हेही लक्षात घेऊया.

वाहतूक पोलिसांना मारहाण केली, त्यांच्यावर अरेरावी केली याची नियमानुसार शिक्षा म्हणून काही दिवस तुरुंगात राहून बाहेर पडल्यावर पुन्हा तशीच अरेरावी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुजोरी नसानसांत भिनलेल्यांची मुजोरी त्याच पठडीतील शिक्षा करून जिरवली पाहिजे. उदा. वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱया मुजोरांना आधी पोलिसी खाक्या दाखवून त्याला वाहतुकीची व्यस्तता असलेले सर्कल, चौक या ठिकाणी बेडय़ा ठोकून उभे करण्यात यावे. जेणेकरून तो पळून जाणार नाही. तसेच तेथून ये-जा करणाऱया सर्वांना कळेल की, वाहतूक पोलिसांशी अयोग्य वर्तन करणारा मुजोर हाच आहे. तसेच पोलिसांशी अयोग्य वर्तन करणाऱयांना पोलिसांच्या पायावर डोके टेकवून क्षमा मागून घ्यावी. प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया यांतूनही त्या गोष्टीचा प्रसार होऊन मुजोरांचे चेहरे, नाव आदी माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवावी. ज्याने ज्या नियमाचे उल्लंघन केले आहे, त्याला शिक्षाही त्याच क्षेत्राशी निगडित अशी होणे आवश्यक झाले आहे. वाहतूक पोलिसांशी, अन्य क्षेत्रातील पोलिसांशी अयोग्य वर्तन केल्यावर तुरुंगात ठेवतील यापेक्षा अधिक काही होणार नाही, अशी मानसिकता असू शकते. तिला छेद देण्यासाठी ‘जशास तसे’ उत्तर म्हणजे शिक्षा झाली तर वाहतूक पोलीस यंत्रणेवरील ताण अल्प होण्यास सहाय्य होईल असे वाटते. मुजोरांच्या मुसक्या कठोरपणे आवळण्यासाठी कठोर पावले टाकावीच लागणार आहेत. तरच मुजोरांची पावले कर्तव्यावर असणाऱया पोलिसांना हात घालण्याच्या उद्देशाने वळणार नाहीत.

वाहतूक पोलीस, अन्य विभागांतील पोलीस यांना पुढील अनुभव कधी ना कधी आला असेल. मला ओळखत नाही का? मी अमूक व्यक्तीचा तमूक नातेवाईक आहे. माझ्यावर कारवाई करण्याचा विचार जरी केला तरी महागात पडेल, अशी पळपुटी मानसिकता असलेले आयजीच्या जिवावर बायजीगिरी करण्यातच धन्यता मानतात. कोणाचे तरी नाव सांगून त्याच्या जिवावर मिरवण्यात कसला आला अभिमान? स्वतःचे कर्तृत्व सरळ मार्गावर चालून सिद्ध करता येत नसेल तर अशा कुठल्या तरी कुबडय़ांचा आधार घेतला जातो. पोलीस यंत्रणेवर कोणाच्या तरी नावाचा उपयोग करून दबाव टाकला जात आहे का? याचे बारकाईने परीक्षण करून तसे करणाऱयांनाही सुतासारखे सरळ केले पाहिजे. कायद्यापुढे सर्वच समान हा संदेश पोहोचलाच पाहिजे.

देशातील महानगरे, मोठी शहरे येथे वाहनांची संख्या अधिक आहे. अर्थातच त्यामुळे होणारे वायुप्रदूषणही अधिकच आहे. अशा बिकट स्थितीत वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य निभावत असतात. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे मास्क घालणे अनिवार्य झाले आहे. वाहनांतून निघणाऱया धुरामुळे होत असलेले प्रदूषण ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणावर होत असते त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सांभाळण्याचे दायित्व असणाऱया वाहतूक पोलिसांच्या तोंडावर मास्क आणि काही वेळा गॉगल पाहण्यास मिळतो. कडक ऊन असेल तर त्याचे चटके सहन करत तापत्या डांबरी रस्त्यावर उभे राहत कर्तव्य बजावावे लागते. एकंदरीत ही स्थिती जरी बारकाईने पाहिली तरी एका जिवाची कर्तव्य बजावताना काय घालमेल होत असेल, याची कल्पना येते. मीच शहाणा आणि मीच कोणीतरी मोठा अशा स्वतःच्या गुर्मित असणारे मुजोर लोक वाहतूक पोलिसांना त्रस्त करीत असतात. वाहतूक पोलिसांना मारहाण करण्याच्या घटना अशा मुजोरांकडून झाल्या आहेत. या विरुद्ध समाजात प्रचंड संताप आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी काही कडक शिक्षांचा कायद्यात अंतर्भाव करता आला तर चांगले होईल असे वाटते.