लेख – श्राद्धामागील गूढार्थ

>> रामकृष्ण विनायक अभ्यंकर

आपल्या हिंदू तत्त्वज्ञानानुसार एखादा माणूस मृत झाला तरी त्याचा आत्मा अमर असतो. एखादे जुने झालेले वस्त्र बदलून दुसरे परिधान करावे इतक्या सहजतेने आत्मा एका माध्यमातून दुसऱयात प्रवेश करतो. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जड जिवाचे रूपांतर सूक्ष्म जिवात होते. त्यावरूनच पुनर्जन्म ही संकल्पना रूढ झाली आहे. त्यावरूनच आपण आपल्या गतव्यक्तींशी अदृश्य रूपात स्मरण करून पूजन करू शकतो. नाथ संप्रदायात व ज्ञानेश्वरांनी योग शक्तींनी प्रत्यक्ष पितरांना जेवण्यास बोलाविले होते.

आपल्या स्वर्गवासी झालेल्या मातापित्यांचे श्रद्धेने स्मरण करून त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करतो त्यालाच श्राद्ध असे म्हणतात. आपल्या पूर्वजांच्या संकल्पनेनुसार व हिंदुस्थानी अध्यात्मानुसार मृत व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतर दहा दिवसांपर्यंत जवळपास भटकत राहतो व त्यानंतर अकरा, बाराव्या दिवशी श्रद्धेने त्याचे आदराने पूर्वपितरांशी सहगमन केले जाते. त्यानंतर त्या तिथीस प्रत्येक वर्षी त्याचे स्मरण करून आदरभाव दाखविला जातो. त्यास मासिक व वार्षिक श्राद्ध असे म्हणतात. हिंदू शास्त्रानुसार वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त पंधरा दिवसच पितृपूजनासाठी राखून ठेवलेले असतात. भाद्रपद कृ. 1 ते 15 हा काळ पितृपक्ष म्हणून राखून ठेवला आहे.

श्राद्ध या शब्दाचा अर्थच मुळी मृताप्रति श्रद्धा भावना व्यक्त करण्याचा आहे. ती व्यक्ती जिवंत असताना तिने आपल्यावर केलेले त्यांचे अनंत उपकार असतात. आपल्या उत्कर्षासाठी सर्वांगीण प्रयत्न केलेले असतात. त्यांनी आपल्याप्रति अनुपम केलेला त्याग त्यामागे असतो. थोडक्यात, आपल्या उत्कर्षासाठी त्यांचा फार मोठा वाटा असतो. निसर्गनियमानुसार त्यांचे इहलोकातील जीवितकार्य संपल्याने त्यांना इहलोक सोडावा लागला तरी त्यांनी आमच्यावर केलेले उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही. मृतांना मृत्यूपूर्वी दिलेली वचने पुरी करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला व तसे वर्तन ठेवले व त्या दिशेने योग्य पावले टाकली तर ते खरे श्राद्धकर्म ठरावे. मृतांच्या केवळ घरात तसबिरी लावून केलेले पूजन हा फक्त उपचार ठरतो. देवदेवतांचे पूजन करताना षोडशोपचार जसे केले जातात तसे पितर पूजनाचेदेखील आहे. फक्त प्रत्यक्ष पद्धतीत फरक असतो. नित्य, नैमित्तिक, काम्य, सपिंडी, बुद्धी… अशी वेगवेगळय़ा स्वरूपातील बारा प्रकारची श्राद्धकर्मे आपल्या शास्त्रात सांगितली आहेत. पितृपक्षाच्या शेवटी ‘महालय’ असेही म्हणतात. या काळात आपले पितर यमलोकातून आपल्या घरी येतात व वास्तव्य करतात असे धर्मशास्त्र सांगते. भारतातील बहुतेक सर्व तीर्थक्षेत्री श्राद्धकर्मे केली जातात. त्यात मातृगया, सिद्धपूरड गुजरात़,गया, डबिहार ा़विशेष महत्त्वाचे आहेत. त्याप्रमाणे देवप्रयाग, हरिद्वार, ब्रह्मावर्त, मथुरा, काशी प्रयाग, अयोध्या, राजगृह, परशुरामकुंड, मुनेश्वर, जगन्नाथपुरी. अमरकंटक, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, आळंदी, संगम माहुली. तिरुपती, शिवकांची, ब्रह्मावर्त, हरिहरेश्वर श्रीरंगम, द्वारका, नारायण सरोवर गुजरात आदि तीर्थे आहेत.

धर्मशास्त्रानुसार हे जरी होत असले तरी त्याशिवायदेखील पितरांच्या स्मरणांनी आदरभाव व्यक्त करता येतो. सर्वार्थाने अशक्त, दुर्बल असणाऱया समाजघटकास सबळ आपण करू शकतो. अन्न, वस्त्र, अवयव, ज्ञान, रक्तदान, अन्य बाबींनी गरजूंना आपण हातभार लावू शकतो. दिलेले दान स्वीकारल्यानंतर गरजूच्या चेहऱयावर उमटलेले हसू व आनंद, समाधान हेच पितरांप्रतिचे खरे श्राद्ध ठरावे असे मला वाटते. त्यामागील उपचार जरी वेगळा असला तरी भावना एकच आहे. भागवत गीतेत भगवंताने तसे सांगितलेच आहे.

हे सारे जरी असले तरी सध्याचे वास्तव पाहायलाच हवे. कारण हल्लीचे चित्र वेगळेच आहे. कारणे कोणतीही असली, पटणारी व न पटणारी असली तरी वृद्धत्वाची तारुण्याला अडचण होते. म्हणून वृद्धांना सोयीने दूर करण्याचा प्रयत्न होतो. त्यांचे उपकार व त्याग विसरला जातो त्यामुळे वृद्धांना अशा वयात वृद्धाश्रमाचा पर्याय स्वीकारावा लागतो. हक्काचे घर जाऊन वृद्धाश्रम त्यांना आपलासा करावा लागतो. अशावेळी पुढे त्यांचे निधन झाल्यावर पितरांचे पूजन करून समाधान मानण्यापेक्षा ते जिवंत असतानाच त्यांना सुखी ठेवले तर! हाच खराखुरा श्रद्धाभाव ठरेल. श्राद्धाच्या निमित्ताने प्रत्येकाने हे वास्तवाचे भान राखले तरी खूप झाले. भक्त पुंडलिक किंवा श्रावण बाळ यांचा माता-पित्याचा आदर्श सध्याच्या सामाजिक प्रश्नावर मोठा तोडगा ठरवा. पितरांप्रतिचे श्राद्ध हे केवळ उपचार ठरू नये इतकेच!

आपली प्रतिक्रिया द्या