ठसा – अभ्यासू पत्रकार

>> दिलीप जोशी

ज्या काळात पत्रकारितेमध्ये महिला अभावानेच असायच्या त्या काळातल्या ज्येष्ठ पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा गेल्या 9 जुलैला कालवश झाल्या. पंच्याऐंशी वर्षांच्या दीर्घ जीवनात त्यांनी सुमारे सत्तर वर्षे लेखन केले. अगदी तरुण वयात सामाजिक भान असलेल्या पुष्पाताईंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही भाग घेतला होता.

त्यांच्या पत्रकारितेचा आरंभ झाला तो आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मधून. अत्र्यांची घणाघाती पत्रकारिता त्यांना जवळून पाहता आली. त्या काळात रिपोर्टिंग, मुलाखती आणि विविध विषयांवरचे त्यांचे लेख ‘मराठा’त प्रसिद्ध झाले. त्या काळातल्या रोटरी प्रेसमध्ये छापल्या जाणाऱया वृत्तपत्राची मांडणी (ले- आऊट) संपादकीय विभागातलंच कुणीतरी करायचं. ‘मराठा’च्या रविवार पुरवणीचा ले-आऊट वसंत सोपारकर आणि पुष्पा त्रिलोकेकर करत असत. पुष्पाबाई मला खूपच सीनिअर. पण त्यावेळी सोपारकर, निशा, पंढरी, भाऊ, स्वाती, प्रदीप, पुष्पा यांच्या मित्रपरिवारात समावेश झाल्यावर सर्वांशी एकेरी संबोधनाचं नातं जुळलं.

महिलांचे प्रश्न, पर्यावरण अशा विषयात पुष्पा यांना खूप रस. त्यावर तिथे त्यांनी भरपूर लिहिलं. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक गोष्टींवरही लेखन केले. कालांतराने पुष्पा ‘श्री’ साप्ताहिकासाठी काम करू लागल्यावर त्यांच्याशी गप्पा, चर्चा वगैरे गोष्टी होऊ लागल्या. अनेक राजकीय घटनांमागचा इतिहास त्यांना ठाऊक असायचा. मतभेद झाले तर त्या हिरीरीने वाद घालायच्या. आमच्या या मित्रपरिवारात मतैक्यापेक्षा मतभेद आणि वादविवादच जास्त. पण सारं जेवढय़ास तेवढं. त्याचा मैत्रीवर परिणाम नाही. उलट आम्हा सर्वांचं ‘विस्तारित कुटुंबच’ त्या काळात तयार झालं. महिन्या-दोन महिन्यांत लोणावळय़ाला ज्येष्ठ पत्रकार श्याम मोकाशींच्या घरी डेरा टाकून चर्चासत्रे रंगायची. त्यातून नवनवे विषय मिळायचे.

हे करत असताना पुष्पाचं स्वतंत्र लेखनही सुरू असायचं. त्यांची ‘मिशन अंतरिक्ष’, ‘पृथ्वीचे मारेकरी’, ‘प्रकाशनगरी काशी’ अशी अनेक पुस्तके आली. ‘द्रौपदीची थाळी’ या पाककृतीवरच्या पुस्तकाला तर प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये पुस्तक किंवा लेखाला आकर्षक ‘शीर्षक’ देणं दिसायचं. ‘श्री’मध्ये सुंदरलाल बहुगुणांच्या ‘चिपको’ आंदोलनावर मुखपृष्ठ-कथा लिहिताना पुष्पाने ‘हिमालयाची बोडन्ती’ असं शीर्षक सुचवलं. बोडन्ती म्हणजे भादरणे. हिमालयातलं जंगल भादरून तो उघडा-बोडका होतोय हे शीर्षकातूनच समजत होतं. योग्य ‘शीर्षक’ देण्याची कला आम्ही सोपारकरांकडून शिकलो.

पुष्पा आणि प्रदीप यांनी देशभर भरपूर प्रवास केला आणि विविध ठिकाणी जाऊन तिथल्या ऐतिहासिक गोष्टींबरोबर जनजीवनही न्याहाळलं. त्यावर लघु चित्रपटही त्यांच्या ‘संस्कृती संवर्धन अभियान’ने बनवले. क्रिकेट आणि क्रीडाविषयक ‘अष्टपैलू’ साप्ताहिक पुष्पा यांनी संपादित केले. तसेच आणीबाणीच्या काळात ‘पहारा’ सायंदैनिकातून निर्भीडपणे लोकशाहीचा पुरस्कार केला. एकदा तर ‘मराठा’चं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयोगही झाला. आम्ही सर्वांनी रात्रभर जागून लेख लिहिले. पुष्पा यांनी उत्तम ‘हेडलाइन’ दिली आणि वडाळय़ाला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते आणि शिरीषताईंच्या उपस्थितीत नमुना अंकाचं प्रकाशनही झालं. पण पुढे तो प्रयोग बारगळला.

सतत कार्यरत राहाणं हा पुष्पा यांचा स्वभाव. त्या विचारात जेवढय़ा ठाम तेवढय़ाच स्वभावाने हळव्या आणि एखादा विनोद झाला तर चेहरा लालबुंद होईपर्यंत खळाळून हसणाऱया. ही बालसुलभ निरागसता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्टय़.

‘श्री’ साप्ताहिकाच्या काळात पुष्पा यांच्या घरी मी अनेकदा राहिलो. माझ्या अचानक उद्भवलेल्या आजारपणात या दाम्पत्याने माझी शुश्रूषाही केली… आता हे सारे क्षण धुक्यात हरवलेल्या वाटेसारखे दूरवर गेले आहेत. पुष्पाच्या जाण्याने ते धुकं विरलं आणि भूतकाळातल्या घटना पाणावलेल्या डोळय़ांमध्ये दाटून आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या