मुद्दा – सतीश काळसेकर आणि कोलाहलाचे संदर्भ 

नकार देणारी कविता गुलामासारखा होकार देणाऱ्या कवितेपेक्षा श्रेष्ठ असते. आपण कविता लिहितो म्हणजे आपण प्रश्न विचारतो. कविता नाकारते प्रस्थापिताला. आपण कितीही शांत असलो तरी खोल अज्ञातात होणाऱ्या कोलाहलाच्या लाटा आपल्यावर येऊन आदळत असतात. सतीश काळसेकरांचीची कविता प्रश्न विचारणारी. आत उफाळून येणाऱ्या कोलाहलाचे संदर्भ शोधणारी. ते गेल्याचं कळलं त्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा संग्रह वाचायला घेतला होता. आपण एखादा कवी आवडीनं वाचायला घ्यावा आणि काही दिवसांतच त्याच्या मृत्यूची बातमी यावी हे पहिल्यांदा घडत नव्हतं. मी वाचलेल्या कुठल्याच कवीला मला प्रत्यक्ष भेटता आलं नाही.

आपण ज्याला कधीही भेटलो नाही. ज्याच्या फक्त कविता वाचल्या त्याच्या जाण्याचं दुःख काय असावं? ते गेल्याचं समजलं तेव्हा कपाट उघडून पाहिलं तर अस्ताव्यस्थ झालेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात ‘विलंबित’ हा त्यांचा संग्रह होता. हे नाव अगदी नेमकं असलं पाहिजे. काळसेकरांच्या कविता वाचताना एखादा विलंबित खयाल ऐकल्यासारखं वाटतं. एखादा आलाप मनात घुमत राहावा तशी त्यांची कविता घुमत राहते. एक अनोळखी वास्तव मला सारखं जाणवत राहतं. आकाशाच्या पोकळीत सामावलेलं विशाल सत्य आणि समुद्राच्या गाजेतून ऐकू येणारा प्राचीन षड्ज. या साऱ्याचे संदर्भ मला त्यांच्या कवितेत सापडतात.

दाटत जाणाऱ्या अंधारात 

पार्श्वसंगीत अहोरात्र 

आता साथ देते 

दुःखाच्या आरोहअवरोहात 

समुद्र, दुःख आणि कविता 

आता या अनोळख्या यमकापाशी 

मी थांबलोय 

लाटांसारखा 

आवर्त 

प्रत्यावर्तात …’

पण काळसेकरांची कविता या कोलाहलाच्याही पलीकडे जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असावी. कित्येकदा ‘छान लिहिलंय’ पेक्षा ‘खरं लिहिलंय’ हीच दाद द्यावीशी वाटते. कित्येकदा असं वाटू लागतं की जी गोष्ट मला किंचाळून, घसा फाडून आणि ओरडून सांगावीशी वाटते तीच गोष्ट चार शब्दांत कानात काहीतरी गुपित सांगितल्यासारखी काळसेकरांची कविता सांगून जाते. ‘पुस्तके कधीही नसतात स्थावरजंगम मालमत्ते सारखी’ आणि ‘पुस्तके भाकरीसाठी विकता येत नाहीत’ हे साधं आणि स्पष्ट सत्य त्यांच्या कवितेतून डोकावत राहत. पण तरीही त्यांची कविता सत्य शोधल्याचा आव आणत नाही. “say not that you have found the truth, but say that you have found a truth” खलील जिब्रानच्या या ओळींना तंतोतंत न्याय देणारी कविता म्हणजे काळसेकरांची कविता.

काळसेकरांची कविता वाहव्वाचा हट्ट धरत नाही. उलट एखादी कविता वाचल्यानंतर मी समोरच्या भिंतीकडे एकटक पाहत राहतो. अचानक भार वाढल्यासारखं, काहीतरी खरं समोर आल्यासारखं, कसलातरी उलगडा झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे एक कविता संग्रह मी अजूनही पूर्ण वाचलेला नाही. कारण दुसऱ्या कवितेला सामोरं जाण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. काळसेकर कवितेत वास्तवाची मांडणी करताना दिसतात. त्यांची कविता मृगजळ नक्कीच नाही. ती वाळवंटाएवढी खरी आहे. ती एखाद्या ऍबस्ट्रक्ट चित्रासारखी नाही वाटत. ती रेखीव आहे.

मी जेव्हा बोलू लागतो 

तुझ्याविषयी 

तेव्हा सर्वच म्हणतात 

मी देशाविषयी का बोलत नाही 

मी जनतेविषयी का बोलत नाही 

मी अमूर्त अंतराळाविषयी 

बोलायचं 

आजकाल टाळतो  

आता मी तुझ्याविषयी बोलत असतो 

तेव्हा खरे तर 

मी या सर्वांविषयीच बोलत असतो

सतीश काळसेकर भेटले नाहीत, पण त्यांच्या कविता मात्र भेटल्या. त्यांना पर्सनली भेटणं आणि कवितेतून भेटणं यात नक्की फरक तो काय असेल? कदाचित फरक नसेलही. कवितेतले काळसेकर आणि खऱ्या आयुष्यातले काळसेकर वेगळे थोडीच असतील.

n प्रथमेश डोळे

आपली प्रतिक्रिया द्या