लेख – जगाची एक गंभीर समस्या

>> रमेश कृष्णराव लांजेवार

वाढत्या लोकसंख्येचा धोका पाहता जागतिक स्तरावर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याची नितांत गरज आहे. लोकसंख्यावाढ ही जगातील प्रत्येक देशाच्या विकासामध्ये व्यत्यय निर्माण करीत असते. जगाची लोकसंख्या 1987 ला 500 कोटी होती.यानंतर 2019 मध्ये 770 कोटींवर पोचली. यात सर्वाधिक लोकसंख्या आशिया खंडात 446.27 कोटी असल्याचे दिसून आले. हिंदुस्थानचा विचार केला तर 1951 साली फक्त 36 कोटी लोकसंख्या होती, ती आजच्या घडीला 135 कोटी झाली आहे हा हिंदुस्थानसाठी चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. 2014 च्या आकडेवारीनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश याप्रमाणे प्रथम चीन, हिंदुस्थान, अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया व जपान. 438 कोटी लोक या दहा देशांत राहतात. हा आकडा जागतिक लोकसंख्येच्या 57 टक्के इतका आहे. आज संपूर्ण जगात लोकसंख्या वाढीचा विचार केला तर भूभागाच्या तुलनेत लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान प्रथम क्रमांकावर आहे. चीन दुसऱया क्रमांकावर आहे. आज हिंदुस्थानची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रत्येक राज्याने पुढाकार घ्यायला पाहिजे. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक देशांना कठोर परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. यामुळे बेरोजगारी, उपासमारी, महागाई, शेतकऱयांच्या आत्महत्या, महागडे शिक्षण, कुपोषण, पाणीटंचाई, इंधन समस्या इत्यादींचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या प्रत्येक देशाला विकासापासून वंचित करण्याचे कार्य करीत असते. याकरिता लोकसंख्या नियंत्रण काळाची गरज आहे. लोकसंख्यावाढीमुळे जंगलसंपदा संपुष्टात येत आहे.त्यामुळे आज जंगलातील हिंसक प्राणी शहरांकडे धाव घेताना दिसतात. आज जगाला लोकसंख्यावाढीपेक्षा वृक्ष वाढविण्याची नितांत गरज आहे. कारण आज पृथ्वी लोकसंख्यावाढीच्या भाराखाली दिवसेंदिवस दबत आहे. त्यामुळे आज लोकसंख्यावाढीपेक्षा निसर्गवाढीवर हिंदुस्थानसह संपूर्ण जगाने जास्त भर दिला पाहिजे. निसर्गाचा ऱहास आणि लोकसंख्यावाढीचा त्रास दिवसेंदिवस संपूर्ण जगाला होत आहे. याला कोठेतरी रोखले पाहिजे. मानवाच्या अतिरेकामुळे आज पृथ्वीचे संतुलन डगमगताना दिसत आहे. कोविड-19 महामारी हीसुद्धा मानवाच्या अतिरेकाचे कारण आहे. चीनमध्ये एवढी लोकसंख्या वाढली आहे की, तेथील लोक समुद्रकिनाऱयावर राहतात. लोकसंख्यावाढीमुळे जग भुईसपाट व्हायला काहीच वेळ लागणार नाही.त्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे प्रत्येक देशाचे प्रथम कर्तव्य असायला पाहिजे. लोकसंख्यावाढीमुळे दरडोई उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. समस्यांनी हिंदुस्थानसह अनेक देशांमध्ये विक्राळ रूप धारण केले आहे. याला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. जगात व देशात वाढत्या प्रदूषणाला जबाबदार वाढती लोकसंख्याच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या