ठसा – प्रा. मोहन आपटे 

2435

>> दिलीप जोशी

1980 मध्ये झालेले खग्रास सूर्यग्रहण हा मला वाटतं. आजच्या काळातील खगोलीय अभ्यासाच्या दृष्टीने ’टार्ंनग पॉइंट’ होता. कारण त्यापूर्वी सुमारे 80 वर्षे हिंदुस्थानातून असं ग्रहण दिसलं नव्हतं. या अवकाशी ‘सोहळ्या’विषयी त्या काळात वैज्ञानिक माहिती देऊन ठिकठिकाणी व्याख्याने देणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रा. मोहन आपटे यांचा मोलाचा वाटा होता. ग्रहण किंवा धूमकेतू अशा गोष्टींविषयीची धास्ती दूर करून वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्याचं कार्य आपटे सरांनी सातत्याने केलं.

रात्रीच्या निरभ्र आकाशात दिसणारे हजारो तारे आणि दीर्घिका (गॅलेक्सी), तेजोमेघ (नेब्युला) वगैरेंचा सर्वसामान्यांना सोप्या भाषेत परिचय करून देणारी कितीतरी व्याख्यानं  सरांनी महाराष्ट्रभर सादर केली. विज्ञानातील अनेक विषयांवर सुमारे 75 पुस्तकं त्यांनी लिहिली.  त्यातही खगोलशास्त्रावर त्यांनी विपुल लिखाण केलं. मुंबईच्या भवन्स महाविद्यालयात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपटे सर कार्यरत होते. भौतिक शास्त्राला खगोल भौतिकीचं परिमाण प्राप्त होणारं संशोधन 1950 पर्यंत वेग घेऊ लागलं होतं. आपला ग्रह असलेली पृथ्वी, आपला चंद्र, आपली सूर्यमाला, सूर्यासारखे असंख्य तारे सामावणाऱ्या दीर्घिका आणि अशा कोटय़वधी दीर्घिकांचं विराट विश्व यांचा कठीण वाटणारा अभ्यास अतिशय सोप्या शब्दांत मांडणच कठीण होतं, परंतु आपटे सरांनी ते काम सहजतेने केलं. त्यांच्या व्याख्यानातून ते विश्वरचनेपासून ते आताच्या प्रगत रॉकेट सायन्सपर्यंत अनेक विषयांवर श्रोत्यांना आकर्षित करणारी व्याख्यानं देत असत.

आधुनिक विज्ञानाबरोबरच जागतिक आणि हिंदुस्थानातील प्राचीन विज्ञानाचा अभ्यास त्यांनी बारकाईने केला. आपल्या महाराष्ट्रात चाळीसगावजवळच्या पाटणादेवी गावात बाराव्या शतकात होऊन गेलेल्या भास्कराचार्यांच्या संशोधनाविषयी 800व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी या वैज्ञानिकाच्या कार्याची माहिती देणारी परिषद 1993 मध्ये आयोजित केली होती. अशा कार्यक्रमांमधून तरुण खगोल अभ्यासकांना विश्वाकडे नव्या नजरेनं पाहण्याची संधी दिली. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी खगोल शास्त्राचा सखोल अभ्यास केला. ‘खगोल मंडळा’सारख्या आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना त्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. खगोलविषयक कोणताही प्रश्न असल्यास सरांना केवळ फोन केला तरी सविस्तर उत्तर ते देत असत.

त्यांच्या या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल ‘खगोल मंडळा’ने  2005मध्ये त्यांना ‘भास्कर पुरस्कार’ प्रदान केला. ‘शतक शोधांचे’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी विविध वैज्ञानिक संशोधनाची नोंद सोप्या शब्दांत घेतलेली आढळते. आपटे सरांचं मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होतं. ते स्वतः डावखुरे असल्याने ‘डावखुऱ्यांचे जग’ हे वेगळंच पुस्तक त्यांनी लिहिलं. शाळा-महाविद्यालयात असताना भरपूर व्यायाम करून त्यांनी कणखर शरीरसंपदा प्राप्त केली होती. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन-चार दिवस बाहेरगावी राहण्याची वेळ आली तर पहाटे उठून सर व्यायाम करीत आणि तरुण कार्यकर्त्यांना तसे करण्यास प्रवृत्त करत. उत्तम शरीरप्रकृती लाभलेल्या सरांनी कधीकाळी कुस्तीसारख्या खेळातही भाग घेतला होता. बौद्धिक काम करणारे अशा मैदानी खेळांत प्रावीण्य मिळवताना अपवादात्मक आढळतात. सरांची चित्रकला उत्तम होती. त्यांनी काढलेली स्केचेस त्याची साक्ष देतात. याशिवाय अनेक गड -किल्ल्यांची भ्रमंती, इतिहासाचा अभ्यास अशा कितीतरी गोष्टींत त्यांना रस होता.

ब्रिटिश कौन्सिलतर्फे त्यांना युरोपातील काही विद्यापीठांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते स्वखर्चाने अमेरिकेत गेले. तिथेही त्यांनी तिथल्या विद्यापीठांची कार्यपद्धती जाणून घेतली. आपल्याकडील शिक्षण पद्धतीशी तुलना करून त्यांच्या महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स, स्क्रीन प्रिंटिंग असे विविध अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. अनेक संस्थांच्या स्थापनेत आणि कार्यकर्ते घडविण्यात त्यांचा सहभाग होता, परंतु त्याचा ‘मोठेपणा’ त्यांनी कधीच मिरवला नाही. ते सातत्याने एका प्रामाणिक आणि कळकळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतच वावरले. त्यामुळेच तरुणाईशी त्यांचं सतत नातं जुळलं. वयाने ज्येष्ठ असूनही ते तरुण सहकाऱ्यांच्या भावना आणि विचार समजून घेत असत.

औदार्य हा सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. त्यांनी अनेक होतकरू तरुणांना, संस्थांना उदारहस्ते मदत केली. मात्र त्याची कुठेही वाच्यता होऊ दिली नाही. शेवटच्या वर्ष-दीड वर्षाच्या कालावधीत श्वसनाच्या आजाराने मात्र त्यांना खूपच त्रास दिला. तेवढा काळ वगळता त्यांचं जीवन हे एका उत्साही माणसाचं होतं. तो उत्साह आमच्यासह अनेकांना प्रेरणादायी होता. विज्ञानाच्या क्षेत्रात नेमक्या आणि मोजक्या शब्दांत मांडणी कशी करावी याचे धडे आम्ही सरांकडून शिकलो. ‘अभ्यासोनि प्रगटावे’ या वृत्तीने त्यांनी ज्ञानसाधना केली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी मागे ठेवलेला ज्ञानसंचय भावी काळातही अनेकांना मार्गदर्शन करीत राहील.

आपली प्रतिक्रिया द्या