विविध भाषांतराची कला

>> दिलीप जोशी

30 सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिवस मानला जातो. भाषांतर करण्यासाठी अर्थातच किमान दोन भाषा उत्तम रीतीने अवगत असाव्या लागतात. माणसांमध्ये शाब्दिक संपर्क सुरू झाला तेव्हापासूनच्या एकूण किती भाषा जगात आता अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी किती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत? असा प्रश्न पडला आणि बहुभाषा अभ्यासक डॉ. शुभांगी कर्डिले यांना त्याबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आजमितीला जगात सुमारे 7117 भाषा बोलल्या जातात आणि त्यापैकी सुमारे 40 टक्के नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं ‘एथनॉलॉजी’ या संस्थेचं म्हणणं आहे. एखादी भाषा एक हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकांपुरतीच असते, ती नष्ट होण्याचा धोका असतो. आपल्या हिंदुस्थानात 22 अधिकृत भाषा आहेत, पण दीड ते दोन हजार बोलीभाषासुद्धा आहेत. भाषासुद्धा वापरली गेली नाही तर संपत जाते.’’

तर अशी ही ‘भाषिक’ आकडेवारी. माणूस जेव्हा केव्हा बोलायला शिकला आणि समान ध्वनीचे समानार्थ समजणारे समूह उदयाला आले तसतशी एकेक भाषा विकसित झाली. त्यातही काही भाषा ‘प्रमाण’ म्हणून सर्वांना समजतील अशा व्यावहारिक सोयीने मान्यता पावल्या. त्यात साहित्यकृती निर्माण झाल्या, परंतु बोलीभाषांचं महत्त्वही तेवढंच आहे. बदलत्या काळात त्यामध्येही साहित्य निर्माण होतंय.

जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती भाषा समजतेच. ती त्या व्यक्तीची मातृभाषा असते. कळायला लागण्याच्या वयापासून कानावर पडणारं मोठय़ांचं संभाषण लहान मूल ऐकतं आणि ते मेंदूत साठवून त्या भाषेत संवाद साधायला लागतं. कालांतराने शिक्षण, व्यवसाय किंवा केवळ आवड म्हणूनही काही जण अनेक भाषा शिकतात. आसपास इतर भाषिक राहत असतील तर बालपणीच चार-सहा भाषा समजू लागतात.

परंतु प्रयत्नपूर्वक इतर भाषा शिकून त्यात प्रावीण्य मिळवणारेही असतात. काही व्यक्तींना मातृभाषेव्यतिरिक्त इतर पाच-सात भाषा येतात. अशा बहुभाषिक लोकांना इंग्लिशमध्ये ‘पॉलिग्लॉट’ म्हणतात. ही मंडळी दोन भिन्न भाषिकांमध्ये संपर्क, संवाद साधण्याचं काम करतात. इतर भाषेतलं लेखन आपल्या भाषेत आणणं किंवा आपल्या भाषेतलं लिखाण दुसऱया भाषेत भाषांतरित करणारी मंडळी आपलं वाचकाचं अनुभव विश्व रुंदावतात. अनेक मराठी पुस्तकांची अनेक भाषांमध्ये भाषांतरं किंवा रूपांतरं झाली आहेत. वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे असे लेखक किंवा माडगूळकरांसारख्या कवीचं ‘गीतरामायण’ हिंदुस्थानातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं. अलीकडच्या काळातही अनेक लेखकांची पुस्तक देशी-विदेशी भाषांमध्ये आणि त्या वाचकांपर्यंत पोहोचली. ही मराठी भाषेची समृद्धी आहे. त्याचप्रमाणे बंगाली, कन्नड किंवा अन्य भाषांमधली पुस्तकं मराठीत आणण्याचं कार्यही झालं आहे. असं भाषांतर करताना मूळ लेखनातील आशय दुसऱया भाषेत उतरवण्यासाठी चपखल शब्दरचनेची आवश्यकता असते. ती प्रभावी भाषांतर किंवा रूपांतर करणाऱयांकडे असते. इंग्लिश साहित्यातील नोबेल पारितोषिक लाभलेले अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘ओल्ड मॅन ऍन्ड द सी’ या पुस्तकाचं पु.ल. देशपांडे यांनी केलेलं ‘एका कोळियाने’ हे रूपांतर खूप गाजलं. अशी कितीतरी पुस्तकं आणि लेखक आहेत.

भाषांतरामुळे एका भाषेतील साहित्यकृती, विचार, भाषासौंदर्य या गोष्टी इतर भाषिकांना समजतात. तसंच वैज्ञानिक पुस्तकांच्या भाषांतरातून मातृभाषेतून विज्ञान समजण्याची सोय होते. मातृभाषेत व्यक्त झालेले विचार माणसाच्या मनात लवकर रुजतात ही आता जगात मान्य झालेली गोष्ट आहे.

राजकीय पटलावर किंवा उद्योग जगतात ‘इन्टरप्रीटर’ किंवा अचूक भाषांतर करून त्वरित सांगणाऱया व्यक्तींची गरज भासते. विविध देशांतली नेतेमंडळी एकत्र येतात तेव्हा केवळ आपल्याच देशाची भाषा जाणणारे नेतेही त्यात असतात. अशावेळी निपुण इन्टरप्रीटर दोघांचंही बोलणं परस्परांना त्यांच्या त्यांच्या भाषेत त्वरित भाषांतर करून सांगतो. यावेळी आशयात गफलत होऊन चालत नाही. ही तशी जोखमीची जबाबदारी असते. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चिनी पत्नीची मुलाखत मी 1985 मध्ये घेतली होती. त्यावेळी ‘इन्टरप्रीटर’ आमचं बोलणं भाषांतरित करून सांगत होता. सुसंगत प्रश्नोत्तरांतून त्याचं कौशल्य जाणवत होतं. अनेक भाषा येणं खूप अनुभवसमृद्ध करणारं ठरतं. आपल्याकडे विनोबा भावे यांना एकवीस भाषा अवगत होत्या. भाषांतर ही एक जबाबदारीची कला आहे. त्यासाठी आधी मातृभाषा उत्तम येत असेल तर इतर भाषा शिकणंही सोपं जातं आणि अर्थातच त्याची आवडही असायला हवी. उद्याच्या जगात ‘इंग्लिश’ प्रभावी ठरली तरी अन्य भाषांचं महत्त्व राहणारच आहे. आपल्या मराठीची महत्ता आपणच इतर भाषिकांपर्यंत पोहोचवायला हवी. भाषांतर त्यासाठी उपयुक्त ठरतं.

आपली प्रतिक्रिया द्या