लेख – ठसा – डॉ. शरणकुमार लिंबाळे

>> भगवान परळीकर

सोलापूर जिह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावचे भूमिपुत्र ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना 2020चा सरस्वती सन्मान नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे मराठी साहित्य विश्वात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला 2020 या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. 15 लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दिल्लीच्या के.के.बिर्ला फाऊंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या 22 भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. याआधी 1993 मध्ये ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर व 2002 मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता. 1991 मध्ये दिल्लीच्या के.के.बिर्ला फाऊंडेशनने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठत व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शरणकुमार लिंबाळे यांची 40 हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच ‘अक्करमासी’ हे आत्मचरित्रसुद्धा प्रसिद्ध आहे.

सोलापुरात आकाशवाणी केंद्राची निर्मिती झाली तेव्हा 1986 ते 1992 या कालावधीत शरणकुमार लिंबाळे हे सोलापूर आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सोलापूरच्या पत्रकारितेशी ही त्यांचा जवळचा संबंध आला. अनेक तरुण पत्रकारांना त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून वार्तापत्रे सादर करण्याची संधी दिली. आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक माणसे जोडली. आकाशवाणीवर काम करीत असतानाच एक सिद्धहस्त लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे हे मराठी साहित्य विश्वाला परिचित झाले. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन लिहून मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. ‘अक्करमाशी’चे इंग्रजी भाषांतरही ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले होते. शरणकुमार लिंबाळे यांचे दलित साहित्यात मोठे योगदान आहे. आंबेडकरी चळवळीचा आढावा घेणारी ‘दलित पँथर’, ‘रिपब्लिकन पक्ष’ यांसारखी पुस्तके त्यांनी विविध मुलाखती घेऊन प्रकाशित केली. आकाशवाणीच्या सेवेनंतर साहित्य लेखन करीत असतानाच शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून शरणकुमार लिंबाळे यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अनेक वर्षे काम केले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच संचालक पदावरून ते सेवानिवृत्त झाले.

शरणकुमार लिंबाळे यांनी चाळीसहून अधिक वैचारिक व परिवर्तनवादी पुस्तके लिहून मराठी व दलित साहित्यात मोलाची भर घातली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला मराठीतला हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. हिंदुस्थानी स्तरावर ही नवीन कलाकृती म्हणून या कादंबरीची दखल घेत देशातील एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे. ही कादंबरी मुघल आणि ब्रिटिश कालखंडाच्या इतिहासावर वेगळा प्रकाश टाकते. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात दलित आणि आदिवासी यांच्या योगदानाबाबत फार काही उल्लेख आढळत नाही. ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न या कादंबरीच्या माध्यमातून केला असल्याचे शरणकुमार लिंबाळे यांचे म्हणणे आहे. आज शरणकुमार लिंबाळे यांचे साहित्य विविध हिंदुस्थानी भाषांमधून अनुवादित झाले आहे. आजच्या आधुनिक काळात मराठी साहित्यात जे मोजके लेखक हिंदुस्थानी भाषांमध्ये वाचकांना माहीत आहेत, त्यात शरणकुमार लिंबाळे यांचे स्थान महत्त्वाचे आहे.  ‘‘आजवर आम्हाला मोठे पुरस्कार मिळायला हवे असे आम्ही म्हणायचो, पण मिळत नव्हते. देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरावी साजरी होण्याच्या उंबरठय़ावर एक सुंदर स्वप्न पूर्ण झाले’’ असा शब्दांत शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शरणकुमार लिंबाळे यांना प्राप्त झालेला सरस्वती सन्मान हा मराठी साहित्य शारदेचा गौरवच म्हणावा लागेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या