
>> आनंद कुलकर्णी, निसर्गोपचार सल्लागार
येत्या गुरुवारी जागतिक माती दिन आहे. जरा वेगळं वाटतंय ना… माती आपल्या महाराष्ट्राचा, संस्कृतीचा आत्मा आहे. सर्जनशीलता हा तिचा धर्म. मूळमाय या मातीतूनच प्रगटते. आपले सारे आरोग्यही मातीच जपते.
आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. या पंचमहाभूतांमध्ये पाणी, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी तत्त्व यांचा समावेश होतो. तर हे पृथ्वी तत्व म्हणजे माती. या मातीपासून आपल्या शरीराचे घटक बनलेले असतात. त्यामुळे निसर्गोपचारात अशी संकल्पना आहे की, ज्या घटकांपासून आपले शरीर बनलेले आहे, त्या घटकांचा आपण युक्तीने वापर केल्यास आपल्या शरीरात झालेले बिघाड दूर करता येतात. त्या दृष्टीने आपल्या निसर्गोपचारात मातीचा उपयोग केलेला आहे.
माती ही अनेक आजारांवर काम करते असे निसर्गोपचारात सांगितलेले आहे. मातीचा निसर्गोपचारात उपयोग करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिला मातीचा थेट उपयोग आणि दुसरा मातीच्या पट्टय़ांचा उपयोग अशा दोन पद्धतीने त्याचा वापर केला जातो. माती निसर्गातला घटक असल्यामुळे त्याचा ज्या वेळेला आपण शरीरातला आजार बरा करण्यासाठी उपयोग करतो, त्या वेळेला त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. कारण तिचे तत्त्व आणि आपल्या शरीराचं तत्त्व हे मिळतं जुळतं आहे. त्यामुळे ते एकमेकांमध्ये समरस होते. नवनिर्मितीची खूप मोठी ताकद मातीमध्ये असते. त्याचा उपयोग निसर्गोपचारात करून घेतलेला आहे. मातीमधून आपल्याला काय काय साध्य करता येते तर मातीचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत. माती जशी नवनिर्मिती करते तसेच माती ही शोषणही करते आणि त्यामुळे शरीरातील विजातीय असतील ते काढून टाकण्यासाठी मातीचा प्रभावीपणे वापर करता येतो. निसर्गोपचारात जी माती वापरली जाते ती चांगली, शुद्ध, मऊ आणि काळी असावी लागते. अशा पद्धतीची माती साधारणपणे नदीच्या काठी, ओढय़ाच्या बाजूला आपल्याला मिळू शकते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बिनखर्चाचे औषध आहे. बाकीच्या आजारांमध्ये पाहिले तर आपल्याला अमाप पैसे खर्च करावे लागतात. त्यामानाने माती ही सहज, सुलभ मिळणारी आहे. ती बिनखर्चाची आहे आणि ती थोडय़ाशा परिश्रमाने सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते. नदीच्या आणि ओढय़ाच्या काठावरची काळी माती सगळय़ात उत्कृष्ट असते. जिथे काळी माती उपलब्ध नसेल, पण स्वच्छता आहे, घाण टाकली जात नाही, जिथून घाणेरडे पाणी वाहत नाही अशा चांगल्या ठिकाणची शेतातली मातीसुद्धा चालू शकते. अशी माती आणून ती वस्त्रगाळ करायची.
मातीच्या पट्ट्या ठेवणे
या पट्टय़ांचा वेगवेगळय़ा आजारांसाठी उपयोग केला जातो. शरीराच्या ज्या भागावर उपचार करायचा आहे उदा. कपाळावर, पोटावर, डोळय़ांवर तर त्या भागाची साधारण लांबी-रुंदी कशी आहे याअनुषंगाने कापडाची पट्टी तयार केली जाते. त्यासाठी जुने कापड वापरले जाते. या उपचारासाठी सुती कापडच वापरावे. त्याचा ज्या वेळेला आपण वापर करतो त्या वेळेला या मातीचे गुणधर्म पुरेसे आपल्या शरीरात उतरतात आणि शरीरातील घाण खेचून घेण्याच्या दृष्टीने माती काम करते. एकदा वापरलेली माती शक्यतो पुन्हा वापरायची नाही. कापडाची पट्टी स्वच्छ धुऊन पुन्हा वापरली तरी चालते.
या आजारांसाठी माती प्रभावी
ज्यांना सर्दी किंवा थंडीचा त्रास आहे अशांनी दहा मिनिटांच्या वर डोक्यावर मातीची पट्टी ठेवू नये.
अनिद्रा, चक्कर येत असेल, डोके दुखत असल्यास, सतत डोकं जड होत असेल, नाकातून रक्त येत असल्यास मातीची पट्टी डोक्यावर ठेवावी. त्यावर माती खूप चांगल्या पद्धतीने काम करते. ही मातीची पट्टी डोक्यावर दुपारी किंवा रात्री ठेवायची.
माणूस बेशुद्ध पडला असेल, त्या वेळेला ही मातीची पट्टी डोक्यावर ठेवल्यास त्याचा चांगला फायदा होतो. बेशुद्धी मोठय़ा स्वरूपाची असेल तर मात्र या पट्टीपेक्षा डोक्याला थेट मातीचा थर लावल्याने त्याचा फायदा होतो.
स्त्र्ायांच्या केसांच्या समस्यांवरही माती गुणकारी आहे. यामध्ये केसांवर पट्टय़ा ठेवण्यापेक्षा सरळ माती ओली करून डोक्यावर लावणे.
डोकेदुखी, केसांच्या समस्या, नाकातून रक्त येणे, मायग्रेन या आजारांवर माती रामबाण उपाय आहे.
मान आणि पाठीचा कणा यावरही मातीची पट्टी ठेवावी किंवा मातीचा सलग लेप लावला तर बेशुद्ध पडलेल्या माणसाला शुद्धीत आणायला मदत होते.
केस गळणे, केस पांढरे होणे, केसांत कोंडा होणे ज्यांना या समस्या आहेत अशांनी थेट डोक्याला माती लावली तर त्याचा फायदा होतो. या सगळय़ात माती एकच प्रकारची वापरायची ती म्हणजे काळी माती. निसर्गोपचारात काळी माती वापरली जाते.
सतत संगणकावर काम करून डोळय़ांवर ताण येतो. डोळे येणं, डोळे लाल होणं, डोळय़ांतून सतत पाणी येणं आणि डोळे कोरडे होणे यावर मातीचा लेप गुणकारी आहे. मातीच्या पट्टय़ा ठेवाव्यात.
पोटाच्या विकारातही माती उपयुक्त आहे. बद्धकोष्ठता, अपचन, पोट गच्च होणं, पोटात गॅसेस होणं, अल्सर त्यामध्ये या मातीचा वापर आपल्याला करता येतो. फक्त पोटावर मातीचा वापर करताना जेवणानंतर दोन ते तीन तासांनी करावा, जेवल्या जेवल्या करू नये.
लहान मुलं माती खातात, त्यांना जे आजार होतात ते दूषित मातीमुळे होतात. माती शरीराला पोषकच असते, पण ती दूषित असेल तर पोटात आजार होतात.
महाराष्ट्रातल्या मातीचे वैशिष्टय़
आपला महाराष्ट्र नैसर्गिक सुजलाम, सुफलाम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली माती आपण पाहिली तर मोठय़ा प्रमाणात सुपीक जमीन महाराष्ट्रात आहे. त्यात औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदातील अनेक औषधे ही सह्याद्रीच्या कडेकपाऱयांमध्ये मिळतील. आपल्या ग्रामीण भागात मिळतील. मुबलक पाणी, हवामान चांगले आहे, प्रदूषण अन्य राज्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आपल्याकडची माती चांगली आहे.
क्ले आर्ट
आपल्याकडे सण-उत्सव-समारंभ जे केलेले आहेत त्याचा उद्देशच तो होती की, त्यानिमित्ताने तुम्ही त्या मातीच्या संपर्कात जावं, त्यानिमित्ताने तुमच्या हाताला ती माती लागावी, त्याचे फायदे तुम्हाला मिळावेत. या मातीवरची फुलं काढली जातात ती फुलं मातीतील गुणधर्म शोषून घेतात किंवा विसर्जन पाण्यामध्ये करतात त्याचे कारण फुले त्या मूर्तीवर असतात, ते पाण्यात विरघळतात, त्याचे औषधी गुणधर्म मिळतात. म्हणून ते तीर्थप्राशन आहे ते तेवढय़ासाठी आहे. चोवीस तास ती फुलं त्या मातीतील गुणधर्म शोषून घेतात आणि ती पाण्यात टाकली जातात.





























































