पावसातील खंड पिकांना घातक

54

>> डॉ. रामचंद्र साबळे

जून महिन्यात पावसाचे आगमन लांबले. मान्सूनला जोर नव्हता. ‘वायू’ वादळाच्या प्रभावाने ते बाष्प खेचून निघून गेले आणि मान्सूनचा प्रभाव कमी झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानवर हवामान बदलाचा प्रभाव या वर्षी जाणवत आहे. हिंदुस्थानातील 24 राज्यांत सरासरीपेक्षा पाऊस आतापर्यंत कमी झालेला असून महाराष्ट्रातीलही 24 जिह्यांत सरासरीपेक्षा आजपर्यंत पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील खरीप धोक्यात आहे.

1 जून रोजी महाराष्ट्रासाठी पावसाचे अंदाज देतेवेळी या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी होईल. तो सरासरीपेक्षा बऱयाच भागात कमी असेल. त्यामुळे 65 मिलीमीटरपर्यंत जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये असे स्पष्ट निर्देश मी दिले होते.

जून महिन्यात पावसाचे आगमन लांबले. मान्सूनला जोर नव्हता. ‘वायू’ वादळाच्या प्रभावाने ते बाष्प खेचून निघून गेले आणि मान्सूनचा प्रभाव कमी झाला. मान्सून पावसाचे वितरणात फार मोठा फरक जाणवला. मुंबई येथे झालेली अतिवृष्टी तर उर्वरित महाराष्ट्रात पावसात उघडीप आणि दुष्काळी स्थिती. या सर्व बाबी स्पष्ट करतात ते म्हणजे हवामान बदलाचा मान्सूनवर प्रचंड प्रभाव झाला. या वर्षीचा उन्हाळी हंगाम बारकाईने अभ्यासल्यास हे स्पष्ट दिसले की, महाराष्ट्रातील प्रत्येक भागात तापमानवाढ जाणवली. सरासरीपेक्षा 1 ते 2 अंश सेल्सिअसने कमाल तापमान अधिक नोंदल्याचे दिसून आले. त्यामुळे तापमानवाढ आणि त्या अनुषंगाने झालेला हवामान बदल हे स्पष्टपणे दिसून आले.

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानवर हवामान बदलाचा प्रभाव या वर्षी जाणवत आहे. हिंदुस्थानातील 24 राज्यांत सरासरीपेक्षा पाऊस आतापर्यंत कमी झालेला असून महाराष्ट्रातीलही 24 जिह्यांत सरासरीपेक्षा आजपर्यंत पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील खरीप धोक्यात आहे. महाराष्ट्रात सरासरीने 150 लाख हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी केली जाते. मात्र अपुऱया पावसामुळे 7.35 लाख हेक्टरवर जूनअखेर पेरणी झाली आहे. याचाच अर्थ असा की, जून महिन्यात केवळ 5 टक्के क्षेत्र पेरले गेले आणि ही आकडेवारी गेल्या पाच वर्षांतील निचांकी आकडेवारी आहे. सदर माहिती केंद्र सरकारच्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.

1 जून ते 15 जुलै असा मान्सूनचा दीड महिन्याचा अत्यंत महत्त्वाचा काळ संपलेला आहे. आता उरलेला अडीच महिन्यांचा मान्सूनचा काळ कसा जाईल याकडे सगळय़ांचे लक्ष लागलेले आहे. अद्याप मान्सून संपूर्ण राजस्थानात पोहोचलेला नाही. त्यामुळे या वर्षाचा मान्सूनचा पूर्वार्ध हा अत्यंत खराब काळ मानावा लागेल. खरीप पिकांपैकी कडधान्य उत्पादनावर याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. मूग, उडीद, मटकी, चवळी, हुलगा, तूर या पिकांचे उत्पादन प्रचंड मोठय़ा प्रमाणावर घटणार आहे, हे आता निश्चित झाले असून त्याचा परिणाम अन्नसुरक्षेवर निश्चित होईल. कडधान्यांचे भाव वाढतील. शेतकऱयांना उत्पादन न मिळाल्याने शेतकरीवर्गाची आर्थिक स्थिती खराब होईल. याचाच सरळ अर्थ असा की मान्सूनचे अपुरे पाऊसमान सर्वांनाच घातक ठरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मान्सून पावसाचा परिणाम पूर्व विदर्भातील भात पिकाच्या वाढीवरही झालेला असून भाताचे पीक सुकत आहे. जळगाव जिह्यातही पिके सुकू लागल्याने त वाळल्यास कुळवाची पाळी देऊन वखरणी करून टाकण्याच्या मनःस्थितीत शेतकरी आहेत. तर धाराशीव व लातूर भागात अद्याप पेरण्याही होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळेच जून व जुलै महिन्यात अपुरा पाऊस अथवा पाऊस न झाल्यास कोरडवाहू शेतकऱयांचे नुकसान होते हे स्पष्ट होते.

महाराष्ट्रातील बहुतांशी धरणे अर्धीही भरली नाहीत. विहिरींना पाणी नाही. तसेच बोरला पाणी नाही. बऱयाच भागात टँकरने पाणीपुरवठा अद्याप सुरू आहे. काही भागात पाण्याचे पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य कृत्रिम पावसाचे प्रयोग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रासाठी राबवणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी पूर्ण केली आहे. लवकरच हे प्रयोग सुरू होतील. त्यातून पाऊसमान वाढल्यास त्याचा फायदा या भागाला होऊ शकेल.

एकूणच दिवसेंदिवस मान्सूनवर होणारे परिणाम महाराष्ट्रासाठी अभ्यासल्यास 21व्या शतकात 2003, 2012, 2015, 2018 आणि आता 2019 अशी एकूण पाच वर्षे दुष्काळी धरल्यास दुष्काळी स्थिती वारंवार येते आहे आणि ही बाब जीवनमानासाठी गंभीर बाब बनत आहे हे निश्चित. त्यावर विचार होणे आणि गांभीर्याने अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा मनोदय यंदा केला आहे. ती एक चांगली बाब आहे.

साधारण 20 ते 27 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. यापुढे पाऊस झाल्यास कोरडवाहू भागात घेवडा, धणे यासारखी कमी कालावधीच्या पिकांची लागवड करून काही प्रमाणात पेरणी करणे शक्य होणार आहे. याशिवाय राळा, सूर्यफूल, मका यासारख्या पिकांची लागवडही होऊ शकेल. मात्र अपेक्षित पाऊसमान आणि पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पीकपद्धती ठरवणे, ती अवलंबणे गरजेचे आहे. रब्बी हंगामाची पूर्वतयारी करून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणाऱया पावसावर रब्बी ज्वारी, करडई, सूर्यफूल, हरभरा या पिकांचा पेरा यापुढील काळात नियोजनात ठेवायला हवा. मात्र हवामानाच्या अनुषंगाने पीकपद्धती आणि पीक व्यवस्थापन यास भावी काळात महत्त्व देणे गरजेचे ठरेल.

महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत झालेला पाऊस
सरासरीपेक्षा अधिक पाऊस : कोल्हापूर- 21, सातारा-21, पुणे-63, नाशिक-21, पालघर-18, ठाणे-49, रायगड-21, धुळे-4, नगर-1 अशा 9 जिह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या सर्व जिह्यांत सध्या पीक परिस्थिती बरी आहे.
सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस : सांगली-16, संभाजीनगर-11, जालना-19, अकोला-8, जळगाव-12, नागपूर-15, चंद्रपूर-11, गडचिरोली-1, रत्नागिरी-1, रायगड-1, या भागात लवकर पाऊस न झाल्यास पिकांवर अनिष्ट परिणाम होतील.
सरासरीपेक्षा 20 ते 54 टक्के कमी पाऊस : नंदूरबार-27, अमरावती-31, वर्धा-34, हिंगोली-47, बीड-49, सोलापूर-50, धाराशीव-31, लातूर-54, नांदेड-50, परभणी-41, यवतमाळ-45, गोंदिया-28 यातील बऱयाच भागात पेरणी होऊ शकली नाही. जेथे पेरणी झाली आहे तेथे लवकर पाऊस न झाल्यास सध्याची पिके वाळून जातील अशी स्थिती आहे.

(लेखक ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आहेत)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या