आभाळमाया – शनीशी सलगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

सूर्यापासून पृथ्वी 15 कोटी किलोमीटरवर, तर अनेक कडय़ांनी वेढलेला वायुरूप शनी ग्रह 150 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. आता या ग्रहांचं नुसतं दर्शन तर आपल्या अनेक पूर्वजांनी घेतलं. पण त्याला दुर्बिणीतून प्रथमच न्याहाळताना त्याच्या कडय़ांचा नेमका अंदाज न आल्याने गॅलिलिओने त्याला ‘कान’ असलेल्या ग्रहाची उपमा दिली. आता या ग्रहाचा निश्चित ‘कानोसा’ घ्यायचा तर त्याच्या स्वरूपाविषयी साद्यंत माहिती हाताशी हवी. शनीला ‘कान’ नसून त्याच्याभोवती अनेक कडी किंवा ‘रिंग्ज’ आहेत हे शोधून काढलं जिओवॅनी कॅसिनी यांनी. गॅलिलिओ आणि कॅसिनी दोघेही इटालियन. मात्र शनीशी अगदी जवळून ‘सलगी’ करून त्याची इत्यंभूत माहिती घेण्याचे काम ज्या यानाकडे सोपवले गेले त्याला आधी केवळ कॅसिनी आणि नॅटर शनीचा भलामोठा ‘टायटन’ नावाचा उपग्रह शोधणाऱया क्रिस्तियन ह्युतेन्स यांचे नाव जोडून ‘कॅसिनी-ह्युजेन्स’ मोहीम 15 ऑक्टोबर 1997 रोजी सुरू झाली.

अमेरिकेची ‘नासा’, युरोपची ‘युरोपिअन स्पेल एजन्सी’ (ईएसए) आणि इटलीची अंतराळ संशोधन संस्था या तीन संस्थांच्या सहयोगाने शनीच्या कडय़ांच्या, त्याच्या महत्त्वाच्या उपग्रहांच्या आणि या महाकाय ग्रहाच्या वातावरणाचा सखोल अभ्यास करण्याची मोहीम आयोजित करण्यात आली. पृथ्वीपासून एवढय़ा प्रचंड अंतरावर एखादे यान पाठवायचे म्हणजे त्याला अनेक वर्षे पुरेसा ठरेला असा ऊर्जेचा साठा असला पाहिजे. शिवाय अंतराळातील शुक्र, पृथ्वी, गुरू इत्यादी ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेऊन वेग वाढवणारा कक्ष प्रवास (ट्रजेक्टरी) अचूक असायला हवा.

या सगळय़ांचे गणित जमवून 32.7 किलो वजनाची अणुऊर्जा (प्लूटोनियम डायॉक्साईड) भरून 1997 मध्ये कॅसिनी-ह्युजेन्स यानाने पृथ्वीचा निरोप घेतला. ते आता कधीच परत येणार नव्हते, पण शक्तीशाली कॅमेरे आणि कॉम्प्युटरद्वारा त्याने केलेल्या संशोधनाचा तपशीलवार ‘डेटा’ क्षणोक्षणी पृथ्वीवर पोहोचणार होता. अर्थात यान शनीजवळ पोचल्यानंतरची ही गोष्ट होती.

सगळा हिशेब मांडून 30 जुलै 2008 पर्यंत ही मोहीम चालावी आणि शनीची शक्य तेवढी, जास्तीत जास्त माहिती, फोटो वगैरे प्राप्त व्हावेत अशी रास्त अपेक्षा होती. त्यातली पहिली अनेक वर्षे तर एकूण काही कोटी किलोमीटर प्रवासातच खर्ची पडणार होती; परंतु या दुरस्थ ग्रहांची अंतरे लक्षात घेता त्यात आश्चर्यकारक असं काहीच नाही.

कॅसिनी-ह्युजेन्स यानाने आपल्या कोटय़वधी किलोमीटर प्रवासाच्या सर्व कसोटय़ा पूर्ण केल्या आणि ते 1998 व 99 मध्ये शुक्र ग्रहाला, 1999 मध्ये आपल्या पृथ्वीला आणि 2000 मध्ये गुरू ग्रहाला यशस्वी वळसा घालून शेवटी शनीच्या कडय़ांच्या जागेतून (गॅप) फिरत त्याचे निरीक्षण करत राहिले.

या यानाला जी उद्दिष्टे ठरवून देण्यात आली होती त्यातील मुख्य गोष्टी होत्या शनीच्या ‘ए’पासून ‘डी’पर्यंतच्या सर्व रिंग्जची त्रिमिती रचना पाहणे. ही दूरवरून दिसणारी कडी सलग दिसत असली तरी प्रत्येक कडे (रिंग) म्हणजे लक्षावधी लहान-मोठय़ा पाषाणांचा, दगडधोंडय़ांचा पट्टा आहे. शनीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्याचे टायटन, एन्सेलेडस असे प्रचंड उपग्र्रह त्याभोवती नियमितपणे फिरतात तिथे या दगडधोंडय़ांची काय कथा! तेही इमानेइतबारे फिरतात बिचारे. पण ते कसे? तेच तर कॅसिनी-ह्युजेन्स यानाला तपासायचे होते. त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट सफल झाले.

त्याचबरोबर शनीच्या मोठय़ा उपग्रहांच्या (चंद्राच्या) पृष्ठभागाचे जवळून निरीक्षणही करायचे होतेच. यासाठी या यानाने अनेक वर्षे शनीभोवती 155 फेऱया मारल्या! त्यापैकी टायटन या शनीच्या प्रसिद्ध उपग्रहाभोवती 54 आणि एन्सेलेडस्भोवती 11 वेळा परिक्रमा करून त्यांचा अभ्यास केला गेला.

याव्यतिरिक्त शनीचे मॅग्नॅटोस्फिर आणि त्यावरील मेघांचे दाट आवरण याचाही सखोल आढावा घ्यायचा होता. या मोहिमेने ही सर्व कामे विनासायास पूर्ण केली. शनीच्या इतरही अनेक उपग्रहांचे जवळून छायाचित्रण केले. सूर्य-पृथ्वी अंतराच्या सुमारे साडे आठ ते साडेदहा पट अंतरावर या यानाचे काम चालले होते. म्हणजे 1 अब्ज 20 ते 50 कोटी किलोमीटर एवढय़ा दूर!

या यानावर आणखी एक गोष्ट होती. त्यावरच्या एका ‘डीव्हीडी’मध्ये 81 देशातल्या 616400 जणांच्या सह्यांची नोंद होती!

दिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कॅसिनी-ह्युजेन्सला दोनदा मुदतवाढ मिळाली. आधी 2008 ते 10 आणि नंतर 2017 पर्यंत. अखेरीस दोन दशकांच्या परिश्रमांची यशस्वी सांगता होऊन पृथ्वीवरच्या संयोजकांच्या आज्ञेनुसार हे यान शनी ग्रहात, 15 सप्टेंबर 2015 रोजी विलीन झाले. 1997 ते 2017 असा त्याचा कालावधी संपला. पण कालवश होण्याआधी त्याने वैज्ञानिक माहितीचा अपूर्व खजिना आपल्याला मिळवून दिला!