
>> दिलीप जोशी
सुमारे सहा हजार तारे आपल्याला निरभ्र रात्री अवकाशात दिसतात. त्यासाठी रात्रभर आकाशदर्शन करण्याची तयारी मात्र हवी. तारे विविध प्रकारचे असतात. त्याविषयी आपण माहिती घेतलीच आहे. आपला सूर्य हा आपल्याला दिवसा दिसणारा एकमेव तारा आहे. तोच आपल्या ग्रहमालेचा जनक. मग त्याचा जन्म कसा झाला? तर एका ताऱयाच्या मृत्यूमधून तयार झालेल्या तेजोमेघातून आपल्या आकाशात जो मृग तारकासमूह किंवा नक्षत्र दिसतं त्या मृग म्हणजे हरिणाच्या शेपटातील तेजोमेघात हजारो (सुमारे 20 हजार) सूर्यांची किंवा संभाव्य ताऱयांची ऊर्जा दडलेली आहे. तर अशा तेजोमेघातून (सुपरनोव्हा) तारे जन्माला येतात. तसाच आपला सूर्यसुद्धा पाच अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. आणखी पाच अब्ज वर्षांनी तो खऱया अर्थाने कायमचा ‘अस्ताला’ जाईल. त्यापूर्वी त्याचं रूपांतर लाल महाकाय ताऱयात होईल. त्याचा आकार वाढत वाढत जाऊन त्याच्या कवेत, मंगळापर्यंतचे ग्रह येतील. तोपर्यंत आपली पृथ्वी त्याने अर्थातच गिळंकृत केलेली असेल. त्यानंतर कोटय़वधी वर्षे तशीच जातील आणि आपल्या सूर्याचा श्वेत-खुजा किंवा व्हाइट ड्वार्फ होईल. (व त्यानंतर ब्लॅक ड्वार्फ!) सूर्याचं जेवढं वस्तुमान आहे, तेवढय़ा ताऱयांचे असे श्वेत-खुजे होतात. ज्यांचं वस्तुमान सूर्याच्या 1.44 इतकं आहे त्यांचे न्यूट्रॉन स्टार होतात आणि सूर्याच्या 3.4 वस्तुमानाएवढय़ा ताऱयांचं कृष्णविवर किंवा ब्लॅकहोलमध्ये रूपांतर होतं.
प्रसिद्ध खगोल अभ्यासक प्रदीप नायक सांगतत, तारा हा अणुरेणूंचा समुच्च्यय असतो. तारे जन्माला येतात. तसेच त्यांचा अंतही ओढवतो. मृत्यूनंतरच्या ताऱयांमधूनच सुपर नोव्हा आकाराला येतो. त्यानंतर ताऱयांभोवतीच्या ग्रहमाला आणि त्यात एखादा आपल्या पृथ्वीसारखा सजीवसृष्टीने नटलेला पाणीदार निळा ग्रह! हे सारे वैश्विक योगायोगाने किंवा अणुप्रक्रियेतून घडत असते.
याचाच अर्थ सुपरनोव्हा किंवा तेजोमेघातून तारा, ताऱयातून ग्रहमाला. मग कालांतराने त्यावरच्या एकपेशीय सजीवांपासून आपल्यासारखे प्रगत म्हणवले जाणारे सजीव असा हा प्रवास असतो. अर्थातच आपल्या अस्तित्वाचा मूलाधार आधी तेजोमेघ, मग तारा आणि त्यानंतर आपला ग्रह असतो. ताऱयाभोवती फिरणाऱया एखाद्या ग्रहावर निसर्गाची अनुकूलता त्यातील घडामोडीतून निर्माण झाली की सूक्ष्म सजीव स्पंदन करू लागतो. त्याच्या किंवा आपल्याही शरीराची जडणघडण मूळ ताऱयातील अणुंमुळेच झालेली असते.
ताऱयाच्या गाभ्यात असलेला हायड्रोन वगळता त्यातील प्रत्येक अणु आपल्या शरीरात आढळतो. ताऱयाच्या जीवनक्रमात त्याला शेवटी लाल महाकाय स्वरूप येतं तेव्हा त्यातील हायड्रोपासून लोखंडापर्यंतचे धातू असतात. लोखंडाचा अणु क्रमांक सव्वीसावा आहे. त्यापुढचे ब्याण्णव क्रमांकापर्यंतचे विविध धातू किंवा मूलद्रव्य म्हणजे सोनं, चांदी तयार होतात. ताऱयापासून निर्माण झालेल्या ग्रहांमध्ये आणि त्यावर निर्माण झालेल्या प्राण्यांमध्ये त्याचेच अणु असतात. म्हणजे एकप्रकारे तारा हा आपला ‘पूर्वज’ असतो. आपण आपले ज्ञात पूर्वज, त्यांचे पूर्वज असं करीत मागे जाऊ लागलो की, एकपेशीय सजीव, त्याआधी पृथ्वीची निर्मिती आणि त्याच्याही पूर्वी सूर्याची निर्मिती तसेच ती करणारा तेजोमेघ एवढी आपल्या आजच्या अस्तित्वाची ‘साखळी’ मागे जाते.
त्यामुळे या विश्वातला आपण एक अद्वितीय घटक आहोत हे लक्षात आले तर आपल्या अस्तित्वासह साऱया चराचर सृष्टीचाही अचंबा आणि अभिमान वाटेल.
सूर्याच्या वर्णपटातून त्यावरील धातू ओळखता येतात. तेच पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यातूनच आपण तयार झालेलो असतो. तेव्हा ‘कूळ’कथा कुठे जाऊन पोचते? तर थेट तेजोमेघापर्यंत!





























































