मुद्दा – जागो ग्राहक जागो!

2380

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा झाला. जागतिकीकरण व आधुनिकीकरणाच्या प्रवाहात ‘एन्ड यूजर’ म्हणजेच ग्राहकाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. इतकेच नव्हे तर “Consumer is king” असे संबोधित होऊ लागले. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे. ग्राहकाला वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता, दर्जा, त्यातील घटक, त्याची कालमर्यादा हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असला तरी त्याची आज खुलेआम फसवणूक होत आहे हे आपण वर्तमानपत्रांतून वाचतो व अनुभवतसुद्धा आहोत. ही फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय, तक्रार निवारण प्रणाली सेवा कार्यरत आहे. तरीसुद्धा ग्राहकांचा वाली कोण? हा प्रश्न पडतो. कारण एकूणच या शासकीय व्यवस्थेत असलेल्या एकूण सेवा-सुविधा, उपलब्ध असलेला स्टाफ आणि येणारी प्रकरणे बघता ग्राहकांना अनेक वर्षे खेटे मारावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. आज न्यायनिवाडा करणारी यंत्रणा जरी असली तरी सुद्धा ग्राहक फसले जातात. कारण खरेदी, विक्रीच्या भूलथापांना ते बळी पडतात. त्यातूनच आजच्या तरुण पिढीचा कल हा ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून वाढत असून हे मायाजाल अधिक व्यापक होऊ लागले आहे. केवळ शहरी भागात नव्हे, तर आता ग्रामीण भागातसुद्धा हे जाळ पसरू लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलत चाललेली जीवनशैली आणि त्यानुसार बदलत चाललेली मानसिकता. ‘यूज ऍण्ड थ्रो’ जमान्यात त्या वस्तूची गुणवत्ता, दर्जा, काय असणार याचा विचार करण्याची मानसिकतासुद्धा राहिलेली नाही. एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर ती सहा महिने टिकली की, आम्ही धन्य झालो आणि वर अभिमानाने सांगतो एवढय़ा रकमेत आणखी किती टिकणार ?

तरुण पिढी आणि आवश्यक काटकसर हे गणित जमतच नाही. अर्थातच याला अपवाद असतील आणि त्याचे कारण म्हणजे आजचे मासिक उत्पन्न व दरडोई खर्च हेसुद्धा वाढले आहेत. याबाबत कदाचित दुमत असू शकेल, परंतु तंत्रज्ञानात होणारी प्रगती व त्या माध्यमातून आपण बसल्या जागेवरून आपणांस हवी ती वस्तू अगदी किराणा माल, कपडालत्ता, विद्युत उपकरणे, दागदागिने, खाद्य पदार्थ हे सर्व काही आपण अगदी अल्पावधीतच आपल्या निवडीनुसार मागवू शकतो. इतकेच नव्हे, तर त्यावर 10 ते 15 टक्के सूटसुद्धा मिळते. तसेच उत्पादित कंपन्यांचे विविध पर्यायसुद्धा आपल्याला उपलब्ध असतात. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांचा ओढा हा दिवसेंदिवस ऑनलाइन शॉपिंगकडे वाढला आहे, परंतु पूर्वीचा जो चोखंदळ ग्राहक आहे, तो दुकानात जाऊन योग्य ती विचारपूस, पाहणी, केल्यानंतर ती वस्तू खरेदी करतो. भले ती वस्तू थोडीफार महाग पडली तरी तो समाधानी असतो. सध्याच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत वेळेला अधिक महत्त्व असल्यामुळे दुकानात जाऊन मर्यादित वस्तू बघून खरेदी करण्याची मानसिकता बदलू लागली आहे. ऑनलाइनवरील विस्तृत माहिती, फोटो, विविध पर्याय, रोखीमधील सूट यामुळे हे मायाजाल अधिक व्यापक होऊ लागले आहे. सध्या संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे चटके बसत आहेत. तरीसुद्धा खरेदी-विक्रीची टक्केवारी नक्कीच वाढली आहे. पूर्वी ठराविक सण, घरातील शुभकार्यावेळीच कपडालत्ता, दागदागिने, भेटवस्तू, सजावटीचे सामान यांची खरेदी होत असे. तसे आता काही राहिले नाही.

आताचा ट्रेंड पाहता महिन्यातील एक/दोन शनिवार/रविवारी मॉलमध्ये जाऊन आवर्जून खरेदी करणे, तिथे असलेल्या भरमसाट उत्पादनांवर दिल्या जाणाऱया आकर्षक सवलती, विविध योजना अशी आमिषे दाखवून ग्राहकाला आकर्षित केले जाते. त्याचे आदरातिथ्य करणे व वस्तूंची विक्री करणे असा जणू एक ट्रेंड झाला आहे. इतकेच नव्हे तर साजरे होणारे सण व विविध ‘डेज’ (दिवस) या माध्यमांतून त्याचे निमित्त साधून फार मोठय़ा प्रमाणावर विक्री केली जाते. त्यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढते. बाजारात मोठय़ा प्रमाणावर चलनवाढ होते. या सर्व गोष्टी जरी सकारात्मक असल्या तरी खरेदी, विक्रीमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता ग्राहकांना फसविण्याचे प्रकारसुद्धा मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. त्यासाठी ग्राहक मंच, ग्राहक तक्रार निवारण केंद्र असले तरी जागृत ग्राहक या नात्याने आपण चोखंदळ राहणे, सर्व वस्तूंची नीट चौकशी करून योग्य ती तपासणी करून मगच खरेदी करून ‘जागो ग्राहक जागो’ अभियान अधिक व्यापक कसे होईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या