।।हरी मुखे म्हणा… हरी मुखे म्हणा…।।

898

>> आसावरी जोशी

ज्ञानेश्वरांच्या लेखणीतून निर्गुण विठ्ठलाची भक्ती सगुण साकार होऊन प्रगटते… भावार्थदीपिका अखंड ज्ञान देते… विराणी विरहिणी भक्ती उलगडते… पसायदान संपूर्ण विश्वाचे हित पाहते, तर हरिपाठाचे अभंग लडिवाळ विठ्ठलनामातून सोप्या, सुलभ जगण्याचे सार उलगडतात.

ज्ञानदेव… या चार अक्षरांत अखिल विश्वाचे आर्त सामावले आहे… आणि या आर्ततेत ज्ञान… संपूर्ण ज्ञान… अत्यंत संवेदना… वात्सल्य… माया… जिव्हाळा… उद्या पाहणारी दूरदृष्टी… पराकोटीचा संयम… मनोनिग्रह… आणि या साऱयातून जाणवत राहते ते ज्ञानदेवांचे अत्यंत प्रेमळ माऊलीपण… ज्ञानेश्वरांना आपण अगदी सहज माऊली म्हणतो… त्यांच्या प्रत्येक शब्दातून हे आई असणे जाणवत राहते… झिरपत राहते… पाझरागत… म्हणूनच साऱया विश्वाचे आर्त त्यांना सहज समजते… अगदी प्राणीमात्रांचेसुद्धा… खूप लहान असताना त्यांच्या पसायदानाचे निरूपण ऐकलेले… पसायदानाच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर खलांविषयी भाष्य करतात… येथे त्यांना खल प्रवृत्तीच्या माणसांविषयी काहीही आक्षेप नाही… त्यांच्यातील व्यंकट… वाकडेपण… खलत्व फक्त दूर होऊ दे.. मग उरला तो माणूस निखळ.. निवळ.. स्वच्छ जळागत.. येथेच ज्ञानदेव साऱया विश्वाची माऊली होतात… कारण आपल्या प्रत्येक लेकाराविषयी ही क्षमाशील वृत्ती फक्त आईच्या ठायीच असू शकते… संपूर्ण विश्वाचे हे आईपण ज्ञानदेवांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच पत्करले… आपल्या प्रत्येक साहित्यातून… आणि ते प्रकटत गेले त्यांच्या प्रत्येक ओवीतून… अभंगातून… विराणीतून… हरिपाठातून…

त्यांची भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी आज साडेसातशे वर्षांनंतरही आजच्या काळाशी अगदी सुसंगत वाटते… 114 वर्षांच्या चांगदेव योगीसाठी लिहिलेली उपदेशपर ‘चांगदेव पासष्टी’ आपल्याला वृथा अहंकार सोडण्यास सांगते… प्रत्येक अभंग… विराणी मनात रेंगाळत राहते… विठोबाचे निर्गुण निराकार रूप मनात ठसवत राहते आणि हरिपाठ विठ्ठलनामाशी आपल्याला सहज जोडतो… रोजच्या जगण्यातून… दैनंदिन व्यवहारातूनही निर्गुण निराकाराची सगुण साकार भक्ती कशी करावी हे माऊली अगदी सहज शिकवून जातात..

हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंगरचना होय. वारकरी संप्रदायात हरिपाठाच्या अभंगांचे स्थान अनन्यसाधारण आहे. तुकोबा, एकनाथ, नामदेव यांनीही हरिपाठाचे अभंग रचले आहेत… पण ज्ञानदेवांचे अभंग सर्वात प्रचलित आणि सातत्याने आळविले जातात… हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच शिवाय प्रत्यक्ष अनुभूतीसंपन्नही आहेत. विठ्ठलपंतांशी ज्ञानदेवांचे अगदी लडिवाळ आणि जन्मापासूनचे नाते. त्यांच्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी त्याना निर्गुण निराकार ईशस्वरूप दाखविले. विठोबाची अनुभूतीही त्यांना निर्गुण रूपातच भावली, पण सामन्यांसाठी. भाबडय़ा विठ्ठल भक्तांसाठी मात्र माऊलींनी हे हरिनाम सहज सोप्या, सगुण साकार हरिपाठाच्या रूपाने दाखविले.

कृष्णाच्या कर्मयोगाची विठोबाच्या भक्तियोगाशी सोपी सांगड घालून भक्तांना हे दोन्ही योग सहज पचनी पडतील. समजतील अशा प्रकारे हरिपाठाची रचना केली गेली आहे. हे हरिपाठाचे अभंग आजच्या काळातही आपल्याला रोजचे जगणे शिकवितात. नित्य कर्तव्ये पार पाडीत असताना ईश्वरासमीप राहण्याचा सोपा, सुलभ मार्ग हरिपाठ दाखवितो. हे एकूण 28 अभंग म्हणजे खऱया अर्थाने माय मराठीचा अभिमान आहे. ज्ञानेश्वरांना माय मराठीचे वाटणारे कौतुक त्यांच्या प्रत्येक साहित्यातून पदोपदी जाणवते. हरिपाठाचे अभंगही याला अपवाद नाहीत. या संपूर्ण हरिनामातून विहित कर्तव्यही किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला सहज उमगते आणि विचारांना दिशाही तशीच लाभते..

‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधियेल्या…’

या एकाच ओळीतून डोळस भक्ती माऊली शिकवतात. कर्मयोगासोबतच संत सज्जनांचा सहवास… त्याचे अत्यंत दुर्लभ एकत्र असणे… स्वभाषेचा अभिमान, स्वकर्माविषयीची जागृत… सतर्क जाणीव या साऱया गोष्टी आजच्या तरुण पिढीने खरोखरच घेण्यासारख्या…

आपल्याला हवे असलेले ईप्सित साध्य झाले नाही, मनोवांछित मिळाले नाही किंबहुना मनोवांछित मिळावे म्हणून अगदी सहज ईश्वराची भक्ती केली जाते. अर्थात, गैर काहीच नाही त्यात, पण तथाकथित भक्तीच्या ओघात प्रत्येकजण अगदी तरुणाईदेखील सहज वाहवत जाते. यातून अनेक नको त्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो, अंधानुकरण केले जाते. देवासमोरच किंबहुना त्याच्या नावाखाली किंवा त्याचा नावाचा अत्यंत चुकीचा सोयिस्कर अर्थ लावला जातो. या सर्व गोष्टींना योग्य दिशा देण्याचे काम आजच्या काळातही माऊलींचा हरिपाठ करतो.
मराठीचा एकनिष्ठ अभिमान, विहित कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पडणे, सात्त्विक आहार, सदाचरण या प्राथमिक, सोप्या गोष्टी ज्या विठ्ठलाला अभिप्रेत आहेत त्या गोष्टीची शिकवण माऊलींच्या प्रत्येक साहित्यातून सहज आपल्या मनावर बिंबवली जाते.
ज्ञानदेवांसकट त्यांच्या तिन्ही भावंडांवर त्यावेळच्या समाजाने परित्यक्त जगणे लादले, पण त्यातील कोणतीही कटुता माऊलींच्या साहित्यातून जराही जाणवत नाही. उलट विश्वकल्याणाचा ध्यास, निर्गुण विठूरायाचे सगुण साकार रूप आणि कर्तव्यांची सतर्क जाणीव याच गोष्टी ठाशीवपणे समोर येत राहतात आणि देव विठ्ठलाचे सारे सार ज्ञानदेवांच्या लेखणीतून उतरत राहते, झिरपत राहते…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या