वेब न्यूज – कृत्रिम भ्रूणाची किमया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

काही शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी सिंथेटिक अर्थात कृत्रिम भ्रूण बनवण्यात यश मिळवले आहे. याचा अर्थ असा की, आता मुलाला जन्म देण्यासाठी ना नराच्या शुक्राणूंची गरज असेल, ना मादीची गरज असेल. शास्त्रज्ञांनी उंदरापासून हा कृत्रिम भ्रूण बनवल्याचा दावा केला आहे; मात्र आपला उद्देश हा या संशोधनातून मुलं जन्माला घालण्याचा नसून, जगभरातील लोकांना विविध आजार व शारीरिक दोषांपासून मुक्ती देण्याचा आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार हा प्रयोग व्यवस्थित पार पाडल्यानंतर, शरीरातील वेगवेगळय़ा भागांच्या पेशी या गर्भातच तयार करता येतील. ज्यातून विविध अवयव विकसित करता येतील.

मूत्रपिंड, यकृत, आतडे, हृदय यांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांसाठी हे एक वरदान ठरणार आहे. या कृत्रिम भ्रूणापासून प्रजोत्पादन नाही, तर मानवी अवयवांची निर्मिती हाच प्रमुख उद्देश असणार आहे. जगभरात अनेक लोक सध्या कृत्रिम अवयवाची वाट बघत आहेत. त्यांच्या उपचारासाठी हा नवा शोध एक वरदान ठरणार आहे.

ही बातमी चर्चेत आल्यानंतर एका छोटय़ा समुद्री जिवाचीदेखील मोठय़ा प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. लवकरच नामशेष होण्याची भीती असलेल्या या समुद्री जिवाचे नाव ‘सी हॉर्स’ असे आहे. हा जीव चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, आपल्या संपूर्ण प्राणीविश्वात मादी ही अपत्याला जन्म देते. मात्र ‘सी हॉर्स’च्या प्रजातीमध्ये नर आपल्या अपत्याला जन्म देतो हे विशेष. ‘हिप्पोपॅम्पस’ अशा शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या समुद्री जिवाला आपल्याकडे ‘समुद्री घोडा’ म्हणून ओळखले जाते.

अद्वितीय अशी शरीररचना असलेले हे जीव आपल्या पिल्लाला नुसता जन्म देत नाहीत, तर त्यांना पोषक द्रव्ये आणि ऑक्सिजनदेखील पुरवतात. हे जीव सरडय़ाप्रमाणे आपला रंगदेखील वेळोवेळी बदलण्याची किमया बाळगतात. या समुद्री जिवाबद्दल जेव्हा माहिती समोर आली, तेव्हा जगभरातील अनेक लोक या जिवाबद्दल पहिल्यांदाच ऐकत, वाचत असल्याचे उघड झाले.