ठसा – सदानंद फुलझेले

2694

>> महेश उपदेव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील साक्षीदार तसेच डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सचिव, नागपूरचे माजी उपमहापौर सदानंद फुलझेले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आणि धम्म चळवळीतील आधारवड हरपला आहे. दिवंगत राज्यपाल रा. सू. गवई यांचे खास विश्वासू म्हणून सदानंद फुलझेले यांची ओळख होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता लाखो लोकांना धर्माची दीक्षा दिली. त्या सोहळय़ाचे साक्षीदार सदानंद फुलझेले होते. डॉ. आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. या सोहळय़ाच्या आयोजनाची जबाबदारी फुलझेले यांनी यशस्वीपणे पार पाडली. दीक्षाभूमीही त्यांच्या नेतृत्वात आकारास आली. आज नागपुरात जे ऐतिहासिक स्तूप उभे आहेत त्यामागे फुलझेले यांची मेहनत आहे. बाबासाहेबांनी जे विचार दिले ते तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी शेवटपर्यंत केले. 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना झाली. या समितीचे सचिव म्हणून सदानंद फुलझेले यांची निवड झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. विजयादशमीच्या दिवशी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा होतो. त्याचे नेतृत्वही तेच करीत असत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दीक्षाभूमीवरच बाबासाहेबांचे भव्य स्मारक नागपुरात उभे व्हावे अशी मागणी त्यावेळी झाली. हे स्मारक नागपुरातच व्हावे याकरिता सदानंद फुलझेले कामाला लागले आणि आज जे भव्य स्तूप नागपुरात आहे ते उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. हे कार्य सुरू असतानाच रिपब्लिकन चळवळीतही त्यांनी मोठे काम केले. नागपूरच्या स्मारकासाठी व त्याचे सौंदर्यीकरण करण्याकरिता त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. मुला-मुलींनी शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हावे या हेतूने दीक्षाभूमी परिसरातच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरू केले. प्रथम या महाविद्यालयात कला व वाणिज्य अशा दोन शाखा होत्या. 1968 साली विज्ञान शाखा सुरू झाली. आज हे महाविद्यालय विदर्भात अव्वल क्रमांकावर आहे. आपली शिक्षण संस्था नावारूपाला आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राहावी यासाठी कठोर पावले उचलली. आज या महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू असून पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1958 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे काम सुरू झाले. दिवंगत राज्यपाल रा .सू. गवई यांच्या मार्गदर्शनात फुलझेले यांनी स्मारकाच्या कामाची जबाबदारी स्वीकारली. अनेक वर्षे सुरू असलेले स्मारकाचे काम 18 डिसेंबर 2001 रोजी पूर्ण झाले. नागपूरचे विख्यात वास्तुविशारद शिवरानमक मोखा यांच्या कल्पनेतून भव्य स्मारक निर्माण झाले. माजी राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला होता. या स्मारकाला दरवर्षीं देश-परदेशांतून हजारो भाविक भेट द्यायला येतात. सदानंद फुलझेले यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यात दलितमित्र पुरस्कार, विदर्भरत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष बुद्धगया येथे आहे. त्याच वृक्षाची एक फांदी दीक्षाभूमीवर लावण्यात आली होती. हा बोधिवृक्ष डौलाने आज दीक्षाभूमीवर दिसतो. या वृक्षाचे जतन सदानंद फुलझेले यांनी केले. या वृक्षाच्या सावलीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी भिक्षू धम्मगाथा म्हणतात. जीवनाच्या 92 व्या वर्षापर्यंत सदानंद फुलझेले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आणि बौद्ध धम्माची पताका फडकवण्याचे काम केले.

आपली प्रतिक्रिया द्या