मुद्दा : वृक्षारोपण झाले; संगोपनाचे काय?

1533

>> रामकृष्ण पाटील

दरवर्षी झाडे लावली जातात, पण झाडे लावण्याचे खड्डे तेच असतात फक्त झाडे बदलतात असे चित्र खूप वेळेस पाहायला मिळते. म्हणून जसे झाड लावतो तसे त्याचे संवर्धन करून त्याला मोठे करायचे प्रयत्न करावे जेणे करून आपण केलेले वृक्षारोपणाची वृक्षे पुढच्या काळात रुबाबात डौलताना आपल्याला पाहायला मिळतील व त्याचा परिणाम आपल्याला पर्यावरणात पाहायला मिळेल.

आपल्या हिंदुस्थानची लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतशी झाडेसुद्धा कमी होत आहेत. झाडे कमी होत आहेत म्हणून त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असताना आपण पाहत आहोत. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागत आहे.

‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना राबवली जात आहे. त्यानुसार प्रत्येकवर्षी वृक्षारोपणदेखील केले जाते. वृक्षलागवडीची संख्या सरकारी आकडेवारीनुसार लाखोंवर सांगितली जाते. पण ही लाखो झाडे लावली जातात त्यांच्यातली जगतात किती किंवा जगवण्याचे प्रयत्न किती केले जातात? त्याचा विचार व्हायला हवा. फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही तर त्यांचं संवर्धनसुद्धा करणे ही काळाची गरज आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

अशा प्रकारे सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे. या वृक्षतोडीमुळे मानवी जीवनासोबत वन्यजीव पशुपक्षी यांचे जीवनसुद्धा धोक्यात येत आहे. वृक्षतोडीने जंगले नष्ट केली जात आहेत. आणि त्यामुळे वन्यप्राणी मानवी वसाहतीवर हल्ले करू लागले आहेत. तसे पाहिले तर ते वन्यप्राणी आपल्या वसाहतीवर हल्ले नाही करत तर आपण त्यांच्या वसाहतीवर हल्ले करत आहोत असे म्हणायला काही हरकत नाही. सरकार दरवर्षी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ संकल्पना राबवून वृक्षलागवड करते. पण त्याचे संवर्धन आपण करत नाही. म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी  स्वतःहून सहभाग घेतला पाहिजे.

आपला किंवा आपल्या परिवारातील कुणाचा वाढदिवस असेल तर आपल्या मित्रपरिवाराला आपण हजारो रुपये खर्च करून पार्टी देतो. त्या पार्टीऐवजी जर आपण वाढदिवशी आपल्या मित्रांकडून वृक्षारोपण करून त्याच पार्टीच्या पैशाचा वापर ‘झाड संरक्षण जाळी’ यासाठी केला तर तीच झाडे मोठी झाल्यावर आपण अभिमानाने सांगू शकतो, ही झाडे आम्ही आमच्या अमक्या अमक्या वाढदिवशी लावली होती. एक कायमची आठवण आपल्याला राहील. असे काहीतरी निमित्त साधून आपल्याला वृक्षारोपण करण्याची आज गरज आहे.

प्रत्येकाने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना समजून आज प्रत्येकाला झाडे लावण्यासाठी पाऊल उचलावे लागेल. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, सामाजिक बांधिलकी आणि वैयक्तिक जबाबदारी म्हणून वृक्षलागवड केली पाहिजे. संपूर्ण जग प्रदूषणाच्या भयंकर विळख्यात सापडले आहे. या गंभीर कारणाला जबाबदारही आपणच आहोत. प्रदूषणासाठी जेवढा माणूस जबाबदार आहे, तेवढय़ाच जबाबदारीने समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन वृक्षलागवड आणि संवर्धन केले पाहिजे. कारण ही आजच्या काळाची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या