देशातील निम्म्या लोकसंख्येचा प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सादिक पापामियाँ खाटीक

संकटकाळात आपले कुटुंब सावरणाऱ्या अशा स्त्रीया आपल्या आसपाससुद्धा दिसतील. स्त्रीला चार भिंतीत दडपण्याऐवजी आपल्या कुटुंबाचे नेतृत्व तिच्या हाती दिले किंवा तिला बरोबरीचा हक्क दिला तर प्रत्येक कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. पुरुषार्थाच्या भ्रामक कल्पनेत न गुंतता स्त्रीला बरोबरीचे मानण्यात कोणालाही गैर वाटणार नाही. आपली आई, बहीण, पत्नीने जे सोसले ते किमान आपल्या मुलीच्या आयुष्यापासून तरी बदलत जावे असा विचार केला तर या देशातील 50 टक्के कर्तबगार लोकसंख्या म्हणजे महिलावर्ग आपल्या देशाला प्रगतिपथाला नेऊ शकेल यात शंकाच नाही.

जगातला पहिला व्यवसाय शेती. त्याचा शोध स्त्रीने लावला. जगाच्या उत्पत्तीचे मूळही तीच. या जगातील प्रत्येक घटकाचे पालनपोषण तिनेच केले. पण धर्म आणि रीती यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिला दुय्यम बनविले गेले. जगातले सगळे धर्मग्रंथ तिला दैवी शक्तीचा अंश मानतात, पण तिच्या जगण्यावर निर्बंध लादतात. ती म्हणजे जगाची निम्मी लोकसंख्या.

आजच्या युगात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत असे आपण म्हणतो. काही अंशी ते खरे पण आहे. पण जगातली सगळी युद्धे ही महिलांमुळे लागली असे जेव्हा कुजकेपणाने एखादा माणूस बोलून जातो तेव्हा जाणती मंडळीसुद्धा त्याच्या त्या मूर्खतापूर्ण वक्तव्याला टाळी देतात. प्रत्येक गोष्टीतील सवयीचे असणारे एखादे कारण आपल्याला दिसले की आपण लगेच ‘याचमुळे हे घडले’ असे पटकन म्हणून जातो आणि इतर कारणांकडे डोळेझाक करतो. स्त्रीयांमुळे किंवा स्त्रीच्या लालसेपोटी युद्धे होतात, संकटे येतात, हे असेच एक खोटे गृहीतक आहे.  मुळात पुरुषांच्या विविध वासनांची ती एक शिकार आहे. याकडे आपण जाणूनही दुर्लक्ष करतो. दोष पुरुषवर्गाच्या दृष्टीत आहे याकडे हेतुत: डोळेझाक करतो. नाहीतर कोणत्याच देवीला स्वत:चे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली नसती. कोणत्याच स्त्रीला डोळ्यात वाळू जाते या कारणास्तव संपूर्ण शरीर झाकून घ्यावे लागले नसते, की कोणत्या स्त्रीला बर्फाळ प्रदेशाचे निमित्त सांगून डोके आणि संपूर्ण चेहरा रुमालात झाकावा लागला नसता.

स्त्रीचे चारित्र्य, शुचिता यांना समाजाने जितके महत्त्व दिले, तितके महत्त्व पुरुषाचे चारित्र्य आणि शुचितेला नाही. हे वास्तव लक्षात घेतले तर स्त्रीची प्रगती खुंटण्याचे आणि एकूणच जगाची गती कमी होण्याचे कारण लक्षात येईल. आजही मुलगी जास्त शिकली तर तिला तिच्यायोग्य जोडीदार कुठून आणायचा? असा प्रश्न विचारला जातो. सुशिक्षित मुलीला लग्नानंतर करीयरला बंदी घातली जाते. हे पंख छाटण्यासारखेच आहे. हे होण्यामागेही कारण स्त्रीचे चारित्र्यच सांगितले जाते. पण त्यामुळे आपण मागे पडत आहोत हे विसरून चालणार नाही.

देशात पुरुषांनी आत्महत्या करण्याच्या घटना जास्त घडतात. तीन पुरुषांच्या मागे एका महिलेची आत्महत्या घडते. विदर्भ आणि मराठवाडय़ात शेतकरी आत्महत्यांच्यामध्ये पुरुषांचे प्रमाण प्रचंड आहे. हे सगळे जग जाणते. पण आत्महत्या करणाऱ्या त्या हजारो पुरुषांच्या मागे राहिलेल्या संसाराचा गाढा ओढण्याची जबाबदारी स्त्रीयांवर येते, हे वास्तव आपण ध्यानातच घेत नाही. देशभरातील पत्रकार जेव्हा या आत्महत्याग्रस्त गावात पोहचले तेव्हा पतीच्या त्या सगळ्या कर्जासह त्याच्या वृद्ध माता-पिता आणि मुलांची जबाबदारी घेऊन संसार चालविणारी स्त्री त्यांना गावोगावी भेटली. ती आत्महत्या केलेल्या पतीइतकीच आजही शेतात राबते. संसाराला हातभार लागावा म्हणून शिलाईकाम, लोणची, पापड असे जे जमेल ते करते, पण आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करते. वृद्ध सासू-सासरे यांच्यावरील औषधोपचार असोत की मुलांचे शिक्षण, संगोपन असो, ती त्यात खंड पडू देत नाही. मग हेच काम करताना तिच्या पतीने आत्महत्या का केली? हा प्रश्न सहजच मनात येतो. तो दोष आत्महत्या केलेल्या पुरुष शेतकऱ्याचा नसतो. आपल्या व्यवस्थेने पुरुष आणि पुरुषार्थ याचा इतका बडेजाव माजविला आहे की त्या पुरुषार्थाच्या ओझ्याखाली एक माणूस म्हणून जगणारा पुरता दबून जातो. शेतीत किती पाऊस पडतो, किती पिकते आणि काय दराने विकते, याचे तंत्र विचारात न घेता तो बैलजोडी, ट्रक्टर, विहीर खुदाई, पाईपलाइन आणि इतर भांडवली गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतो. निसर्गचक्रातील बदलाने प्रत्येक 3 वर्षांत एकदा किंवा दोनदा तरी तो तोटय़ात जातो. मग कर्जाचे हप्ते आणि इतर देणी भागवायला तो सावकाराचे कर्ज घेतो. पुढच्या पिकात तोटा भरून येईल हा त्याचा विचार कधीच खरा ठरत नाही आणि मग कर्ज आणि व्याजाच्या चक्रात गुरफटलेला तो शेतकरी जप्ती आणि लिलावाच्या भयाने, सावकारांकडून होणाऱ्या शिवीगाळ, धमक्या, प्रसंगी मारहाण, पत्नी व मुलीबाळीविषयी काढली जाणारी नीच भाषा, मानहानीऐवजी तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो. पुरुषार्थाची ही कल्पना केवळ शेतकऱ्याचाच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रातील पुरुषाचा घात करीत आली आहे. हिंदुस्थान, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान याच नव्हे तर जगातल्या कुठल्याही गरीब राष्ट्रातली पुरुषांची हीच व्यथा आणि कथा आहे आणि त्या त्या देशात महिलांनी आपले घर आज ही सावरले आहे हे ढळढळीत वास्तव आहे.

ज्या स्त्रीला चारित्र्याच्या नावाखाली दाबून ठेवले आहे ती स्त्री संकटात आपले घर कसे सावरते. अशी कुठली दैवी शक्ती तिच्या अंगात संचारते, याचे उत्तर आहे स्त्रीला निसर्गाने जन्मत: वास्तवदर्शी बनविले आहे. तिला आपल्या आर्थिक परिस्थितीचे भान असते. आपल्या मर्यादा तिला माहीत असतात. झेप घेण्याचा पुरुषार्थ तीही दाखवू शकते. पण त्याआधी ती संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून ठेवते. विदर्भ, मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीनी हे नक्कीच जाणले की, आपला भाग एक तर कोरडवाहू आहे किंवा अवकाळी, गारपीठ अशा संकटांना सामोरे जाणारा आहे. त्यामुळे मोठा खर्च करणारी पिके करण्यापेक्षा कमी खर्चात जास्त उत्पन्न देतील आणि मर्यादित कष्टात उगवतील, नैसर्गिक संकट आले तर कुटुंबावर मोठा आर्थिक ताण पडणार नाही, अशी पिके घेण्यास सुरुवात केली. आपल्या तालेवारकीचे दर्शन त्यांना कुठे घडवायचे नव्हते. आपला रोजचा खर्च भागविण्यासाठी शिलाई, लोणची पापड, शेळी, गाय, म्हैस, कोंबडीपालन अशी सिजनल कामे करीत त्यांनी कुटुंबाचे पोट आणि खर्च भागविला. आज हजारो स्त्रीयांनी मराठवाडा आणि विदर्भातील कुटुंबे सावरली आहेत.

संकटकाळात आपले कुटुंब सावरणाऱ्या अशा स्त्रीया आपल्या आसपाससुद्धा दिसतील. आजच्या दिवसापासून आपल्या दृष्टीत थोडासा बदल करूया आणि अशा स्त्रीयांचे चार लोकांत कौतुक करूया. स्त्रीला तिच्या चारित्र्याचे भय दाखवून, चार भिंतीत गुडूप करण्याऐवजी आपल्या कुटुंबाचे नेतृत्व तिच्या हाती दिले किंवा तिला बरोबरीचा हक्क दिला किंवा निर्णय घेताना तिचे म्हणणे विचारात घेऊन धोरण ठरविले तर प्रत्येक कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. पुरुषार्थाच्या भ्रामक कल्पनेत न गुंतता स्त्रीला बरोबरीचे मानण्यात कोणालाही गैर वाटणार नाही. आपली आई, बहीण, पत्नीने जे सोसले ते किमान आपल्या मुलीच्या आयुष्यापासून तरी बदलत जावे असा विचार केला तर या देशातील 50 टक्के कर्तबगार लोकसंख्या म्हणजे महिलावर्ग आपल्या देशाला प्रगतीपथाला नेऊ शकेल यात शंकाच नाही.