
>> दीलीप साटम
मराठी चित्रपटांनी आज स्वतःचे अबाधित स्थान निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपटही यशस्वी होताना दिसत आहेत.
सिनेमाबरोबरचे हिंदुस्थानचे नाते शंभर वर्षांपासूनचे आहे. इथे वर्षाकाठी सुमारे दोन हजार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अवघ्या जगामध्ये निर्माण होणाऱया सिनेमांमध्ये हिंदुस्थानी सिनेमांची संख्या सर्वाधिक आहे. हिंदुस्थानच्या या चित्रपट उद्योगामध्ये सर्वात उच्चस्थानी अर्थातच बॉलीवूड म्हणजेच हिंदी आहे, पण स्थानिक भाषांतील सिनेमेही आज कलात्मकतेच्या शिखरावर पोहोचलेले दिसत आहेत. तगडा विषय, प्रभावी आशय यांचे स्वागत करणाऱया नव्या पिढीच्या प्रेक्षकवर्गाचाही या भरभराटीमध्ये वाटा आहे. मुळात हिंदुस्थान हा एक बहुभाषिक देश असल्याने मराठी, बंगाली, तामीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी आदी भाषांतील चित्रपट उद्योग हा स्वबळावर चालताना दिसतो.
उदाहरणच द्यायचे झाले तर मराठी चित्रपटसृष्टीने आजवर वास्तवाच्या जवळ जाणाऱया, विनोद आणि नाटय़ यांचा शिडकावा असलेल्या कित्येक कहाण्या सिनेमाच्या पडद्यावरून सादर केल्या आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे 4 कोटी रुपयांचे बजेट घेऊन तयार झालेला 2016 वर्षीचा ब्लॉकबस्टर ‘सैराट’. तब्बल 110 कोटी रुपये मिळवणारा हा सिनेमा मराठीतील आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. दिग्दर्शक नागराज यांचा मास्टरपीस असलेला हा सिनेमा 2016 वर्षीच्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम प्रदर्शित झाला. सध्या कन्नड, तेलुगू, पंजाबी, मल्याळम आणि तामीळ या भाषांत त्याचे रिमेक्स बनवले जात आहेत. फिल्ममेकर करण जोहर यांनी ‘धडक’ या हिंदी रिमेकसाठी चित्रपटाचे हक्क विकत घेतले व या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर 110 कोटी रुपयांची कमाई केली.
देशाच्या पश्चिम भागातच स्थानिक सिनेमा बहरला आहे असे नाही तर दक्षिणेतील सिनेमांनाही सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एस. एस. राजमौली यांचा भव्य युद्धपट ‘बाहुबली 2’ने हिंदुस्थानी थिएटर्समधील आपल्या 100 व्या दिवसापर्यंत 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली व जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जवळ जवळ 1700 कोटी रुपयांचा टप्पा गाठला. यापुढे हिंदुस्थानी चित्रपट उद्योगाची विभागणी बाहुबलीपूर्व आणि बाहुबलीउत्तर युगामध्ये केली जाईल असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
एफआयसीसीआय-ईवायच्या अहवालानुसार, देशभरात बनविल्या जाणाऱया एकूण चित्रपटांपैकी केवळ 17 टक्के वाटा असलेल्या बॉलीवूडचे येथील चित्रपट क्षेत्राच्या बॉक्स ऑफिसवरील निव्वळ मिळकतीमधील योगदान जवळ जवळ 40 टक्के इतके आहे. इतर 29 हिंदुस्थानी भाषांमध्ये बनविल्या जाणाऱया चित्रपटांचा स्थानिक बॉक्स ऑफिसवरील वार्षिक कमाईमधील वाटा हा सुमारे 50 टक्के इतका आहे. उरलेला वाटा हा हॉलीवूड आणि आंतरराष्ट्रीय सिनेमांचा आहे.
2017 वर्षी नऊपेक्षा अधिक स्थानिक सिनेमांनी 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला. 2018 वर्षी अशा सिनेमांची संख्या 12 वर गेली व तेलुगू चित्रपटसृष्टीने 2016 वर्षी स्थानिक पातळीवर मिळवलेल्या 10.50 बिलियन रुपयांच्या तुलनेत 2018 वर्षी 15.30 बिलियन रुपयांची कमाई करत 47.5 टक्के वाढीचा टप्पा पार केला. तामीळ, मल्याळम, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली आदी इतर स्थानिक भाषांतील चित्रपट उद्योगांमध्येही चांगली वाढ नोंदवली गेली आहे.
आज केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर अवघ्या जगभरातच संस्कृतीच्या विकासामध्ये किंवा एखाद्या चालू प्रश्नावर भाष्य करण्याच्या कामी सिनेमा रचनात्मक भूमिका बजावत आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये हॉलीवूडच्या सिनेमांना अधिक पसंती मिळत असल्याचे दिसते तर महानगरांतील प्रेक्षक हे स्थानिक सिनेमांना अधिक प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे. आशयावर भर देणारा स्थानिक सिनेमा आज केवळ भाषेच्या तफावतीमुळे वेगळा पडत नाही. शिवाय बॉलीवूडमधील प्रस्थापित नावे आणि उत्तमोत्तम निर्मिती संस्थाही या सिनेमांशी जोडल्या गेल्याने हा सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला आहे.
उत्तम कथानक, नवा आशय-विषय खुलेपणाने स्वीकारायला तयार असलेला प्रेक्षकवर्ग आणि प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन आदींसारख्या प्रथितयश नावांचे पाठबळ आदी कारणांमुळे अलीकडच्या काळात स्थानिक सिनेमा बहरत आहे व जागतिक पटावरही आपला ठसा उमटवताना दिसत आहे. हे चित्रपट खऱयाखुऱया कहाण्या सांगण्याचे स्वातंत्र्य घेत आहेत. त्यांचा बाज स्थानिक असला तरीही त्यातला आशय सीमांची बंधने सहज पार करणारा आहे. या कारणांमुळेच स्थानिक सिनेमा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचे लक्ष आकर्षून घेऊ लागला आहे.
स्थानिक चित्रपटांच्या या किफायतशीर उद्योग क्षेत्राकडे बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील निर्मिती संस्थांचे लक्ष वळले असून या संस्था अशा सिनेमांच्या निर्मिती व वितरणासाठी पुढे येत आहेत ही बाब नक्कीच रोचक आहे. बॉलीवूडप्रमाणे स्थानिक सिनेमा हा पूर्णपणे बडय़ाबडय़ा तारेतारकांच्या करिश्मावर अवलंबून नाही, बऱयाचदा अगदी मर्यादित संसाधनांनिशी तो बनवला जातो. एखादी जबरदस्त कल्पना आणि उत्तम आशय देणाऱया, बऱयापैकी लांबी असलेल्या चांगल्या स्थानिक सिनेमासाठी साधारणपणे 5 ते 6 कोटींचे बजेट पुरेसे ठरते, पण सध्या या सिनेमांना मिळणाऱया यशामुळे हे बजेटही वाढले आहे. यामुळे स्थानिक चित्रपटांना मार्केटिंग आणि जाहिरातींद्वारे विविध प्रांतांमध्ये पोहोचविण्याच्या पद्धतीमध्येही बदल घडून आला आहे. आजवर केवळ बॉलीवूडच्या सिनेमांकडून भव्य कामगिरीची अपेक्षा केली जायची, पण आता व्यापाराच्या दृष्टीने अशीच खळबळ निर्माण करण्याची अपेक्षा स्थानिक सिनेमाकडूनही केली जाऊ लागली आहे.























































